esakal | कोरोनोत्तर शिक्षणाला दिशा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनोत्तर शिक्षणाला दिशा}

कोरोना कालावधीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असून, जीवन शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे. आचार्य विनोबा भावे यांचे शिक्षण विचार या काळात दिशा देतात. विनोबांच्या मते, शिक्षक-विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी-शिक्षक परायण असावेत, दोघे ज्ञान परायण असावेत आणि ज्ञानसेवा परायण हवे.

- संतोष पुरोहित, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती

कोरोनोत्तर शिक्षणाला दिशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विनोबांना अभिप्रेत असलेली शिक्षणप्रणाली ही अपूर्णातून पूर्णाकडे नेणारी नसून एका पूर्णाकडून दुसऱ्या पूर्णाकडे नेणारी आहे. मनुष्य मूलतः पूर्णच असतो. त्याचा शोध घेत विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. मानवाच्या गुणांचा विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षण हे जीवनाचे व जीवनासाठी असल्याने ते जीवन जगताना व जीवनाच्या क्षेत्रात दिले गेले पाहिजे, हे समजावताना ते उदाहरण देतात, ‘गीता ही प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात सांगितली म्हणून ती अर्जुनाला पचली. पुस्तके शब्द शिकवतात; मात्र त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष जीवनाकडे वळणे क्रमप्राप्त आहे. अश्व म्हणजे घोडा. घोडा जाणून घ्यायचा असेल तर तबेल्यात जाऊनच जाणून घ्यावा लागेल.’

हेही वाचा: अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’

एकदा भूदान यात्रेवेळी त्यांचा मुक्काम एका शाळेत होता. ज्या वर्गात ते उतरले होते तिथे त्या वर्षी शाळेला किती सुट्ट्या याची यादी टांगलेली होती. लहान-मोठे एकूण चाळीस सण व त्यांच्या पंचावन्न सुट्ट्या. ही यादी पाहून ते म्हणतात, आपल्या देशात अनेक धर्म आणि तशा सुट्ट्या. मुलांच्या पदरात या सुट्ट्यांच्या निमित्ताने सहजच सर्वधर्म समभाव पडतो. सुट्ट्या कधी असाव्यात यावर ते सांगतात, साहेबाला उन्हाळा सहन होत नव्हता म्हणून उन्हाळ्यात सुट्ट्या पण खरी सुट्टी पावसाळ्यात पाहिजे. पावसाळ्यात शेतकरी शेतात काम करत असतो त्या वेळी सुट्टी असेल तर मुलांना त्यांच्यासोबत शेती जाणून घेता येईल.

निर्भयतेच्या आधारावर सगळे शिक्षण उभारण्यात आले पाहिजे. निर्भयता म्हणजे कोणाला न घाबरणे आणि कोणाला न घाबरवणे. दोन्ही मिळून निर्भयता बनते. विज्ञान शिक्षणाबाबत ते सांगतात, युरोप, अमेरिकेत अनेक नवीन शास्त्रे निघाली आहेत. त्यांच्याकडून आपणास बरेच शिकायचे आहे. विज्ञानाच्या बाबतीत हे लक्षात घेतले पाहिजे की, ते जलद गतीने पुढे जात आहे. जुने विज्ञान अल्पावधीत मागे पडते म्हणून आपल्याला अनेक नव्या नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. या बाबतीत आपण संकुचित राहता काम नये.

हेही वाचा: आपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज

साधारण एकाच कालावधीमध्ये दोन टोकावर राहणारे कार्व्हर आणि विनोबा; मात्र टस्कगी स्कूलमध्ये जे प्रयोग कार्व्हर करत होते त्याचप्रमाणे आपल्याकडील विद्यालय आणि महाविद्यालय असावीत, असे विनोबा सांगत होते. मी जर कॉलेज काढले तर त्या कॉलेजातल्या कोणाही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला काहीही घरातून आणण्याची परवानगी मी देणार नाही. मी त्यांना असे सांगेन की, तुम्हाला पाहिजे असेल तेवढी जमीन आणि पाहिजे असतील तेवढी अवजारे मी तुम्हाला देतो. संशोधनासाठी प्रयोगशाळा देतो. काय पाहिजे असेल ते देतो. ग्रंथांचा, साधनांचा तुटवडा पडणार नाही; परंतु तुमचे विद्यार्थी आणि तुम्ही दोघे मिळून आजीविका संपादन करा आणि ते करताना ज्ञानवृद्धी कशी होते ते सिद्ध करा.

हसतखेळत शिक्षण झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. विद्यार्थ्याला आपण शिक्षण घेत आहोत असा भाव झाला की, शिक्षणातले स्वारस्य गेलेच म्हणून समजा. लहान मुलांना खेळणे हा उत्तम व्यायाम आहे, असे सांगण्यात येते. त्यातील रहस्य हेच आहे. खेळामध्ये व्यायाम होत असतो पण मी व्यायाम करत आहे, अशी जाणीव नसते. तद्वत शिक्षण म्हणजे आनंद आहे. ही नैसर्गिक आणि जोमदार भावना उत्पन्न झाली पाहिजे. शिक्षक शिक्षण देत आहेत आणि विद्यार्थी घेत आहेत, हा भेद नसावा. मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवे यावर त्यांचा जोर होता.

go to top