esakal | चिंचवडमध्ये महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

चिंचवडमध्ये महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘तुझा नवरा कुठे गेला आहे, त्याला केस मागे घ्यायला लाव’, असे म्हणत तीन जणांनी मिळून एका महिलेला घरात शिरत मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील पत्राशेड येथे घडली.
याप्रकरणी चिंचवडमधील श्रीधरनगर येथील लिंकरोडवरील पत्राशेड येथे राहणाऱ्या महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक गायकवाड, शीला गायकवाड, सारिका सिरसाठ (सर्व रा. पत्राशेड झोपडपट्टी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी या शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घर होत्या, त्यावेळी आरोपी त्यांच्या घरात शिरले. ‘तुझा नवरा कुठे गेला आहे, त्याला केस मागे घ्यायला लाव’, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांचे हातपाय पकडून मारहाण केली. तसेच, आरोपी अभिषेक याने हॉकीस्टीकने फिर्यादी यांच्या डाव्या पायावर मारून गंभीर जखमी केले.

हेही वाचा: थलायवी: संघर्षमय जीवनप्रवासाची उत्तम मांडणी

सुसगावात घरफोडीत

दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सुसगाव येथे घडली. याप्रकरणी संतोष सानप (रा. ठकसेननगर, सुसगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा कुलूप लावून बंद होता. त्यावेळी अज्ञात चोरटा कडीकोयंडा तोडून घरात शिरला. कपाटाचे कुलूप तोडून दोन लाख ६३ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

महिलेला शिवीगाळ
दापोडी येथे महिलेच्या घरासमोर बेकायदेशीररीत्या जमाव जमविला. तसेच, तिच्याशी गैरवर्तन व शिवीगाळ करीत विनयभंग केला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला. सनी गायकवाड, विकी गायकवाड, जय गायकवाड व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीरपणे फिर्यादी यांच्या घरासमोर जमाव जमविला. फिर्यादी यांचे दीर व पुतण्या कोठे आहेत, अशी विचारणा करीत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलीला केसांना पकडून ढकलून दिले. शिवीगाळ करीत फिर्यादीशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच, फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली.

हेही वाचा: Pimpri : अभियंत्याच्या घरी बाप्पांचे ‘वर्क फ्रॉम होम’

मोबाईल हिसकावला
मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावला. ही घटना चिंचवडमधील संभाजीनगर येथे घडली. याप्रकरणी ऋषीकेश भिंगारदे (रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी हे रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवडमधील संभाजीनगर येथून रस्त्याने पायी जात होते. क्रीडा संकुलजवळ आले असता पाठीमागून दोन दुचाकीवरून चारजण आले. त्यातील एका दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने ऋषीकेश यांच्या हातातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर सर्व चोरटे संभाजीनगरच्या दिशेने पसार झाले.

विनयभंगप्रकरणी गुन्हा
कासारवाडी येथे महिलेचा वारंवार पाठलाग करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. विकास राक्षे (रा. कासारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी व फिर्यादी हे एकाच ठिकाणी राहत असून, आरोपीने फिर्यादीचा वारंवार पाठलाग केला. त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.

loading image
go to top