२६ वर्षांपासून हार्टपेशंट असलेल्या शहात्तरीतील सैनिकाची मोपेडवरून अनेकदा भारत भ्रमंती

Vishwas-Kulkarni
Vishwas-Kulkarni

पिंपरी - त्यांचं वय ७६ वर्षांचं... हवाई दलातून निवृत्त झालेलं... दररोज सकाळी किमान आठ किलोमीटर चालणारं... २६ वर्षांपासून हार्टपेशंट असलेलं... मोपेडवरून अनेकदा भारत भ्रमण केलेलं... आणि आता पुन्हा बुधवारपासून मोपेडवरूनच देशांतर्गत पर्यटनाला निघालेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे निगडी-प्राधिकरणातील विश्‍वास गोविंद कुलकर्णी. तरुणाईलाही लाजवेल, असा त्यांचा उत्साह दिसून आला. आताच्या भ्रमंतीत ते ४७ शक्तीपिठांच्या दर्शनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवाई दलाच्या १५ वर्षांच्या सेवेत कुलकर्णी यांना देशातील प्रत्येक ठिकाणचं निसर्गसौंदर्य भावलं. ‘अरे, इतका सुंदर आपला देश आहे. बघायलाच हवा’ याची जाणीव झाली. पण, कर्तव्यावर असल्याने मनासारखं फिरून निसर्ग न्याहळता आला नाही. त्यामुळे हवाई दलातून सेवानिवृत्तीनंतर देशभर भटकंती करायचे असे मनोमन ठरवले आणि निवृत्त झाल्यावर स्वतःची दुचाकी घेऊन स्वप्न पूर्ण करायला निघाले. पण, अर्थार्जनासाठी टेल्को कंपनीत (आताची टाटा मोटर्स) नोकरीही स्वीकारली. पहिला प्रवास एम-८० वरून करत गोवा पाहिले. त्यानंतर चक्क आठ हजार किलोमीटरचा प्रवास कायनेटिकवरून पत्नी नीला कुलकर्णी यांच्या समवेत केला. तेव्हा ते पन्नाशीत होते. या प्रवासासाठी आठ हजार रुपयेच खर्च आल्याचे ते आवर्जून सांगतात. या अनुभवातून उत्साह वाढला आणि भ्रमंती सुरूच राहिली. वयाचा उल्लेख करीत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास, ‘मी एअर फोर्सचा जवान आहे, मला काहीही होणार नाही,’ असं बोलून ते समोरच्याला निरुत्तर करतात, असे त्यांच्या सुस्नूषा मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले. 

दरम्यान, त्यांची भेट लॉयला स्कूलचे शिक्षक मिलिंद क्षीरसागर यांच्याशी झाली. त्यांचा भारताचा इतिहास व भूगोल तोंडपाठ. दोघांची गट्टी जमली आणि प्रत्येक प्रवासाला निघण्यापूर्वी नकाशाचा अभ्यास सुरू झाला. २००८ मध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी भूतान बघून झाले. त्यानंतर कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. जण, त्यावर मात करीत कोकण दर्शन केले. कळसुबाई शिखर व १७ किल्ले चढून झाले. लेह, लडाख, पानिपत, ईशान्य भारत (सेव्हन सिस्टर्स), मध्यप्रदेश, नेपाळ दर्शन सारं काही दुचाकीवर झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी २०१९ च्या अखेरीस उत्तराखंडाची पाच हजार किलोमीटरची चारधाम यात्रा केली. अवघ्या पन्नाशीत बायपास सर्जरी झालेली व्यक्ती पुढील पंचवीस वर्षे हे सर्व दुचाकीवर करू शकते, यासाठी फक्त दुर्दम्य इच्छाशक्तीच हवी. याच जोरावर ७६ वर्षांचे हे जवान आता ५१ पैकी भारतातील ४७ शक्तीपिठांचं दर्शन घ्यायला आणि सुंदर भारताचा संदेश द्यायला निघाले आहेत. दुचाकीवरून.

आपला देश खूप सुंदर आहे. प्रत्येक ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी वयाच्या तेराव्या वर्षी सोलापूर ते नळदुर्ग हा २० मैलांचा प्रवास सायकलने केला होता. पाय पुरत नसल्याने अर्धे पायडल मारत सायकल चालवली. ९२ वर्षांचा माणूस एव्हरेस्ट चढू शकतो, तर आपण का काही करू शकत नाही, या विचारानुसार जीवन जगतो आहे. मन व तब्बेत ठीक आहे, तोपर्यंत भ्रमंती करीत राहणार आहे. नांदेड, सोलापूरनंतर दक्षिण भारत, पुढे आंध्र प्रदेशमार्गे ईशान्य भारत व उत्तर भारत करून परत येणार आहे. 
- विश्‍वास कुलकर्णी, निगडी-प्राधिकरण

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com