esakal | तळेगाव स्टेशन : कडक निर्बंधामुळे आठवडे बाजार संस्कृती मोडीत | Bazar
sakal

बोलून बातमी शोधा

Talegaon Station Bazar
तळेगाव स्टेशन : कडक निर्बंधामुळे आठवडे बाजार संस्कृती मोडीत

तळेगाव स्टेशन : कडक निर्बंधामुळे आठवडे बाजार संस्कृती मोडीत

sakal_logo
By
गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन - लॉकडाउन दरम्यान वाढलेली भाजीविक्रेत्यांची संख्या आणि त्यांचे गावोगावी आणि गल्लोगल्ली वाढलेले जाळे पाहता ग्रामीण आणि निमशहरी भागातील पारंपरिक आठवडे बाजार संस्कृती मोडीत निघाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आगामी काळात आठवडे बाजाराला परवानगी दिली तरी खरेदी-विक्रीला कितपत वाव मिळेल, यावर प्रश्नचिन्ह आहे.

आठवडे बाजाराला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. ग्रामीण भागातील खरेदी- विक्रीपासून वस्तुविनिमय, आर्थिक देवाणघेवाण आणि भेटीगाठीचे ठिकाण असे. मतदान आणि संचारबंदीचा अपवाद वगळता कधी नेम न चुकलेल्या आठवडे बाजारावर गतवर्षीपासून लॉकडाउनमुळे गंडांतर आले. गतवर्षीच्या एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तू म्हणून सरकारने भाजीपाला, किराणा मालाच्या विक्रीस अटी शर्तीनुसार आणि बंधने घालून दिलेली मुभा या व्यवसायातील काळ्याबाजाराला पोषक ठरली. जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकाची लूट केली. परिणामी या व्यवसायात मिळणारा अव्वाच्या सव्वा नफा पाहून डोळे विस्फारलेल्या अनेक नोकरदार उच्चभ्रूंनीदेखील भाजीविक्रीची अनधिकृत दुकाने, गाडे, डिलीव्हरी व्हॅन सुरू केले. ठिकठिकाणी रस्त्यावर, चौकात, मैदानावर मिनी मंडई उभ्या राहिल्याने नागरिकांना घराजवळ रोज ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे. आठवडे बाजारात मिळणारे इतर सामान किराणा, खारा माल आता गल्लोगल्ली लागणाऱ्या हातगाडीवर मिळतोय.

हेही वाचा: Pimpri Update : शहरात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अनेकांनी शोधले पर्याय

बहुतांश बाजारकरूंनी एक तर दुसरा व्यवसाय निवडला किंवा कुठेतरी कोपऱ्यावर गाडी लावून विक्री सुरु केलीय. आठवडे बाजाराची मैदाने ओस पडली असून, फळभाजी विक्रेत्यांनी गल्लोगल्ली गराडा घातला आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरु करण्याबाबत कोणी आग्रही दिसत नाही.

तळेगाव, चाकण, लोणावळा, वडगाव, कामशेत अशा पाच आठवडे बाजारांत साधारणतः पाच ते सहा हजार रुपये कमाई होत असे. लॉकडाउनमुळे आठवडे बाजार बंद झाल्याने आता रोज रस्त्याच्या कडेला फुले, भाजीपाल्याचे स्टॉल लावतोय. मात्र, ठिकठिकाणी भाजीविक्रेते बसत असल्याने अपेक्षित विक्री होत नाही.

- विजया सुरेश मोरे, बाजारकरू महिला, तळेगाव

loading image
go to top