Mukund Gosavi: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते राजा गोसावी हे अभिनय क्षेत्रातील हिरा होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक हिट चित्रपटात काम केलं. त्यांनी एक काळ गाजवला. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना वाईट दिवसांना सामोरं जावं लागतंय. ४ ऑगस्ट रोजी पुण्यात जोरदार पाऊस झाला होता. या पावसात अनेकांच्या घरात पाणी गेलं. त्यात राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू मुकुंद गोसावी आणि त्यांची पत्नी विद्या यांचं घरही होतं.
पुण्यातील सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडी येथे असलेल्या त्यांच्या घरात तीन वेळा पाणी शिरलं. त्यामुळे त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला. त्यानंतर त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही. ना कुणी विचारपूस केली. सरकारकडून त्यांना घराची कागदपत्र दिलीयेत पण घराचा पत्ताच नाहीये. याबद्दलची व्यथा त्यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मांडली.
त्यादिवसाबद्दल मुलाखतीत बोलताना मुकुंद म्हणाले, 'राजाभाऊ माझे वडीलबंधू. त्यांनी मला रंगभूमीवर उभं केलं. ते ४५ वर्ष मी रंगभूमीवर काम केलं. आता त्याचं हे फळ मिळतंय. २२०० रुपये मला पेन्शन मिळतंय. अजून काहीच नाही. ही या वयात लोकांचा स्वयंपाक करते त्यातून ५-७ हजार रुपये मिळतात. त्यावर आमचा उदरनिर्वाह आहे. मी कामं करतो. यापूर्वी २०१९ साली आमच्या घरात पहिल्यांदा पाणी शिरलं. तेव्हा आम्ही झोपलेलो होतो. लाइट गेली. खाली गुडघ्यापर्यंत पाणी होतं. आम्हाला बाहेर पडायलाही संधी नव्हती. आम्ही फोन केला तरी कुणी उचलायला तयार नाही. आता जो पूर आला त्यात कालच घरात चौथ्यांदा पाणी आलंय.'
नटसम्राटाच्या नाण्याची दुसरी बाजू मी
ते पुढे म्हणाले, 'पाणी आल्यामुळे फ्रिज खराब झाला, वाशिंग मशिन गेली. सगळं फर्निचर फुगलंय. आणि आता हे सारखं होतं त्यामुळे मी टेबल घेतला आणि खाण्याच्या सगळ्या वस्तू टेबलवर ठेवल्या. आता आमची पाण्यापासून जवळ आणि पाहुण्यांपासून लांब अशी अवस्था झालीये. पाहुणे कुणीच यायला तयार नाही. आता एवढं पाणी येऊन गेलं. कुणी चौकशी करायला तयार नाही. सगळीकडून पाणी नुसतं पाहत बसायचं. माझ्या मुलाला काविळ झाली होती. १४ वर्ष झाली तो गेला. मुलांच्या समोर नटसम्राटाने प्राण सोडला. पण अभिनेत्याच्या समोर मुलं प्राण सोडतात तेव्हा काय होतं मला विचारा. नटसम्राटाच्या नाण्याची दुसरी बाजू मी आहे.'
घराचा पत्ताच नाही
मुकुंद दुःख व्यक्त करत म्हणाले, 'मला कुणाचाच आधार नाहीये. म्हातारपणाची काठी परमेश्वराने हिसकावून घेतली. त्याला मी काय बोलू. यावर मुकुंद यांच्या पत्नी विद्या म्हणाल्या, 'हे ७० लोकांचं कुटुंब होतं. राजा भाऊ मला म्हणाले, आम्ही तुझ्या संसारात लुडबुड करणार नाही. तू सगळं सांभाळायचं. मग मी छोटी मोठी कामं केली. आता माझा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. मी ७ ला बाहेर जाते १२ ला येते. पुन्हा ४ ते ५ एक काम असतं. परमेश्वर आणि आपण. कुणाला काही मागायचं नाही, हे आपल्या तत्वांमध्ये आहे. श्रीमती आली तर माजायचं नाही, गरिबी आली तर लाजायचं नाही.'सरकारकडून आम्हाला पूरग्रस्त म्हणून १ बीएचके दिलाय. संपूर्ण कागदपत्र तयार आहेत पण अजून किल्लीच ताब्यात दिलेली नाही. याला काय म्हणायचं आपलं कर्म.'
मुकुंद यांनी अव्याहतपणे रंगभूमीची पूजा केली आहे. 'पुण्यप्रभाव', 'एकच प्याला', 'लग्नाची बेडी' नवरा माझ्या मुठीत गं', 'नटसम्राट', 'अग्निपथ', 'येडं पेरलं खूळं पेरलं' अशी नाटकं केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.