Inflation Management
esakal
ॲड. प्रतिभा देवी - pratibhasdevi@gmail.com
आरतीनंतर मयूरेशने श्री गणेशाकडे प्रार्थना करताना एक तक्रारवजा विनंती केली.
मयूरेश : श्रीगणेशा, यंदा उत्पन्न वाढलं; पण खर्च त्याच्यापेक्षा जास्त वेगाने वाढला.
श्रीगणेश : यंदा किराणा, भाजी, पेट्रोल, शिक्षण, औषधं आणि गणपतीची सजावटही महाग झाली आहे, असं म्हणतोयस ना? म्हणजे महागाईने माझ्यापेक्षा आधीच तुझ्या घरात प्रवेश केला वाटतं!
श्रीगणेश : पण माझ्या आगमनासाठी खर्च करताना तू कधी बजेट करतोस का?
मयूरेश : बजेट? श्रीगणेशा, तुमच्यासाठी बजेट कसले?
श्रीगणेश : भक्ती मनापासून कर; पण खर्च डोक्याने कर.
मयूरेश : श्रीगणेशा, महागाईला थोडं समजवा ना! तिला खाली बसायला सांगा.
श्रीगणेश : महागाई माझं ऐकणार असती, तर मी आधी मोदकांची किंमत कमी केली असती. तुला माहीतच आहे, मला मोदक किती आवडतात!
मयूरेश : मग आम्ही काय करायचं?
श्रीगणेश : महागाई थांबवणं तुझ्या हातात नाही; पण महागाईपेक्षा वेगाने तुझ्या संपत्तीची वाढ कशी होईल, याचा विचार करणं तुझ्या हातात आहे.
मयूरेश : म्हणजे?
श्रीगणेश : फक्त पैसा बचत खात्यात ठेवून भागणार नाही. काही पैसा आपत्कालीन निधीसाठी, काही सुरक्षित बचतीसाठी आणि काही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ठेव.
मयूरेश : पण श्रीगणेशा, माझ्या हातात महिन्याच्या शेवटी पैसेच उरत नाहीत!