दुसरी पत्नीही पतीच्या पेन्शनची वारसदार; जवानाच्या पत्नीला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पेन्शनसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने दुसरी पत्नीही पतीच्या पेन्शनची वारसदार असल्याचा निर्णय दिला आहे.

पिंपरी - केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पेन्शनसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने दुसरी पत्नीही पतीच्या पेन्शनची वारसदार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर महासंचालकांनी न्यायालयाच्या निकालाची पूर्तता करून महिलेच्या खात्यावर देय असलेली साडेसहा लाख रक्कम जमा केली. तसेच नियमित पेन्शन देण्याचेही पत्राद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत उच्च न्यायालयातील ॲड. सुभाष देसाई यांनी सांगितले, की नायकपदावर असताना दौलत सोनाजी कोलगे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. दोन वर्षांनी त्यांनी उषा (रा. पिंपरी-चिंचवड) यांच्याशी दुसरे लग्न केले. दरम्यान, वारसदार म्हणून पहिल्या पत्नीपासून असलेल्या दोन मुली व मुलगा यांची नावे कायम राहिली. फॅमिली पेन्शनसाठी दुसऱ्या पत्नीचे नाव नॉमिनेशन फॉर्ममध्ये नव्हते. तसेच, या वारसदार मुलामुलींनीही पेन्शनसाठी सीआरपीएफकडे कधी दावा केला नाही. दोन्ही मुली विवाहित असून, मुलगा २५ वर्षांपेक्षा मोठा आणि कमावता झाल्याने वडिलांची फॅमिली पेन्शन मिळण्याचा या तिघांचा अधिकार संपुष्टात आला. याबाबत अनेकवर्षे पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी उषा यांना पेन्शन अदा करत नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त 

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. जे. जमादार व न्यायाधीश रणजित मोरे यांनी याचिकाकर्ते आणि पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत २० सप्टेंबर २०१९ रोजी निकाल दिला. मृत पतीच्या दुसऱ्या पत्नीला फॅमिली पेन्शन मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे उषा दौलत कोलगे यांच्या बाजूने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी सीआरपीएफने चार आठवड्यात करण्याचे आदेश दिले.

पिंपरी-चिंचवड : पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

नोटिशीनंतर घेतली दखल...
आदेशानंतरही त्याची पूर्तता होत नसल्याने, उषा यांनी ॲड. देसाई यांच्यामार्फत सीआरपीएफ पोलिस महासंचालकांसह संबंधित खात्याच्या विभागीय कार्यालयांना नोटीस पाठविली. त्याची दखल घेत सीआरपीएफच्या दिल्ली येथील वरिष्ठ लेखापालांनी लेखी पत्राद्वारे उषा यांच्या खात्यावर सहा लाख ३४ हजार ७०१ रुपये जमा करत असल्याचे आणि डिसेंबर २०२० पासून दरमहा १० हजार रुपये पेन्शन देण्यात येत असल्याबाबत कळविले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second wife consoled wife soldier inherited her husbands pension