अडीच हजार दाखले 'पेंडिंग'; सेतू कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रांवर वाढली गर्दी

Maha-E-Seva-Kendra
Maha-E-Seva-Kendra

पिंपरी - सरकारी कामांसाठी विविध दाखल्यांची आवश्‍यकता असते, ते मिळविण्यासाठी सेतू कार्यालय आणि महा-ई-सेवा केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढली आहे. लॉकडाउनच्या साडेतीन महिन्यात 46 हजार 610 विविध दाखल्याचे वितरण करण्यात आले. मात्र सर्व्हर डाउनमुळे सुमारे अडीच हजार दाखले "पेंडिंग' असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला महा-ई-सेवा केंद्रचालकांना सामोरे जावे लागत आहे. 

शहरात 49 सेतू आणि महा-ई-सेवा केंद्र कार्यरत आहेत. सरकारी कामांसाठी विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. केंद्राकडे नागरिक आवश्‍यक ते कागदपत्र सादर करताहेत. दररोज सातबारा उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, डोमिसाईल, राष्ट्रीयत्वाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला असे एक हजार अर्ज प्रशासनाला प्राप्त होत आहेत. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी प्रशासनाला ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु, तहसील कार्यालयात सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने प्रमाणपत्रासाठी नागरिकांना वाट पहावी लागत आहे. 15 दिवसांपासून उत्पन्न दाखला बहुतांश नागरिकांना वेळेवर न मिळाल्यामुळे वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मुदतीत दाखले मिळावेत यासाठी नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा सुरू असतो. 

फाइल होताहेत करप्ट 
गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व्हरमुळे अनेकदा दाखल्यांच्या फाइल करप्ट होण्याचे प्रकार घडले आहेत. बऱ्याचवेळा संबंधितांचे लॉगइन दिसत नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान आवास योजनेसाठी 35 हजार उत्पन्नाचे दाखले प्राप्त झाले होते. त्यांचीदेखील पूर्तता केली आहे. आता आरटीईच्या प्रवेशासाठी 4 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. जुलै ते 19 ऑक्‍टोबरपर्यंत 46 हजार 610 विविध दाखले वितरित केले आहेत. 

दाखल्याचे प्रकार / वितरण संख्या 
-उत्पन्न दाखला / 30,354 
-रहिवासी दाखला /1,401 
-डोमिसाईल /8,464 
-ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र /52 
-अल्पभूधारक / 7 
-नॉनक्रिमीलियर रिनिव्हल /8 
-जात प्रमाणपत्र /997 
-जात प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र / 745 
-नॉनक्रिमीलियर प्रमाणपत्र /2,294 
-नॉनक्रिमीलियर प्रमाणपत्राबरोबर प्रतिज्ञापत्र/1,875 
-शेतकरी प्रमाणपत्र/8 
-भूमिहीन प्रमाणपत्र/ 2 
-महिला आरक्षण प्रमाणपत्र/ 20 
-आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र/163 
-केंद्राचे इडब्ल्युएस प्रमाणपत्र /220 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दाखल्यांसाठी सेतू कार्यालय तसेच महा ई सेवा केंद्रांवर गर्दी वाढत आहे. वाढती गर्दी पाहता सरकारी कार्यालयांत कर्मचारी संख्या वाढवावी. वारंवार सर्व्हर डाउनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. 
- मयुरेश पाटील, नागरिक 

दाखल्याबाबतचे सर्व काम संगणकीकृत झाले आहे. त्यामुळे विलंब कमी झाला आहे. दाखल्यांसाठी गर्दी वाढत असली तरी आवश्‍यक ती कागदपत्रे जोडल्यास वेळेत दाखले देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणांकडून होत आहे. 
- गीता गायकवाड, तहसीलदार, अप्पर तहसीलदार कार्यालय

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com