आवास योजनेची सोडत रद्द केल्याने गोंधळ;आयुक्तांवर माफी मागण्याची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवस्ती येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

पिंपरी - चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये पंतप्रधान आवास योजना सोडत. आशा आणि उत्सुकतेपोटी अर्जदारांची प्रचंड गर्दी. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत का नाही? या प्रश्‍नावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांचे काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केल्याने गोंधळ सुरू झाला. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते सोडत होणार होती. यातच ती रद्द करण्याचा आयुक्तांनी निर्णय अचानक जाहीर केला. यातून वातावरण संतप्त झाले. महापौरांसह सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित करीत आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मारला. यावर अखेरीस माझ्याकडून राजशिष्टाचार पाळला गेला नाही, असे म्हणत आयुक्तांनी सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली. उद्‌घाटनाच्या वादावरून रंगलेल्या अशा नाट्यमय घडामोडीमुळे सोडतीपेक्षा राजकीय चर्चा रंगली. 

महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवस्ती येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेची सोडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काढण्यात येणार होती. मात्र, कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना राजशिष्टाचारानुसार निमंत्रित का केले नाही, असा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सविस्तर पत्रक काढून भाजपची दादागिरी सहन करणार नाही, पालकमंत्री यांच्या हस्ते सोडत निघाली नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. याला प्रत्युत्तर देणारे व आपली बाजू मांडणारे पत्रक रविवार सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिद्धीस दिले होते. यामुळे कार्यक्रम होणार की नाही? याविषयी चर्चा सुरू होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नियोजनानुसार सोडतीचा कार्यक्रम होणार असल्याने प्रचंड संख्येने अर्जदार सोडतस्थळी आले होते. सोडतीची व्यवस्था पूर्ण झाली होती. टेबल मांडणीपासून कर्मचारी नियुक्ती होती. सोशल डिस्टन्सिंग म्हणून पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था केली होती. गोंधळ होण्याची शक्‍यता गृहीत धरून मोठा पोलिस बंदोबस्तही होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप निषेधार्थ जोरजोरात घोषणा द्यायला सुरूवात केली. इथूनपुढे सोडतीच्या ठिकाणचे वातावरण बदलले. उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनीही सोडत सुरू करण्याचा ठेका धरला. याचवेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोडत रद्दचा निर्णय घेतला. 

सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​

कार्यक्रम रद्द केल्याची नामुष्की ओढवल्यामुळे भाजपचे पदाधिकारी संतप्त होऊन महापालिकेत आले. आयुक्तांच्या दालनासमोर महापौर उषा ढोरे, स्थायी सभापती संतोष लोंढे, भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, उपमहापौर केशव घोळवे, विलास मडेगिरी, मोरेश्‍वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन, सीमा सावळे, आशा शेंडगे, सोनाली गव्हाणे, शिक्षण सभापती मनीषा पवार, कमल घोलप, शारदा बाबर, सुनीता तापकीर, शीतल शिंदे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड आदींनी ठिय्या मांडला. सर्व जण आयुक्तांच्या निषेधार्थ घोषणा देत आपला राग व्यक्त करीत होते. सोडत रद्द का केली? कोणाच्या आदेशावरून हा निर्णय घेतला? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. वातावरण अधिक तप्त झाल्याने आयुक्त केबिन बाहेर आले. तसेच सोडतीमागील कारणे, गोंधळ का झाला, राजशिष्टाचाराचे पालन कसे झाले नाही, असे सांगत माफी मागितली. 

पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​

एवढे अर्जदार झाले पात्र 
शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी एकूण 47 हजार 878 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे चऱ्होली एक हजार 442, रावेत 934, बोऱ्हाडेवाडी एक हजार 288 अशा तीन हजार 664 घरांसाठी सोडत येणार होती. काढण्यात येईल. या सोडतीनंतर सदनिकेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार होती. परंतु सोडतच रद्द झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर टीका करत संताप व्यक्त केला. 

नियम पायदळी 
कोरोनामुळे सरकारच्या सर्व नियमांनुसार सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. नागरिकांनी कार्यक्रमस्थळी गर्दी करू नये, त्यासाठी महापालिकेने सोडतीचा पूर्ण कार्यक्रम महापालिका फेसबुक पेजवर, युट्यूबद्वारे लाइव्ह दाखविला. परंतु प्रत्यक्षात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांचा ताफा पाहून परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. 

'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Withdrawal of pm awas yojna lottery canceled in pimpri chinchwad