Facebook Honey Trap by Pakistan
Facebook Honey Trap by Pakistan

फेसबुकवरच्या पाकिस्तानी विष कन्या भाग - 3

च्युतानंद मिश्र हा या देशातील कोट्यवधी अल्पशिक्षित, असुसंस्कृतांतला एक. तो कसाबसा हायस्कूलमधून बाहेर पडला होता. त्याला गांजासारखे व्यसनही होते. स्त्री म्हणजे लैंगिक खेळणे ही त्याची मनोवृत्ती होती. वेश्यागमन तर तो करीतच असे. पण जाता-येता मुलींची छेड काढण्याचे आरोपही त्याच्यावर होते. आत्मप्रतिष्ठेची कमतरता हे अशा व्यक्तींचे एक व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे हातात फेसबुक, व्हाट्सअॅप यांसारखी माध्यमे येताच त्यातून हे लोक आपली ओळख प्रतिष्ठापित करण्याचा, प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतात. झुंडीत सुरक्षा शोधण्याचा प्रयत्न करतात.

फेसबुक वा व्हाट्सअॅप यांसारख्या माध्यमांतून समविचारींची एक ‘इकोचेंबर’ तयार होत असते. ती काही प्रमाणात आभासी झुंडच. अशा व्यक्तींच्या अहम् ला कोणी कुरवाळले, त्यांच्या मनातील आदिम पाशवी भावनांना भडकाविले की ते त्या व्यक्तीचे मानसिक गुलाम बनतात. अच्युतानंद त्याच्या पाकिस्तानी मैत्रिणीसाठी वाट्टेल ते करीत होता त्यात जेवढा लैंगिक आकर्षणाचा भाग होता, तेवढाच तिच्याकडून होत असलेल्या ‘इगो-मसाज’चा, त्याच्या अहम्ला कुरवाळण्याचाही मोठा हात होता. हे झाले एका अल्पशिक्षित व्यक्तीबाबत. पण आयएसआयच्या विषकन्यांची शिकार केवळ असेच लोक होत नव्हते. अरुण मारवाह यांच्यासारखा सुशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारीही या विषकन्यांच्या लैंगिक खेळास बळी पडत होता. पाहण्यासारखी आहे मारवाह यांची कहाणी. 

ते वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन. आग्र्यातील वायुसेनेच्या प्रशिक्षण तळावरील पॅरा डिव्हिजनमधील प्रशिक्षक. या तळावर संरक्षण दलाच्या तिन्ही विभागांतील कमांडोंना प्रशिक्षण देण्यात येते. मारवाह यांनी तेथे वायुसेनेच्या गरुड आणि नौसेनेच्या मार्कोस या खास दलांच्या कमांडोंना प्रशिक्षण दिले होते. पुढे त्यांची ‘वायुभवन’मध्ये जॉईंट डायरेक्टर (पॅरा ऑपरेशन्स) म्हणून बदली झाली. अनेक ‘टॉप सिक्रेट’ फायली त्यांच्या टेबलवरून जात-येत असत. 

अशा या अधिका-याला समाजमाध्यमांची मोठी चटक. वास्तविक त्यांच्यासारख्या अधिका-यांनी फेसबुकपासून लांबच राहायला हवे. संरक्षण दलांचा नियमच आहे तसा. आपली, आपल्या दलाची ओळख जाहीर होईल, आपण कोणते काम करतो, कुठे असतो, कुठे जातो अशा गोष्टी समाजमाध्यमांतून जाहीर करण्यास मनाई असते सैन्याधिका-यांना. पण मारवाह हे असे अधिकारी होते, की उठता-बसता आपली छायाचित्रे टाकत होते फेसबुकवर. कधी विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारतानाची, कधी आपल्या कुटुंबियांसमवेतची छायाचित्रे. त्यांच्या पदामुळे त्यांच्या या छंदाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण तोच छंद त्यांना नडला. 

फेसबुकवर एके दिवशी त्यांना एका तरुणीची मैत्रीविनंती आली. तिचे नाव किरण रंधावा. एखाद्या मॉडेलसारखी सौंदर्यवती अशी ती तरूणी. मारवाह पाघळले. त्यांनी तिची मैत्रीविनंती स्वीकारली. मग पुढे जे घडले ते हनीट्रॅपच्या रुळलेल्या तंत्रानुसारच. प्रारंभी एकमेकांच्या पोस्टला लाईक देणे, प्रतिक्रिया देणे असे सुरू झाले. हळुहळू त्यांची ऑनलाईन घसट वाढली. आधी आडूनआडून चावट गप्पा सुरू झाल्या. चावट ध्वनिचित्रफिती एकमेकांना पाठवणे सुरू झाले.

नंतर नंतर हे सारे अधिकच अश्लीलतेकडे झुकले. चांगल्या कुटुंबातील, विवाहित असा एकावन्न वर्षांचा तो प्रौढ जाणता अधिकारी. आणखी एका वर्षाने निवृत्त होणार होता. पण त्या विषकन्येच्या आहारी गेला तो. हे सुरू असतानाच किरण रंधावा हिचा संदर्भ देऊन त्यांना आणखी एका तरुणीची मैत्रीविनंती आली. तारीख होती 8 जानेवारी 2018. त्या तरुणीचे नाव महिमा पटेल. तीही विषकन्याच. पुरुषाकडून माहिती काढून घेण्याची जगातील एक सर्वांत जुनी युक्ती तिने त्याच्यावर वापरली. 

फेसबुक मेसेंजरवरून गप्पा मारता मारता तिने त्याला विचारले, ‘तू खरोखरच भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन आहेस का? की उगाच थापा मारतो आहेस तशा? तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा मी?’

झाले. त्याने तिला आपली खरी माहिती दिली. रॅंक, करीत असलेले काम वगैरे गोष्टी सांगितल्या. मोठ्या खुबीने ती त्याला प्रश्न विचारायची आणि तो तिला हवी ती माहिती द्यायचा. अगदी संवेदनशीलही. याच बरोबर त्यांच्या सुरस चावट गप्पा सुरूच होत्या. 

ते पुरते जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर या विषकन्यांनी त्यांच्यावर ब्लॅकमेलींगचा बॉम्ब टाकला. त्याचे लैंगिक-अश्लील संदेश, तशाच त्या चित्रफिती हे सारे त्याच्या कुटुंबियांना दाखविण्याची धमकी त्यांनी दिली. त्यापासून वाचायचे असेल, तर गोपनीय माहिती द्यावी लागेल असे सांगितले आणि हा देशाच्या कमांडोंना प्रशिक्षण देणारा अधिकारी त्याच जवानांशी गद्दारी करण्यास तयार झाला. 14 जानेवारीला त्याने किरण रंधावा हिला पॅरा ट्रेनिंगबाबतची गोपनीय कागदपत्रे व्हाट्सअॅपवरून पाठविली.

त्याला व्हर्च्युअल नंबर देण्यात आला होता. त्यावरून तो ही कागदपत्रे पाठवित असे. आता तो आयएसआयचा पक्का एजंट बनला होता. त्याची ही गद्दारी उजेडात आली ती त्याच्याच एका छोट्याशा घटनेमुळे. 31 जानेवारी 2018 चा दिवस होता. वायुसेनेच्या मुख्यालयात काही कामानिमित्ताने मारवाह गेले होते. अचानक तेथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले की त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे. वायुसेनेच्या कार्यालयात कोणालाही मोबाईल फोन नेण्याची परवानगी नाही. त्यात कॅमेरा असतो आणि त्याद्वारे कोणीही तेथे चित्रिकरण करू शकते. गोपनीय कागदपत्रांची छायाचित्रे काढू शकते. त्यामुळे लागलीच त्यांना हटकण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यातून त्यांचे बिंग फुटले. त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com