Republic Day 2023 : अखेर भारतीय झालो! पाकिस्तानातून आलेल्या सिंधी बांधवांच्या भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Niranjan Bhogia

भारतात राहण्यासाठी ना हरकत दाखला लागतो. त्यासाठी पाकिस्तानात जावे लागते. तेथे पुन्हा अपमानास्पद वागणूक मिळते. यामुळे स्थलांतरित हिंदू बांधवांना जिणे असह्य होते.

Republic Day 2023 : अखेर भारतीय झालो! पाकिस्तानातून आलेल्या सिंधी बांधवांच्या भावना

पिंपरी - भारतात राहण्यासाठी ना हरकत दाखला लागतो. त्यासाठी पाकिस्तानात जावे लागते. तेथे पुन्हा अपमानास्पद वागणूक मिळते. यामुळे स्थलांतरित हिंदू बांधवांना जिणे असह्य होते. तरीही चिकाटी न सोडता भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करत राहतात... अशी चिकाटी दाखवत २३ वर्षांनी नागरिकत्व मिळविणारे म्हणजे निरंजन भोगिया. त्यांच्याप्रमाणेच पिंपरी कॅम्पातील शेकडो बांधवांना भारतात कायमचे राहण्याचे स्वप्न साकार होऊ शकले आहे. ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सकाळ’ने भारतीय सिंधी बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रांतातून भारताकडे येण्यासाठी मोठा लोंढा होता. यातीलच काहीजण पिंपरी-चिंचवड शहरात आले. पिंपरीमध्ये त्यांनी तळ ठोकला. येथेच त्यांची वसाहत झाली. यातूनच पिंपरी कॅम्प असे नाव पडले आणि पुढे ओळख निर्माण झाली. ते येथे वर्षानुवर्षे राहत असले, तरी सिंध प्रांत पाकिस्तानात असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या व्हिसावर ते राहत आहेत. त्यांना आपली ओळख भारतीय अशी होती.

त्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा दाखला मिळण्यासाठी तब्बल २५-२६ वर्षे त्यांचा संघर्ष सुरू होता. आता हळूहळू त्यांना दाखले मिळू लागले आहेत. याबाबतचा अनुभव सांगताना निरंजन म्हणतात, ‘‘भारतात राहण्यासाठी तीन महिन्यांचा व्हिसा दिला जातो. तो ज्या जिल्ह्यात रहिवासासाठी जातो, त्या ठिकाणच्या पोलिस अधीक्षकांना द्यावा लागतो. तीन महिन्यांनंतर संबंधित व्यक्तीला व्हिसाची मुदत वाढवून मिळण्यासाठी पुन्हा संबंधित पोलिस आयुक्तालयात कागदपत्रे सादर करावी लागतात. पुन्हा पुन्हा अर्ज करायचा, सोबत कुटुंबाची छायाचित्रे जोडायची. फोटो द्यावे लागतात. यानंतर कागदपत्रांचा हा सारा गठ्ठा पोलिस विभाग, व्हिसा विभागाकडून फिरत राहतो. आता त्रास कमी झाला आहे.’’

पाकिस्तानी शिक्‍का पुसला गेला

अंजली आसवानी म्हणाल्या, ‘‘भारतीय असूनही पाकिस्तानी असल्याचा ठप्पा लागला होता. १९४७ नंतर पाकिस्तानातील बहुतांश हिंदू भारतात आले. त्यांना आता भारतीय नागरिकत्व मिळण्यास सुरवात झाली आहे. सिंधी समाज राष्ट्रीय भावनेने जोडला जात आहे. नागरिकत्व मिळाल्यावर स्वत:ची जागा, घर खरेदी करू शकत आहेत. ‘‘यहाँ पिछले १२ सालों से रहते हैं। भारतीय नागरिकत्व पाने के लिए एफआरओ कार्यालय के चक्‍कर काटने पडते थे। खुद का घर खरीद नहीं सकते थे। हर साल किराए का घर ढूंढना पडता था। लेकिन अब सभी समस्याएं हल हो जाएगी।’’

या आहेत अटी व नियम...

  • संबंधित व्यक्ती पाच वर्षांपासून भारतात राहत असावा

  • नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी १२ महिने मूळ देशाशी संपर्क ठेवायचा नाही

  • अशा नागरिकांची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून घेण्यात येते

  • सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भारतीय नागरिकत्व देण्यात येते

पाकिस्तानमधून बारा वर्षांपूर्वी भारतात आलो. येथे आम्हाला सुरक्षित वाटते.नागरिकत्वासाठी १० वर्षांपूर्वी अर्ज केला होता. नागरिकत्व मिळाल्याने स्वातंत्र्य मिळाले आहे.

- महेंद्र पंजवानी, अध्यक्ष, एकता मंच (जि. घोटकी, सिंध, पाकिस्तान)

गेल्‍या २० वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहोत, तरीही नागरिकत्व मिळाले नाही. त्यामुळे मनात आपण परकीय अशी भावना होती. अनेकांच्या प्रयत्‍नाने आता नागरिकत्व मिळाले आहे.

- इंदनदास परचानी

भारतात आल्यानंतर सुरुवातीला काही अडचणी आल्या. परंतु, इथे आल्यावर राहण्यापासून ते शिक्षणापर्यंतची सोय केली. महिला खूप खुश आहेत.

-गीताबाई गोगिया

पाकिस्तानातून भारतात परतल्‍याचा आनंद वेगळाच आहे. इथे आल्याने महिलांमध्ये सुरक्षित असल्याची भावना आहे.

- संताबाई केसवानी

भारतात महिलांना सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि धर्माचे स्वातंत्र्य आहे. महिला बिनधास्तपणे वावरू शकतात.

- मोहिनी पंजवानी

टॅग्स :IndiaPimpri Chinchwad