

Mutual Fund Investment Strategy
esakal
मुकुंद लेले - mukundlelepune@gmail.com
भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल, म्युच्युअल फंड उद्योगाचे बदलते स्वरूप, ‘एसआयपी’चे वाढते प्रमाण, महाराष्ट्रातील वाढती गुंतवणूक-संस्कृती, टियर-२ आणि टियर-३ शहरांमधून निर्माण झालेल्या नव्या संधी, Gen Z गुंतवणूकदार, गिफ्ट सिटी, ‘एआयएफ’ आणि बाजारपेठेतील आगामी संधी व आव्हाने याबाबत आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे (म्युच्युअल फंड) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमणियन यांनी ‘सकाळ मनी’शी सविस्तर संवाद साधला. त्यातील निवडक अंश...
बालसुब्रमणियन : बाजारातील अस्थिरता ही गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक घसरणीला संकट म्हणून पाहण्याऐवजी दीर्घकालीन संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. हा फंड बाजारातील मूल्यांकन आणि जोखीम लक्षात घेऊन इक्विटी आणि डेटमधील वाटप बदलतो. त्यामुळे अस्थिरतेचा परिणाम काही प्रमाणात कमी करता येतो.
बालसुब्रमणियन : नाही. गेल्या तीन दशकांत भारतीय गुंतवणूकदार खूप परिपक्व झाले आहेत. बाजारातील तात्पुरत्या घसरणींना ते आता वेगळ्या नजरेने पाहतात. पूर्वी घसरण झाली, की मोठ्या प्रमाणात ‘रिडम्प्शन’ म्हणजे पैसे काढले जात असत. आता परिस्थिती बदलत आहे. अनेक गुंतवणूकदार घसरणीच्या काळात गुंतवणूक वाढवण्याचा विचार करताना दिसत आहेत.
बालसुब्रमणियन : गेल्या दोन-तीन वर्षांत गुंतवणूक सुरू केलेल्या तरुणांना प्रथमच बाजारातील अस्थिरतेचा अनुभव येत आहे. पण ते घाबरलेले नाहीत. ते शिकत आहेत. त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व समजू लागले आहे. ही पिढी तंत्रज्ञान-सक्षम आहे आणि माहिती मिळवण्यातही अधिक पुढे आहे. त्यामुळे भविष्यात भारतातील गुंतवणूक-संस्कृती अधिक मजबूत होईल.