Parvati Glacier in Himachal Pradesh
esakal
उमेश झिरपे
हिमालयाकडे पाहताना आपण अनेकदा त्याची भव्यता, शांतता आणि निसर्गसौंदर्य अनुभवतो. पण हिमालयाचा एक महत्त्वाचा पैलू असा आहे, जो अनेकदा नजरेआड राहतो अर्थातच तो म्हणजे मानव आणि हिमनद्यांमधील नातं. हिमनद्या नद्यांना जन्म देतात, नद्या जीवनाला आधार देतात आणि त्याच पाण्यावर उभं राहतं मानवी जग. या नात्याचा सर्वांत जिवंत आणि गुंतागुंतीचा नमुना पाहायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातील पार्वती खोऱ्याकडे पाहावं लागतं.
पार्वती हिमनदी ही एखाद्या एकाच बिंदूवर मर्यादित असलेली रचना नाही. ती एक संपूर्ण प्रणाली आहे. अनेक लहान हिमसाठे, उपहिमनद्या आणि बर्फाच्या दऱ्या यांचा एकत्रित परिणाम. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात, पिन-पार्वती पासच्या परिसरात या हिमनदीचा उगम होतो. या उंच भागात साठणारा हिम संथपणे खाली सरकत विविध प्रवाहांना जन्म देतो. हे प्रवाह एकत्र येऊन पार्वती नदी तयार करतात.
पार्वती नदी पुढे जाऊन बियास नदीला मिळते. म्हणजेच या हिमनदीतून निर्माण होणारं पाणी अखेरीस उत्तर भारताच्या विस्तीर्ण जलप्रणालीचा भाग बनतं. त्यामुळे पार्वती हिमनदीचं महत्त्व केवळ स्थानिक नाही; ते व्यापक आहे. पार्वती खोऱ्यातील प्रवास हा हिमालयाच्या विविध रूपांचं दर्शन घडवणारा आहे. खालच्या भागात कसोल, मणिकरणसारखी गावं, हिरवळ, नदीकाठ आणि मानवी वस्ती. पुढे जाताना जंगलं विरळ होतात, दऱ्या खोल होतात आणि शेवटी उघडा, बर्फाच्छादित प्रदेश सुरू होतो.