कोरोनामुळे दगावलेल्या नगरसेवकांची जागा रिकामी; पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

सध्या इच्छुकांनी प्रभागात फ्लेक्‍सबाजी, तसेच सोशल मिडीयावर विविध पोस्ट व व्हिडीओचे प्रसारण केले जात आहे.

पिंपरी, ता. 10 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तीन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या रिक्त झालेल्या या जागांवर डिसेंबर महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमांतून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्या दोघांना अटक

कोरोनाच्या महामारीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे. त्यांचे चिखली-म्हेत्रेवस्तीतील माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलैला तर आकुर्डी - विठ्ठलवाडीतील नगर सेवक जावेद शेख यांचे 31 जुलै निधन झाले. त्यानंतर भाजपचे दिघीतील नगर सेवक लक्ष्मण उंडे यांचा 26 सप्टेंबरला मृत्यू झाला. मुंबई महापालिका नियमानुसार नगर सेवकपद रिक्त झाल्यावर त्या जागेवर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. नगरसेवकांच्या निधनानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने तत्काळ राज्य निवडणूक आयोगाला कळविले आहे. मात्र अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. 

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिस उपायुक्तांची बदली; 3 सहायक आयुक्तांची नियुक्ती

दरम्यान, सध्या इच्छुकांनी प्रभागात फ्लेक्‍सबाजी, तसेच सोशल मिडीयावर विविध पोस्ट व व्हिडीओचे प्रसारण केले जात आहे. याबरोबरच दिवंगत लोकप्रतिनिधीच्या जवळच्या नातेवाइकांनीदेखील निवडणुकीसाठी कंबर कसलेली दिसत आहे. दुसरीकडे निवडणूक घेण्याऐवजी संबंधित नगर सेवकांच्या नातेवाइकांनाच बिनविरोध निवडून देण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी विचार करावा, असाही एक मतप्रवाह तयार झाला आहे. तसेच सभा, प्रचारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका टळेल. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sub election in Pimpri Chinchwad Municipal Corporation