PMP Driver : चूक साहेबांच्या वाहन चालकाची; शिक्षा मात्र गरीब पीएमपी चालकाला

शासकीय वर्दी अंगावर चढताच काहिजण भलतेच उन्मत्त होतात. वर्दीचा अहंकार आणि तीच्या जोरावर केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मात्र काही निष्पाप व निर्दोष लोकांना अनेकदा भोगावी लागते.
PMP Bus
PMP BusSakal
Summary

शासकीय वर्दी अंगावर चढताच काहिजण भलतेच उन्मत्त होतात. वर्दीचा अहंकार आणि तीच्या जोरावर केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मात्र काही निष्पाप व निर्दोष लोकांना अनेकदा भोगावी लागते.

- बेलाजी पात्रे

वाकड - शासकीय वर्दी अंगावर चढताच काहिजण भलतेच उन्मत्त होतात. वर्दीचा अहंकार आणि तीच्या जोरावर केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मात्र काही निष्पाप व निर्दोष लोकांना अनेकदा भोगावी लागते. असाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात घडला. स्वतः विरुद्ध दिशेने येत उलट पीएमपी चालकाला बस मागे घेण्यासाठी दादागिरी करणाऱ्या आरटीओ कर्मचाऱ्याचे चुकीचे म्हणणे चालकाने न ऐकल्याने त्याच्या नोकरीवर चक्क गदा आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगेश कांबळे असे हंसा प्रा. लि या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या चालकाचे नाव आहे. कांबळे यांना न केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली असून, ते गेल्या दहा दिवसांपासून कामाविना घरी बसून आहेत. गुरुवारची (ता. २३) ही घटना. निगडी-आळंदी ३४० क्रमांक मार्गावर धावणारी (एमएच १४, एचयु ५३६१) पीएमपीएल बस सायंकाळी साडे पाचला पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्त्यावर पोहचली. समोरून आरटीओच्या फ्लाईंग स्कॉड पथक वाहनावरील चालक संजय चव्हाण हे मोटार घेऊन विरुद्ध दिशेने समोरुन येत होते. प्रवाशांनी भरलेली बस मागे घेणे शक्य नव्हते त्यामुळे ती चालकाने थांबविली.

वर्दीत असलेले चव्हाण चिडुन चालकाकडे आले ते म्हणाले, तुला पाठीमागे घ्यायला काय झालं? माझी कार समोरून येत आहे ना?, तुला दिसत नाही का?, मी अधिकारी आहे! असे म्हणताच साहेब आम्ही आमच्या दिशेने आहोत तुम्ही विरुद्ध दिशेने आहात असे चालक आणि वाहक दोघांनीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, चव्हाण माघार घेण्यास तयार नव्हते. २० मिनिटं हुज्जत घालणाऱ्या चव्हाणांचा तोरा उतरत नसल्याने अखेर चिडलेल्या प्रवाशांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवताच बसच्या नंबर प्लेटचे फोटो काढून त्यांनी काढता पाय घेतला. मात्र या घटनेनंतर बसचालक कांबळे यांना कामावरून थांविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

उलट दादागिरी प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी मदत केली. मात्र, मी आरटीओत साहेब आहे. चालकाला कामावरून काढा अन्यथा हंसा प्रायव्हेट लिमिटेड या कॉन्ट्रॅक्टरमधील सर्वच बसवर मी कारवाई करेन अशी धमकी चव्हाण यांनी दिल्याने मला चुक नसताना दहा दिवसांपासून घरी बसावे लागले आहे. यानंतर मी कॉन्ट्रॅक्टर आणि आरटीओ अधिकाऱ्यांसमोर सत्य मांडले त्यांच्या कार्यालयाची उंबरे झिजवली पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही.

- मंगेश कांबळे (पीएममी चालक)

PMP Bus
Pimpri Crime : प्रेम, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; आमिषांना बळी पडू नका, सावध राहा!

मंगेश कांबळे यांच्या विरुद्ध तक्रार आल्याने त्यांना चौकशी करता कामावर जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र, मंगेश यांच्याशी चर्चा केली सर्व प्रकार समजून घेतला आणि मंगेश यांना लवकरच कामावर रुजू करून घेणार आहोत.

- आयुष पारीख, व्यवस्थापक हंसा प्रायव्हेट लिमिटेड

दोषींवर कारवाई केली जाईल

हा प्रकार माझ्याही कानावर आला आहे. मात्र याबाबत इत्यंभूत माहिती घेण्याचे माझे काम सुरू आहे सर्व चौकशीअंती तो कर्मचारी दोषी आढळल्यास काय ती कायदेशीर कारावाई केली जाईल.

- अतुल आदे, (उपप्रादेशिक अधिकारी पिंपरी-चिंचवड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com