कुंबळेच्या भारतीय विक्रमाला आव्हान देण्यासाठी अश्विनला या खेळाडूप्रमाणे करावी लागणार मेहनत

सामना जिंकून देण्याचा त्याचा तो लौकिक आजही कायम आहे. चेंडूवरील प्रभुत्त्व, कामगिरीतील सातत्य, विकेट घेण्याची भूक, प्रयोगशीलता या बळावर त्याची गोलंदाजी परिपक्व बनली
R.ashwin cricket player
R.ashwin cricket playeresakal

क्रीडांगण : किशोर पेटकर

आर. अश्विन सध्या ३७ वर्षांचा असला, तरी गोलंदाजीत तो अजूनही मॅचविनर गणला जातो. तो संघात असताना भारताने ५७ कसोटी सामने जिंकले आहेत; त्या विजयांमध्ये अश्विनच्या ३४७ विकेट आहेत. कसोटीत तो नऊ वेळा सामनावीर, तर दहा वेळा मालिकावीर ठरला आहे. यावरून सामना जिंकून देण्याची त्याची हातोटी लक्षात येते.

राजकोट येथील इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामना भारताने ४३४ धावांनी आरामात जिंकला.

रवींद्र जडेजाचे शतक आणि दुसऱ्या डावातील पाच विकेट, यशस्वी जयस्वालचे दुसऱ्या डावातील नाबाद द्विशतक, सर्फराज खानचे संस्मरणीय पदार्पण, पहिल्या डावातील रोहित शर्माचे शतक या साऱ्या बाबी भारताच्या विक्रमी विजयात उल्लेखनीय ठरल्या.

त्याचवेळी रविचंद्रन अश्विनने केलेली पाचशे विकेटपूर्तीही राजकोट कसोटीत लक्षवेधी ठरली. कारकिर्दीतील मैलाचा दगड गाठल्यानंतर चेन्नईच्या या फिरकी गोलंदाजास कौटुंबिक वैद्यकीय कारणास्तव तातडीने राजकोट सोडावे लागले.

नंतर घरची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर तो पुन्हा संघात दाखल झाला आणि दुसऱ्या डावात एक विकेट टिपून संघाच्या विजयात वाटाही उचलला.

इंग्लंडचे फलंदाज बेझबॉल या अतिआक्रमक रणनीतिनुसार फलंदाजी करत असताना अश्विनने ९८व्या कसोटीत कारकिर्दीतील महत्त्वपूर्णक्षण अनुभवला. असा पराक्रम करणारा तो जागतिक क्रिकेटमधील नववा, तर दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

अनिल कुंबळेने १३२ कसोटींत ६१९ गडी बाद केले आहेत. तो टप्पा गाठण्यासाठी अश्विनला तशी कमीच संधी आहे, कारण तो सध्या ३७ वर्षांचा आहे. कुंबळेला मागे टाकण्यासाठी अश्विनला शरीराने साथ द्यायला हवी.

इंग्लंडचा जेम्स अँडरसन वयाच्या ४१व्या वर्षी मोठ्या उमेदीने कसोटी क्रिकेट खेळताना दिसत आहे. इंग्लंडच्या हा अनुभवी वेगवान गोलंदाज राजकोट कसोटीपर्यंत ६९६ गडी बाद करून सातशे बळींच्या उंबरठ्यावर आहे.

सांगायचा मुद्दा, की कुंबळेच्या भारतीय विक्रमाला आव्हान देण्यासाठी अश्विनला अँडरसनप्रमाणे मेहनत घ्यावी लागेल.

पाचशे बळींचा टप्पा गाठल्यानंतर कुंबळेच्या विक्रमाचा विषय निघणे स्वाभाविक होते. कुंबळेला मागे टाकणे कठीण असल्याचे अश्विनने प्रामाणिकपणे कबुल केले.

मागील चार-पाच वर्षे चढ-उतार अनुभवताना त्याने तंदुरुस्तीवर भर देत शिस्तबद्धरित्या कारकीर्द पुढे नेलेली आहे. क्रिकेट मैदानावर आपण कधीही थांबू शकतो, याची त्याला जाणीव आहे.

म्हणूनच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर पुढील दोन महिन्यांत काय होईल याची कल्पनाही नसल्याचे तो मान्य करतो. याचाच अर्थ तो कसोटी क्रिकेटचा केव्हाही निरोप घेऊ शकतो. सध्या तरी त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

ऑफस्पिन गोलंदाजीत सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग केलेल्या अश्विनने केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमध्ये आगळा ठसा उमटविला आहे.

कसोटींचे शतक गाठण्यासाठी त्याला आणखी दोन सामन्यांची गरज आहे. तो टप्पा त्याच्यासाठी मोठा अभिमानास्पद असेल. टीका झाल्यावर अश्विन चिडत नाही किंवा स्तुती झाल्यावर हुरळूनही जात नाही.

प्रतिकूल परिस्थितीत उसळी घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो जिद्दी आहे. २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वकरंडक जिंकला. त्या यशस्वी कामगिरीत अश्विनचाही वाटा होता.

गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला. त्यावेळीही अश्विन टीम इंडियाचा ड्रेसिंग रुममध्ये खेळाडू या नात्याने वावरला. अजूनही तो मैदानावरील क्रिकेटचा आनंद लुटत आहे.

cricket
cricketesakal

हुकमी अष्टपैलू

अश्विनने ९८व्या कसोटीत बळींचे पंचशतक गाठले. कसोटी सामन्यांत सर्वाधिक ८०० गडी बाद करणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने ८७ कसोटीत पाचशे गडी टिपले होते. त्यानंतर आता अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.

त्याचा समकालीन ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन हासुद्धा ऑफस्पिनर आहे. दोघांनी एकाच वर्षी २०११ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

लायनने ५०० बळींचा टप्पा अश्विनपूर्वी ओलांडला. या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने १२७ कसोटींत ५१७ गडी बाद केले आहेत. तुलनेत अश्विन कमी कसोटी सामने खेळला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, अश्विन फलंदाजीतही सरस आहे. त्यामुळे त्याच्याकडे हुकमी अष्टपैलू म्हणून आदराने पाहिले जाते. तमिळनाडूतर्फे वयोगट क्रिकेटमध्ये खेळत असताना अश्विन वरच्या फळीतील चांगला फलंदाज होता.

आपण अपघाताने फिरकी गोलंदाज झाल्याचे त्याने स्वतःच सांगितलेले आहे. गोलंदाजीत त्याला संधी मिळाली आणि त्याचे त्याने सोने केले.

भारतीय क्रिकेटपटूंसाठी व्यापक व्यासपीठ ठरलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सने त्याला २००९ साली निवडले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अश्विनच्या फिरकी कौशल्याचा हुशारीने वापर केला.

आयपीएलमध्ये नव्या चेंडूनेही परिणामकारक ठरलेल्या या कल्पक फिरकी गोलंदाजाने वर्षभरातच भारताच्या एकदिवसीय व टी-२० संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्या काळात भारतीय संघ परिपूर्णफिरकी गोलंदाजाच्या शोधात होता.

अनिल कुंबळे २००८ साली निवृत्त झाला होता, तर हरभजन सिंग कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर होता. अश्विनच्या रूपात भारतीय संघाला योग्यवेळी दर्जेदार फिरकी गोलंदाज गवसला. ६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीत वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

झटपट क्रिकेटमधील हा गोलंदाज कसोटीत स्थिरावणार का, हाच प्रश्न तेव्हा विचारला गेला होता. आता १३ वर्षांच्या कालखंडात अश्विनने साऱ्या प्रश्नांना चोख उत्तरे देत स्वतःला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट आणि फलंदाजीत तीन हजार धावा करणारा तो अवघा तिसराच अष्टपैलू खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नने १४५ कसोटींत ७०८ विकेट व ३,१५४ धावा; तर इंग्लंडचा वेगवान स्टुअर्ट ब्रॉड याने १६७ कसोटींत ६०४ विकेट व ३,६६२ धावा केल्या आहेत.

राजकोट कसोटीपर्यंत अश्विनच्या खाती ९८ कसोटींतून ५०१ विकेट व ३,३०८ धावांची नोंद झाली. शतकांच्या बाबतीत अश्विन हा वॉर्न व ब्रॉडच्या तुलनेत सरस आहे.

९९ ही वॉर्नची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या, तर ब्रॉडने फक्त एकच शतक नोंदविले. अश्विनने कसोटीत पाच शतके नोंदविली आहेत. तीन वेळा त्याने शतक केलेल्या सामन्यातच डावात पाच गडी बाद करण्याची किमयाही साधली.

भारतासाठी मॅचविनर

अश्विन सध्या ३७ वर्षांचा असला, तरी गोलंदाजीत तो अजूनही मॅचविनर गणला जातो. तो संघात असताना भारताने ५७ कसोटी सामने जिंकले आहेत; त्या विजयांमध्ये अश्विनच्या ३४७ विकेट आहेत. कसोटीत तो नऊ वेळा सामनावीर, तर दहा वेळा मालिकावीर ठरला आहे.

यावरून सामना जिंकून देण्याची त्याची हातोटी लक्षात येते. त्याने कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीत पहिल्या डावात तीन व दुसऱ्या डावात सहा मिळून एकूण नऊ गडी बाद करत सामनावीर पुरस्कार पटकावला.

सामना जिंकून देण्याचा त्याचा तो लौकिक आजही कायम आहे. चेंडूवरील प्रभुत्त्व, कामगिरीतील सातत्य, विकेट घेण्याची भूक, प्रयोगशीलता या बळावर त्याची गोलंदाजी परिपक्व बनली. अश्विनवर भारतीय खेळपट्ट्यांवर जास्त यशस्वी ठरल्याचा शिक्का आहे.

त्यात तथ्यही आहे आणि अश्विन स्वतः ही बाब नाकारतही नाही. राजकोटला त्याने दुसऱ्या डावात एक गडी बाद केला. मायदेशातील त्याची ही ३४८वी विकेट ठरली.

तुलनेत परदेशी खेळपट्ट्यावर त्याला १५३ गडीच बाद करता आलेले आहेत. डावखुऱ्या फलंदाजांना अश्विनची फिरकी गोलंदाजी खेळणे कठीण ठरते.

कसोटी कारकिर्दीत त्याने अडीचशे डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. साहजिकच डावखुरे फलंदाज असलेल्या संघांसाठी अश्विनची फिरकी डोकेदुखी ठरलेली आहे.

---------------

R.ashwin cricket player
Under 19 World Cup : ज्युनियरमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया फायनल ; १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक,पाक उपांत्य फेरीत बाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com