...अन् त्यांना दिसला डाॅक्टरांच्या रुपात पांडुरंग

संजय बेंडे
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना योद्ध्यांना भोसरीतील रांगोळी कलाकार भूषण खंडारे याने डॅाक्टरांच्या वेशभूषेत विठ्ठलाची रांगोळी साकारत कोरोनाग्रस्तांसाठी डॅाक्टर म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाचेच रुप असल्याचे दर्शविले आहे.

भोसरी ः कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी डॅाक्टर, पोलिस, नर्स, सफाई कामगार, शिक्षक कोरोना योद्ध्याचे काम करत आहेत. या योद्ध्यांमध्ये विठू माऊलीचे रुप असल्याचे रांगोळीच्या माध्यमातून चित्र साकार करत या कोराना योद्ध्यांचे कौतुक भोसरीतील रांगोळी कलाकार भूषण खंडारे याने केले आहे.

खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा...

कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाल्यापासून स्वतःचा जीव धोक्यात घालत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचाराचे काम डॅाक्टार, नर्स  करत आहेत. सुरवातीला तर पीपीई कीट उपलब्ध नसतानाही डॅाक्टर-नर्सद्वारे कोरोनाग्रस्त आयसीयुमध्ये आपली सेवा दिली. त्याचप्रमाणे लॅाकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांनी घरी रहावे, सुरक्षित रहावे यासाठी पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.

कोरोना व्हायरसचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सफाई कर्मचारीही जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छतेचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांद्वारे परिसरातील नागरिकांचे करण्यात आलेल्या सर्व्हेमुळे प्रशासनाला कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत महत्त्वाची माहिती संकलित करता आली. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमण काळात डॅाक्टर, नर्स, पोलिस, शिक्षक आदी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांना भोसरीतील रांगोळी कलाकार भूषण खंडारे याने डॅाक्टरांच्या वेशभूषेत विठ्ठलाची रांगोळी साकारत कोरोनाग्रस्तांसाठी डॅाक्टर म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाचेच रुप असल्याचे दर्शविले आहे.

त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या शेजारी पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्याची वारकरी म्हणून रांगोळी साकारलेली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी दहा किलो रांगोळीसह सहा किलो रंगांचा उपयोग करण्यात आला आहे.

या विषयी खंडारे यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षापासून आषाढी एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर माझे गुरू रांगोळीकार संतोष अडागळे यांच्याबरोबर जात आहे.  रस्त्यावर पालखीच्या पुढे रांगोळीच्या पायघड्या काढण्याचे भाग्य लाभले. मात्र या वर्षी लॅाकडाऊनमुळे ही वारी हुकली. त्यामुळे भोसरीतील विठ्ठल मंदिरात पांडूरंगाची रांगोळी काढून पंढरपूरच्या पांडुरंगाला अभिवादन केले आहे. डॅाक्टर हे कोरोनापासून कोरोनाग्रस्तांना वाचविण्यासाठी पांडुरंगांचेच काम करत असल्याने विठूमाऊली डॅाक्टरांच्या वेशभूषेत साकारली आहे. 

रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार झाले अन् उपचार सुरू करण्यापूर्वीच...

भोसरी गावठाणातील विठ्ठल मंदिरात विठूमाऊलीची भव्य रांगोळी पाहण्यासाठी भाविक सोशल डिस्टंसिंगचे पालन करत होते. त्याचप्रमाणे विठूमाऊलींपुढे नतमस्तकही होत होते.  
 
विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचा अभिषेक
भोसरी गावठाणातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचा अभिषेक करण्यात आला. त्यायप्रमाणे काकडा आरती, भजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. सोपानराव महाराज फुगे, लालाशेठ गव्हाणे, नारायण लांडगे, येरूनकर महाराज, नामदेव गव्हाणे आदींनी हरिनामाचा जाग करत संगीत भजने सादर केली. सकाळपासूनच विठ्ठल-रुक्मिणी यांचे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करत दर्शन घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique salute to the Corona Warriors