pakistan using girls social media accounts target indian peoples part 2
pakistan using girls social media accounts target indian peoples part 2

फेसबुकवरच्या पाकिस्तानी विषकन्या भाग-2 

निशांत अगरवालला बहुधा तोवर कल्पनाही नव्हती, की आपण एका मोठ्या हेरगिरी जाळ्यात अडकलो आहोत. त्याला हेही माहिती नसावे, की त्याच्या त्या मैत्रिणी - सेजल कपूर, नेहा शर्मा आणि प्रिया रंजन या सगळ्याच आभासी विषकन्या आहेत. विषकन्या. 
विशाखादत्तच्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकाने प्रसिद्ध केलेली ही संकल्पना. भारतीय हेरगिरीच्या इतिहासातील एक प्रचंड लोकप्रिय दंतकथा.

लहानपणापासून कणाकणाने विष भरवून वाढविलेल्या या सुंदरी. त्यांचा वापर राजकीय हत्यांसाठी केला जाई अशा या कथा सांगतात. चाणक्य तथा कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तिचा उल्लेख आहे असे सांगितले जाते. तेथे विषाचे अनेक प्रकार. तेथे हेर म्हणून स्त्रीयांचा कसा वापर करायचा याचे उल्लेख आहेत. पण विषकन्येचा उल्लेख नाही. चाणक्याच्या संदर्भात तो येतो मुद्राराक्षसात. त्यात चंद्रगुप्त मौर्याचा वध करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या विषकन्येला चाणक्य पर्वतक राजाकडे पाठवतात. तिच्याशी संबंध आल्याने त्या राजाचा मृत्यू होतो आणि चंद्रगुप्ताचा मार्ग निष्कंटक होतो. हीसुद्धा एक दंतकथाच. कारण तसा पर्वतक राजा नव्हताच मुळी. 

खरेतर जिच्या नुसत्या श्वासाने माणसे मरत, जिच्या केवळ चुंबनाने यमलोकास जात अशा विषकन्या ही कवीकल्पनाच. त्या असतीलही कदाचित. त्यांचा देह वर्षानुवर्षांच्या विषसेवनाने विषारी झालेलाही असेल कदाचित. परंतु त्या सेवनामुळे झाले असेल एवढेच, की त्यांच्यातील विषाबाबतची प्रतिकारशक्ती प्रचंड वाढली असेल. एवढेच. शत्रूकडे गेल्यावर त्याला त्या मद्यातून, अन्नातून वगैरे विष पाजत असतील.

त्याआधी त्याचा विश्वास बसावा म्हणून त्या ते स्वतः प्राशन करीत असतील. त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही हे पाहून शत्रू ते विश्वासाने प्राशन करून मग मरत असेल. हा झाला एक भाग. पण ख-या विषकन्या म्हणजे शत्रूपक्षाला भुलवणा-या, त्याच्याकडून गुप्त माहिती काढून घेणा-या, प्रसंगी हत्या करणा-या स्त्रीहेर. तेव्हा चाणक्य जेव्हा अशा हेर-तरुणींचा उल्लेख करतात तेव्हा तो असतो केवळ ‘हनीट्रॅप’बद्दलचा. निशांत अगरवाल अडकला होता तो याच हनीट्रॅपमध्ये - विषकन्यांच्या सापळ्यामध्ये. 

पण त्याला हेही ठावूक नव्हते, की फेसबुकमधल्या त्या विषकन्याही आभासीच होत्या. बनावट होत्या. इस्लामाबादेतल्या आबपारा भागामधल्या आयएसआयच्या मुख्यालयात बसलेला कोणी लांब दाढीवाला संगणकतज्ज्ञ हाच सेजल होता, तोच नेहा शर्मा होता आणि प्रिया रंजनही. फेसबुकवरून भारतीय सैनिक, लष्करी वा सरकारी अधिकारी, वैज्ञानिक यांच्याशी मैत्री करायची. त्यांना आमिषे दाखवायची. कधी आर्थिक, कधी लैंगिक सुखाची. प्रसंगी त्यावरून ब्लॅकमेल करायचे आणि त्यांच्याकडून कळत-नकळत गोपनीय माहिती काढून घ्यायची असा त्यांचा उद्योग.

हे सारे पाकिस्तानातून होत असले, तरी ते केले जात होते वेगळ्याच देशातील सर्व्हरवरून. त्यामुळे त्यांचा पत्ता लावणेही कठीण. आणि अगदी त्यांचा आयपी अॅड्रेस शोधला तरी त्यावरून ते पाकिस्तानी आहेत हे सिद्ध करणेही अवघड. सेजल कपूर ही त्यातली एक ‘यशस्वी’ हॅकर मानावी लागेल.

2015 ते 2018 या तीन वर्षांत तिने तब्बल 98 भारतीयांना गळाला लावले होते. लष्कर, वायुसेना, नौसेना, अर्धसैनिक बले, तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोलिस अशांचा त्यात समावेश होता. हे सारे तसे राष्ट्रप्रेमी नागरिकच. कदाचित त्यातील अनेकांच्या व्हाट्सअॅपवर तिरंग्याचे डीपी असेल. तथाकथित राज्यद्रोह्यांविरोधात ते ट्विप्पण्याही करीत असतील. फेसबुकवर पाकिस्तानविरोधात पोस्टही लिहित असतील. आणि असे असूनही ते पाकिस्तानच्या आयएसआयला मदत करीत होते. ते जाणता असेल वा अजाणता. काहीही असले, तरी तो हेरगिरीचा गुन्हाच. 

निशांत अगरवाल याच्या सारख्या वैज्ञानिकाला खरे तर समाजमाध्यमांचा वापर अशा कामासाठी केला जाऊ शकतो याची जाणीव असायला हवी होती. स्पायवेअर आणि मालवेअर यांबाबतची माहिती त्याला असायला हवी होती. पण तरीही त्याने केवळ अमेरिकेतील नोकरीच्या मोहाने त्या सेजल कपूरशी संबंध वाढवले. आपल्या लॅपटॉपमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंबंधीची गोपनीय माहिती आहे हे माहित असूनही त्याने सेजल सांगेल ती अॅप्स डाऊनलोड करून घेतली.

आता ब्राह्मोसमधील सगळे संगणक आणि लॅपटॉप यांच्यात एक विशेष तंत्र वापरलेले असते. त्यातील फाईल कोणीही कॉपी करू शकत नाही. आयएसआयने त्यावरही तोडगा काढला होता. सेजलने त्याच्या लॅपटॉपमध्ये ‘ग्रॅव्हिटी रॅट’ नावाचे मालवेअर इन्स्टॉल केले होते. त्याच्या साह्याने ती निशांतच्या संगणकातील फाईल डाऊनलोड नाही, पण वाचू मात्र शकत होती. सेजल ही पाकिस्तानी विषकन्या आहे हे त्याला माहित नव्हते, म्हणून आपण त्याला बळी म्हणू शकतो. 

अच्युतानंद मिश्र याचे मात्र तसे नव्हते. तो बीएसएफचा जवान. त्यामुळे तो आपोआपच राष्ट्रप्रेमाचे प्रमाणपत्र पात्र. काजोल शर्मा ही पाकिस्तानी आहे हे त्याला माहित होते. तिचा व्हाट्सअॅप क्रमांक त्याने ‘पाकिस्तानी दोस्त’ या नावानेच साठवून ठेवलेला होतो. आणि तरीही तो तिला हवी ती संवेदनशील माहिती पुरवत होता. दोन मुलांचा बाप तो. आपण नेमके काय आणि कुणासाठी करीत आहोत हे न समण्याएवढा काही तो दूधखुळा नव्हता. तरीही तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत होता.

हे सारे केवळ तिची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती पाहून नव्हे. त्यात पैशाचाही व्यवहार झाला असल्याचा एटीएसला संशय होता. त्याला ‘ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट’अंतर्गत 19 सप्टेंबर 2018 रोजी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून 9 ऑक्टोबर 2018 रोजी निशांतला अटक करण्यात आली. दोघेही अजून तुरुंगात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com