pakistan using girls social media accounts target indian peoples part 4
pakistan using girls social media accounts target indian peoples part 4

फेसबुकवरच्या पाकिस्तानी विष कन्या भाग - 4

वायुसेनेला हादरा देणारी गेल्या चार वर्षांतील ही अशा प्रकारची दुसरी घटना. डिसेंबर 2015 मध्ये मारवाह यांच्याप्रमाणेच वायुसेनेतील ‘लिडिंग एअर क्राफ्ट्समन’ (एलएसी) के के रंजीत यालाही अशाच प्रकारे फितुरीच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली होती. छान रुबाबदार असा तो वायुसैनिक. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातला, सामान्य कुटुंबातला. वडिल कोट्टकल आर्य वैद्य शाळेत कामाला होता. ते गेल्यावर हाच घरातला कर्ता-कमावता बनवला. वायुसेनेत त्याने प्रवेश केला होता तोही केवळ अन्यत्र कुठे नोकरी मिळत नाही म्हणून.

पण त्या पगारावरही तो समाधानी नव्हता. आयएसआयच्या सायबर हेरांनी त्याला हेरले. त्याच्यावर फेसबुकच्या माध्यमातून विषकन्येचे जाळे टाकले. यावेळी त्यांनी दोन्ही सापळे वापरले. हनीट्रॅप आणि मनीट्रॅप. 

एके दिवशी त्याला दामिनी मॅकनॉट नावाच्या एका ब्रिटिश महिलेची मैत्रीविनंती आली. आपण ब्रिटनमधील एका आघाडीच्या संरक्षणविषयक मासिकाची संपादिका असल्याचे तिने सांगितले. काही दिवसांनी तिने त्याला एक ऑफर दिली. संरक्षण विश्लेषक म्हणून त्याने त्या मासिकासाठी काम करावे. त्याबदल्यात त्याला मानधन दिले जाईल. त्याने ती खुशीने स्वीकारली. 

त्यासाठी त्याची मुलाखत घेण्यात आली. दामिनीने त्याला सांगितले, की मंजीत नावाची व्यक्ती त्याच्याशी स्काईपवरून बोलेल. मुलाखतीच्या वेळी त्याच्या लक्षात आले, की स्काईपवर मंजीतचे लोकेशन पाकिस्तान असे दिसतेय. त्याने दामिनीला त्याबाबत विचारले. ‘तू मला अडचणीत आणू नकोस. मोठी स्वप्नं असलेला मी एक छोटा माणूस आहे.’

पण दामिनीने त्याची समजूत घातली. म्हणाली, ‘मंजीत पाकिस्तानी नाही. आणि तू हे पक्के लक्षात ठेव की आमच्या ऑफिसात एकही पाकिस्तानी व्यक्ती नाही.’

त्या मुलाखतीनंतर सुरुवातीला त्याचे मानधन ठरले पाचशे ते सहाशे अमेरिकी डॉलर. पण त्याने आणखी काही महत्त्वाची माहिती दिली, तर ते वाढून पाच ते दहा हजार डॉलरपर्यंत जाऊ शकेल असेही त्याला सांगण्यात आले. मोठेच होते ते आमीष. ते पैसे कोणाच्या नजरेत येऊ नयेत यासाठी ते त्याच्या एका नातेवाईकाच्या बँकखात्यात जमा करण्यात येत असत.  

या पैशांप्रमाणेच दामिनीशी गप्पा हा ‘बोनस’ होताच. फेसबुक, स्काईप आणि व्हाट्सअॅपवरून त्यांचे अश्लील चॅटिंग चाले. तिच्या पुरता कह्यात गेला होता तो. ती विचारील ती गोपनीय माहिती देत होता. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा, लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि वायुसेनेचे लायझनिंग युनिट यांनी मिळून त्याला पकडले. त्याच्या चौकशीतून जी माहिती समोर आली ती भयंकर होती.

हवाईदलाच्या वेगवेगळ्या तळांवरील स्क्वाड्रनच्या हालचाली, लढाऊ विमाने, त्यांची संख्या, मोबाईल रडार युनिटची माहिती, त्यांची ओळख अशा विविध गोष्टी आयएसआयला त्याने पुरविल्या होत्या. जम्मू-काश्मीरमधील वायुसेनेच्या हालचाली तो आयएसआयला कळवित होता. भारत आणि रशिया यांच्यात इंद्र नावाची संयुक्त लष्करी कवायत झाली. त्यात किती आणि कोणत्या विमानांनी भाग घेतला हे त्याने पाकिस्तानला कळविले होते.

भटिंडा तळावर तो काम करीत होता. तेथून पठाणकोट, अमृतसर, आग्रा, अंबाला, श्रीनगर येथील तळांवर पाठविण्यात आलेल्या स्क्वाड्रनच्या हालचाली तो कळवित असे. त्यामुळेच पुढे पठाणकोटमधील हल्ल्याप्रकणीही त्याची चौकशी करण्यात आली होती.  

ही फितुरी, हा देशद्रोह केवळ पैसे आणि लैंगिक भूक यांपायी होती. आणि ही काही अपवादात्मक उदाहरणे नाहीत. लष्करी जवान म्हटले की सामान्यांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा असते. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, सर्वोत्तम राष्ट्रवादी, कठोर शिस्तीचे, भ्रष्टाचाराचा गंधही न लागलेले असे नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक भाबड्यांना वाटत असते, की देशातील भ्रष्टाचाराची गदळघाण निपटून काढायची असेल, देशाला विश्वगुरू बनवायचे असेल, खरा विकास करायचा असेल, तर येथे हुकूमशाही हवी आणि ती लष्कराची हुकूमशाही असावी.

त्यांच्या हे लक्षातच येत नसते, की या लष्करातही माणसेच असतात आणि ती याच भारतीय समाजातून येत असतात. या समाजातील सारे गुण-दुर्गुण त्यांच्यातही असतात. त्यामुळे त्यांच्यातूनही देशाला विकणारे फितूर जन्माला येत असतात. आणि त्यात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, तिरंग्याचे प्रेम, त्यांचा धर्म, त्यांची जात, एवढेच नव्हे तर त्यांची आर्थिक स्थिती हे कुठेही आड नसते. जुना इतिहास सोडा, केवळ 2018-19 या दोन वर्षांतील फितुरीची प्रकरणे पाहिली तरी हे लक्षात येईल. 

वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह, बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्र हे 2018 मध्ये पकडण्यात आलेले फितूर आपण पाहिलेच. त्या वर्षी 30 मार्च रोजी अमृतसरच्या छटिविंडमधून लष्करी गुप्तचर आणि पंजाबच्या स्पेशल ऑपरेशन्स सेलने रवी कुमार याला अटक केली होती. आयएसआयने याची भरतीही फेसबुकमधील विषकन्येच्या माध्यमातून केली होती.

त्याच वर्षी 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान त्याला दुबईला नेण्यात आले. तेथे त्याला हेरगिरीचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. तो मोबाईल फोन आणि इंटरनेटवरून सातत्याने आयएसआय अधिका-यांच्या संपर्कात असे. पैशाच्या बदल्यात लष्करी युनिट, सीमेवरील नव्या बंकर्सचे बांधकाम, लष्करी वाहने, त्यांची फॉर्मेशन साईन अशी माहिती त्याने पुरवली होती.   
त्यानंतर 17 एप्रिल रोजी गौरव शर्मा याला अटक करण्यात आली होती. तो हरियाणातल्या सोनिपतचा. वडिल निवृत्त लष्करी हवालदार. हा लष्कर भरतीच्या मिषाने लष्करी तळांवर जायचा. नाशिकमध्येही आला होता तो. तेथून व्हिडिओ कॉलिंग करायचा. त्याद्वारे त्या तळाची माहिती आयएसआयच्या विषकन्येला द्यायचा. तब्बल 18 वेळा त्याने व्हिडिओ कॉलिंग केले होते. त्याद्वारे लष्कराची भरती, मोहिमा, लष्करी वाहने आणि अधिकारी यांच्या हालचाली त्याने आयएसआयला कळविल्या होत्या. रोहतकमधील एका लष्करी भरती प्रशिक्षण केंद्राच्या वसतीगृहात तब्बल तीन महिने तो राहिला होता. तेथील, तसेच हिसार येथील लष्करी कँन्टॉन्मेन्टची गोपनीय माहिती त्याने पाकिस्तानी विषकन्येला पुरवली होती. 

त्याच्या पुढच्याच महिन्यात, 24 मे रोजी उत्तराखंडमधील पिठोरगढ येथे जम्मू-काश्मीरचे लष्करी गुप्तचर, उत्तराखंड पोलिस आणि उत्तर प्रदेश एटीएसने रमेश सिंग याला अटक केली होती. तो इस्लामाबादमधील एका (माजी) भारतीय राजनैतिक अधिका-याच्या घरी स्वैपाकी होता. त्या निवासस्थानात त्याने चार वेळा आयएसआयच्या एजंटांना प्रवेश दिला होता. तो हाती लागला तो योगायोगानेच.

फैजाबादमध्ये आफताब नावाच्या एका आयएसआय एजंटला पकडण्यात आले होते. त्याच्या चौकशीतून महाराष्ट्रातील दोन हवाला एजंटांची नावे पुढे आली. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या फोनमधून पैशाच्या देवाणघेवाणीची बरीच माहिती मिळाली. पाकिस्तानी हँडलरकडून त्यांना पैसे कुणाला पाठवायचे वगैरे सूचना येत असत. तर त्या चौकशीतून रमेश सिंगचे नाव पुढे आले. हा गद्दार अमेरिकी डॉलर घ्यायचा आणि दिल्लीत ते बदलून घ्यायचा. या रमेश सिंगचा भाऊ सैन्यात होता आणि त्याच्या शिफारशीवरूनच त्याला ही नोकरी मिळाली होती. 

यंदाच्या वर्षी 2019 च्या प्रारंभीच फितुरीचे असेच एक प्रकरण समोर आले. त्यात अटक करण्यात आली सोमवीर सिंग याला. हा मुळचा हरियाणातला. जैसलमेर जिल्ह्यात 75 व्या आर्मर्ड बटालियनमधला शिपाई. त्याला जम्मूतून सतत फोन येत असत. त्यामुळे तो  राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या नजरेत आला. मग त्याच्या फेसबुक खात्याची तपासणी करण्यात आली. त्यातून लक्षात आले की तो अनिता चोप्रा नावाच्या तरुणीशी सातत्याने संपर्कात होता.

आपण जम्मूतील मिलिट्री नर्सिंग कोअरमध्ये कॅप्टन आहोत असे ती सांगायची. तिने त्यांना मैत्रीविनंती पाठवली. मग पुढे सारे नेहमीप्रमाणेच घडले. त्यांच्यात अश्लील चॅटिंग होऊ लागले. मधूनच ती विचारायची, तुझी पोस्टिंग कुठे आहे? तुझ्या रणगाड्याचे छायाचित्र पाठवशील का? तुमची फिल्ड फायरिंग कधी झाली? तो प्रेमाने त्याची उत्तरे द्यायचा. आणि मग त्या आधारेच तिने त्याला ब्लॅकमेल करून आयएसआयसाठी काम करण्यास तयार केले. आता तो हेरगिरी करू लागला.

त्या बदल्यात त्याला पैसे पाठविले जायचे. तेही कोणाला संशय येऊ नये, म्हणून त्याच्या भावाच्या बँकखात्यात पाठविले जायचे. नंतर तो ते पैसे स्वतःच्या ई-वॅलेटमध्ये ओढून घेत असे. त्याला 4 जानेवारी रोजी अटक झाली. त्यानंतर पाचच दिवसांत असाच एक फितूर लष्करी गुप्तचरांच्या हाती लागला. त्याचे नाव निर्मल राय. हा आसामच्या तिनसुखिया जिल्ह्यातला. अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील किबिथू आणि दिछू या गावांत तो लष्करासाठी हमाली काम करायचा. त्याच्या फोनमध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे, लष्करी स्थळांची आणि पुलांची छायाचित्रे आढळली. त्याची आयएसआयसाठी भरती केली होती एका इंडोनेशियन महिलेने. ती दुबईत राहायची. हा तेथे एका बर्गर दुकानात कामाला होता. तेथे त्यांची ओळख झाली होती. ही महिलाही विषकन्याच.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com