

New CCFs-2026 scheme relief
esakal
प्रियांका कुलकर्णी - priyankakulkarni2201@gmail.com
नवउद्योग सुरू करताना उद्योजकांचे लक्ष प्रामुख्याने कल्पना, उत्पादन, ग्राहक आणि गुंतवणूक यांवर केंद्रित असते. मात्र, कंपनी स्थापन केल्यानंतर वेळेवर कादेशीर नियमांचे अनुपालन पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे असते. अनेक नवउद्योग केवळ अनुपालनातील त्रुटींमुळे अडचणीत येतात. अशा कंपन्यांना पुन्हा कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) लागू केलेली कंपन्यांसाठी अनुपालन सुलभीकरण योजना २०२६ (सीसीएफएस-२०२६) ही मोठा दिलासा देणारी ठरू शकते.
गेल्या काही वर्षांत उद्योजकतेवरील दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि भारतातील वाढती नवउद्योग संस्कृती यांमुळे अनेक तरुण-तरुणींनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहिले आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची कल्पना प्रत्यक्षात आणायची, नवे उत्पादन किंवा सेवा विकसित करायची, गुंतवणूकदारांसमोर व्यवसाय मांडायचा आणि पुढे देशात किंवा जगात नाव कमवायचे, अशी इच्छा अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. या स्वप्नाला आकार देण्यासाठी अनेक जण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतात. कारण गुंतवणूक उभारणे, भागभांडवल वाटप करणे, नव्या गुंतवणूकदारांना सहभागी करून घेणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे या सर्व गोष्टी कंपनीच्या माध्यमातून तुलनेने अधिक सुलभ होतात.