

Gold Price Outlook and Key Factors in 2026
esakal
महेंद्र लुनिया
सोन्याच्या भावाने गेल्या काही काळात विक्रमी पातळी गाठतानाच मोठे चढ-उतारही अनुभवले आहेत. त्यामुळे सोन्याचा हा तेजीचा प्रवास किती काळ टिकणार, पुढील काळात कोणते घटक भावाला दिशा देतील आणि भारतीय गुंतवणूकदारांनी कोणत्या संकेतांकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोन्याला भारतीयांच्या गुंतवणुकीत आणि संपत्तीच्या नियोजनात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. मात्र, गेल्या काही काळात सोन्याच्या भावातील वेगवान चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,
तो म्हणजे सोन्याचा हा तेजीचा प्रवास पुढेही कायम राहणार का? त्याचे उत्तर देण्याचा हा प्रयत्न...
सोन्यासाठी २०२६ हे वर्ष मोठ्या चढ-उतारांचे ठरले आहे. सोन्याने प्रति १० ग्रॅम १ लाख ८१ हजार रुपयांची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर १ लाख ३९ हजार रुपयांपर्यंतची यंदाची नीचांकी पातळीही पाहिली. त्यावेळी आम्ही स्पष्ट केले होते, की सोन्याचा भाव १ लाख ४० हजार रुपयांच्या खाली फार काळ टिकणार नाही. त्यानंतर सोन्यामध्ये पुन्हा एकदा तेजीची सुरुवात झाली आणि अपेक्षेप्रमाणे भावांनी पुन्हा वरची वाट धरली. विशेष म्हणजे, सोन्यातील तेजी अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही सोन्याच्या तेजीच्या नव्या पर्वाची जोरदार सुरुवात मानता येईल. आता प्रश्न असा आहे, की सोन्याच्या भावाला पुढील काळात कोणते घटक चालना देऊ शकतात? त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे.