
भोसरी पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाखाली दोघेजण दुचाकीवरून येणार असून ते दोघेजण पायी चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पिंपरी - प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे स्मार्ट फोन चोरून तिला द्यायचे. तिच्याकडून अगोदरचा मोबाईल फोन घेऊन विकायचा व त्यातून मिळालेल्या पैशात मौजमजा करायची, असा उद्योग सुरू असलेल्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 26 स्मार्ट फोन व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सागर मोहन सावळे (वय 22, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), नीलेश देवानंद भालेराव (वय 19, रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. भोसरी पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाखाली दोघेजण दुचाकीवरून येणार असून ते दोघेजण पायी चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी पीएमटी बस स्टॉपजवळ सहा तास सापळा रचून सागर व नीलेश यांना ताब्यात घेतले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आठ मोबाईल फोन व एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यात पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे आणखी 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी असा एकूण चार लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली
आरोपी सागर व नीलेश यांच्या प्रेयसींना इम्प्रेस करण्यासाठी ठराविक दिवसांच्या अंतराने दोघेही प्रेयसींना वेगळा मोबाईल फोन वापरण्यासाठी देत असत. प्रेयसीकडे पहिला मोबाईल फोन द्यायचा आणि दुसरा मोबाईल फोन चोरायचा. त्यानंतर चोरलेला दुसरा मोबाईल फोन प्रेयसीला वापरायला द्यायचा आणि तिच्याकडून पहिला मोबाईल काढून घेऊन पहिला मोबाईल फोन विकायचा. त्यातून आलेल्या पैशांवर मौजमजा करायची. असा उद्योग या दोघांनी मागील काही महिन्यांपासून सुरू ठेवला होता. त्यांनी तब्बल 26 स्मार्टफोन तसेच तीन दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
नऊ गुन्हे उघडकीस
या कारवाईत पिंपरी तीन, एमआयडीसी भोसरी दोन, भोसरी तीन व शिरवळ पोलिस ठाण्यातील एक असे एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या आरोपींना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे वाचा - Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट