facebook honey trap
facebook honey trap

फेसबुकवरच्या पाकिस्तानी विष कन्या भाग - 5

या विषकन्या कशा प्रकारे काम करतात, एखाद्याला हनीट्रॅप कसे केले जाते, हनीट्रॅपमध्ये अडकणारे नेमके कोणत्या प्रकारचे लोक असतात या सगळ्याचा रीतसर अभ्यास झालेला आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटरच्या स्ट्रॅटेजी अँड सिक्युरिटी इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर पॉल कॉर्निश हे या विषयाचे एक अभ्यासक. त्यांच्यानुसार, दोन प्रकारची मानसिकता असलेले लोक हनीट्रॅपचे लक्ष्य असतात. एक म्हणजे - प्रेम, माया यांपासून वंचित असलेले आणि म्हणून त्यासाठी आतूर असलेले आणि दुसरे म्हणजे - कोणत्याही प्रकारचे नियम-कायदे आपल्याला लागूच होत नाहीत असा समज असलेले वर्चस्ववादी मानसिकता असलेले लोक.

विषकन्यांना बळी पडतात ते प्रामुख्याने आत्मविश्वासाचा अभाव असलेले, स्वतःला असुरक्षित समजत असलेले, मनात कटुता असलेले आणि प्रेमळपणाची आस असलेले. वर्चस्ववादी, अतीआत्मविश्वास असलेल्या व्यक्तींचे स्वतःबद्दल अर्थातच अनेक गैरसमज असतात. त्यांना वाटत असते की अन्य कोणाही पेक्षा ते अधिक चांगल्या पद्धतीने संकटांचा सामना करू शकतात, नियोजन करू शकतात. अशी माणसेही विषकन्यांच्या जाळ्यात अडकतात. 

या विषकन्या अर्थातच अतिशय सुंदर असतात. लैंगिकदृष्ट्या आकर्षक असतात. त्या अगदीच जेम्स बॉण्डपटाच्या नायिका नसतीलही. परंतु कोणालाही आकर्षित करून घेण्याचे, त्यांना भुलवण्याचे कसब त्यांना अवगत असते. फेसबुकसारख्या माध्यमाने तर हे अधिकच सोपे करून ठेवलेले आहे. तेथे प्रत्यक्षात भेटणे वगैरे नसतेच. त्यामुळे केवळ छायाचित्रे, चित्रफिती आणि संवाद याच्या माध्यमातून हे काम कोणीही करू शकते. ते करणारी व्यक्ती स्त्रीच असावयास पाहिजे असे नाही.

फेसबुकचा आणखी एक फायदा असतो. हनीट्रॅप हा काही एकदम धाडकन लावण्यात येत नाही. ते अत्यंत ‘पेशन्स’चे काम असते. एखाद्या कोळ्याने आपल्या लक्ष्याभोवती जाळे विणावे तशा प्रकारे विषकन्या अतिशय काळजीपूर्वक आपले जाळे टाकत असतात. ठरलेल्या लक्ष्याचे लक्ष आपल्याकडे नकळत वेधून घेणे, अपघाताने त्याच्याशी भेट झाल्याचे दर्शविणे अशा त्यांच्या ठरलेल्या क्लृप्त्या असतात. यासंदर्भात भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या एका महत्त्वाच्या अधिका-याला कशाप्रकारे हनीट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते, ते पाहण्यासारखे आहे. 

त्या अधिका-याचे नाव होते के. व्ही. उन्नीकृष्णन. चेन्नईच्या रॉच्या मिशनचा तो प्रमुख होता. रॉमध्ये प्रतिनियुक्तीवर आला होता तो. त्याला हनीट्रॅपमध्ये अडकविले अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने. 1981 साली नुकतीच त्याची कोलंबोत रॉचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली होती. तेथील अमेरिकी कौन्सुलेटमधील एका अधिका-याने प्रथम त्याला हेरले. त्याच्याशी घसट वाढवली. मैत्री केली. उन्नीचा रंगेल बाहेरख्याली स्वभाव त्याच्या लक्षात येताच त्याने त्याचा फायदा घेतला. काही महिलांशी त्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी त्याने खास प्रयत्न केले.

तीन-चार वर्षांनी उन्नीची भारतात बदली झाली. परंतु तरीही सीआयएचा तो अधिकारी त्याच्याशी संबंध ठेवून होता. हे सारे 1985 पर्यंत चालले होते. त्या वर्षी त्याला गळाला लावण्याचे ठरले. त्यानंतर एके दिवशी त्याला एका अमेरिकी हवाईसुंदरीचा दूरध्वनी आला. तिने सांगितले, की अमेरिकी कौन्सुलेटमधील त्या अधिका-याने तिला त्याचा दूरध्वनी क्रमांक दिला होता. भारतात कधी एकटे वाटले की उन्नीला फोन कर असे त्याने सांगितले होते. तिच्या त्या बोलण्याने उन्नी हुरळून गेला. तो तिला चेन्नईतून मुंबईला जाऊन भेटला. मग हळुहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. घनिष्ठ संबंध निर्माण झाले त्यांचे.

एके दिवशी तिने त्याला सिंगापूरचे विमानतिकिट पाठवले. म्हणाली, की विमानकंपनीकडून तिला भेट म्हणून ही तिकिटे मिळाली आहेत. आपण सिंगापूरला फिरायला जाऊ या. हुरळलेला उन्नी गेला. तेथे एका हॉटेलात ते एकत्र राहिले. तेथे सीआयएने गुप्त कॅमे-यात त्यांची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे टिपली. नंतर ती दाखवून त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. माहितीच्या बदल्यात पैसे देण्याचे आमीषही दाखवण्यात आले. उन्नी त्यांना सामील झाला. भारताच्या श्रीलंकेतील शांतीप्रयत्नांना आलेल्या अपयशात त्याचा मोठा हात होता म्हणतात. 

फेसबुक आदी माध्यमांमुळे आता हे प्रत्यक्ष भेटण्याची पायरी बहुतांशी गळाली आहे. तेथे लक्ष्यच आपली नको ती छायाचित्रे पाठवित असते. नको त्या भाषेत बोलत असते. त्याद्वारे त्याला ब्लॅकमेल केले जाते. त्यात अर्थातच पैशाचे आमीषही असते. किंबहुना तो मोह मोठा. त्यापुढे कसली देशभक्ती आणि कसले धर्मप्रेम असे मानणा-यांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत. यातील अलीकडचे एक ताजे उदाहरण आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानातील. त्या प्रकरणाचा प्रारंभ झाला 12 डिसेंबर 2016 रोजी. 

त्या दिवशी जम्मूतील आरएस पुरा पोलिसांनी दादू आणि सतविंदर सिंग या दोन आयएसआय एजंटांना अटक केली. त्यांचा हँडलर होता पाकिस्तानातील. त्याला ते संवेदनशील माहिती पाठवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत असत. मध्य प्रदेशातील सतनापासून 30 किलोमीटर अंतरावर सुहास नावाचे गाव आहे. तेथील बलराम नावाची व्यक्ती त्यांना ते पैसे पाठवत असे.

या माहितीवरून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश एटीएस, तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी संयुक्त कारवाई करून त्या बलराम सिंहला पकडले. हा 26 वर्षांचा तरूण. 15 मार्च 2014 रोजी त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तो बजरंग दलाच्या अनेक कार्यक्रमांनाही जायचा. दलाच्या स्थानिक नेत्यांबरोबर वावरायचा. व्हॅलन्टाईन डेला प्रेमी युगुलांवर नजर ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गटातही तो एकदा दिसला होता. एकंदर हा तरुण भलताच धर्मप्रेमी आणि संस्कृतीप्रेमी. काही वर्षांपूर्वी त्याला विजेच्या केबल चोरीप्रकरणात पकडण्यात आले होते. आता मात्र किमती मोटारसायकली आणि अलिशान चारचाकी गाड्या उडवत होता.  

त्याला गळाला लावले होते राजीव तिवारी याने. सुहासपासून 50 किमी अंतरावरील पोढी गावचा तो रहिवाशी. त्याच्या माध्यमातून बलराम एका पाकिस्तानी व्यक्तीला भेटला. सीम बॉक्स विकण्याच्या व्यवसायातून येणारे पैसे विविध बँकांतील वेगवेगळ्या खात्यांत भरण्याचे काम त्याला देण्यात आले. त्यावर त्याला 40 टक्के कमिशन मिळायचे. अशा प्रकारे महिन्याला तो 4 लाख रुपये कमवायचा. त्याला हवालातून पैसे मिळत. तो ते आपल्या साथीदारांच्या खात्यात टाकायचा.

तेथून मग आयएसआय सांगेल त्याला अधिकृतपणे बँकेतून ते पैसे काढून द्यायचा. त्याला पकडल्यावर त्याच्याकडून जी माहिती मिळाली, ती गुप्तचर यंत्रणांसाठीही धक्कादायक होती. त्याने दहा जणांची माहिती दिली होती. त्यातील एक होता सतनाचा, दोन जबलपूरचे, तीन भोपाळचे आणि पाच जण होते ग्वाल्हेरमधले. हे सगळे जण आयएसआयसाठी हवाला रॅकेट चालवायचे. ऑनलाईन लॉटरी घोटाळ्यातही त्यांचा सहभाग होता. यात धक्कादायक होती ती या आयएसआयच्या एजंटांची ओळख. 

या दहा जणांतील एकाचे नाव ध्रुव सक्सेना. तो भाजपच्या आयटी सेलमध्ये होता. एक होता जितेंद्रसिंह. तो भाजपच्या एका नगरसेवकाचा नातेवाईक. तत्कालिन केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि मध्य प्रदेशचे खासदार मायासिंग यांचा तो निकटवर्ती असल्याचेही बोलले जात होते. आणखी एक - आशिषसिंह राठोड. हा सतना जिल्ह्यातल्या गौरक्षा समितीचा समन्वयक होता. विश्व हिंदू परिषदेने या नंतर त्याची हकालपट्टी केली. त्याचा साथीदार राजबहादुर सिंह हा बजरंग दलाचा अधिकृत कार्यकर्ता होता. 

हे सगळे जण हिंदुत्ववादी विचारांशी जवळीक असलेले. देशप्रेमी म्हणून मिरवणारे. ध्रुव सक्सेना हा आयटी सेलमध्ये होता. त्या माध्यमातून इतरांना तो देशभक्ती शिकवित होता. पण त्यांचा खरा चेहरा वेगळाच होता. जाहीरपणे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावणारे हे लोक प्रत्यक्षात मात्र त्याच पाकिस्तानसाठी काम करीत होते. एक आंतरराष्ट्रीय कॉल रॅकेट चालवत होते ते. समांतर टेलिकॉम एक्स्चेंजच ते. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला देश आणि नेपाळमधून अधिकृत मार्ग टाळून कॉल केले वा घेतले जायचे. या सर्वांचे हॅंडलर पाकिस्तानात होते. ते तेथून काश्मीरमधील लष्करी अधिका-यांना फोन करायचे. त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करायचे. मध्य प्रदेश एटीएसच्या तेव्हाच्या अंदाजानुसार आयएसआयची अशी किमान शंभर मोड्युल देशात कार्यरत होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com