तळेगाव-चाकण मार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा!

Accident
Accident

सहा वर्षांत ४४७ अपघात, २५० जणांनी गमावला जीव; दुरुस्ती, देखभालीकडे कायम दुर्लक्ष
तळेगाव स्टेशन - अपघात आणि वाहतूक कोंडीचा सिम्बॉल ठरलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा वर्षांत या मार्गावर झालेल्या साडेचारशे अपघातांमध्ये अडीचशेपेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर जवळपास चारशे जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या आकडेवारीतून हे वास्तव उघड झाले आहे.

पाच वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या टोलबंदीनंतर तळेगाव-चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. दरम्यानच्या काळात वाढत्या रहदारीच्या तुलनेत ५६ किलोमीटर अंतराच्या या मार्गाची दुरुस्ती आणि देखभालीकडे कायम दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली. तीन वर्षांपूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, तो अद्यापही कागदावरच आहे. त्यानंतर नुकतेच जाहीर केलेले ३०० कोटी रुपयांचे १२ मीटर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे नियोजित काम होण्यास अजून किती दिवस लागणार? याबाबतही अनिश्‍चितता आहे. गेल्या सहा वर्षांत या रस्त्यावरचे अपघात, जखमी आणि मृतांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वाधिक अपघात २०१७ मध्ये झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे सरासरी आकडेवारीवरून, वर्षाला चाळीस; तर महिन्याला सरासरी चार जणांच्या जिवावर उठणाऱ्या या रस्त्याच्या कामाबाबत कुणाही लोकप्रतिनिधीला स्वारस्य नाही. याशिवाय प्रशासनालाही याचे गांभीर्य नाही. सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये कामावरून टोलवाटोलवी चालू आहे. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते. या अरुंद रस्त्यावरील साईडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आहेत. या रस्त्यावरून दररोज अनेक कामगार आणि चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

‘अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू’
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याबाबत वारंवार निवेदने, विनंत्या करूनही रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नाही. रोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे मावळ, खेड तालुक्‍यातील पन्नास टक्के नागरिकांसह एमआयडीसीतील हजारो कामगारांचे जनजीवन विस्कळीत होत आहे, तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाहीत. यापुढे दुर्दैवाने कुणाचा अपघातात बळी गेल्यास, आम्ही स्वतः फिर्यादी होऊन थेट सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे यांनी दिला आहे.

तीन आठवड्यांपूर्वी मार्गाची पाहणी केली आहे. साइडपट्ट्या, अतिक्रमणे आदींबाबत सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ उपविभागाकडून तात्पुरत्या उपाययोजनांची कामे चालू आहेत. ३०० कोटी रुपयांच्या नियोजित १२ मीटर रुंद, सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
- गोरक्ष गवळी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग नारायणगाव उपविभाग

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com