पिंपरी-चिंचवडमधील नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

मुळशी व पवना धरणातून अनुक्रमे मुळा व पवना नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळं पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय.

पिंपरी : मुळशी व पवना धरणातून अनुक्रमे मुळा व पवना नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळं पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या रहिवाशांना महापालिका, पाटबंधारे विभाग व पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिलाय. 

पिंपरी-चिंचवडकरांनो आनंदाची बातमी; आता पाण्याची चिंता मिटली

मुळशी धरणातून पंधरा ऑगस्टपासून विसर्ग सुरू आहे. त्यामुळं मुळा नदीच्या पातळीत वाढ झालीय. तिच्या काठच्या वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी, बोपखेल, पुण्यातील खडकी, बाणेर, बोपोडी, औंध गावांना अतिदक्षतेचा इशारा दिलाय. वाकड व बाणेरच्या शिवेवर मुळा नदी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पूण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. मुळशी धरणापाठोपाठ आता पवना धरणातून विसर्ग सुरू केल्यानं पवना नदीच्या पातळीतही वाढ झालीय. मामुर्डी येथे पवना नदीचा शहरात प्रवेश होतो. तिच्या काठावर मामुर्डी, रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, नवी सांगवी, जुनी सांगवी आदी गावे आहेत. 

मुळशी, पवनाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांचा चुकतोय काळजाचा ठोका

मुळा नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी, शिक्षक कॉलनी, मुळानगर, ढोरेनगर, पवारनगर, संगमनगर, जयमालानगर, ममतानगर या भागांना बसतो. तर, पवना नदीच्या पुराचा तडाका चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर परिसर, केशवनगर, तानाजीनगर, पिंपरीतील भाटनगर, आंबेडकरनगर, संजय गांधीनगर, सुभाषनगर, मिलिंदनगर, रहाटणी गावठाण, कासारवाडी स्मशानभूमी परिसर आदी भागांना बसतो. त्यामुळे येथील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्‍यकता आहे. 

दक्षता घेण्याचं आवाहन 

नदीकाठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच, पशुधन यांच्याही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन मुळशी धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vigilance alert for riverine citizens in pimpri chinchwad