

Gold rate fluctuations
esakal
मंजूषा कुलकर्णी - sarkarnama@esakal.com
पश्चिम आशियातील युद्धाच्या वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात मात्र घसरण झाली आहे. अनिश्चिततेच्या काळात मागणीत घट होत असल्याने सोन्याचा भाव स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर अनेक पातळ्यांवर होतो. त्यातील सर्वांत संवेदनशील क्षेत्र म्हणजे मौल्यवान धातू विशेषतः सोने आणि चांदी. इतिहासात मोठ्या युद्धांच्या काळात या धातूंच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास, चलनातील अस्थिरता, औद्योगिक मागणी आणि सुरक्षित गुंतवणुकीची गरज या सर्व घटकांमुळे युद्धाचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम या क्षेत्रावर होतो. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. या काळात जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीने १०० डॉलरचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत अस्वस्थता पसरली आहे. सामान्यतः युद्धाच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, ज्यामुळे सोन्याचे दर वाढतात. मात्र, यावेळी डॉलर मजबूत राहिल्याने अन्य देशांसाठी सोने महाग झाले असून मागणीत घट झाली आहे. जागतिक सुवर्ण व्यापाराचे केंद्र असलेल्या दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) युद्धामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. विमानसेवा बंद असल्याने सोन्याची निर्यात करणे कठीण झाले असून, व्यापाऱ्यांनी लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या (एलबीएमबी) दरांवर प्रति औंस ३० डॉलरपर्यंत सवलत देऊ केली आहे.