सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती! }
सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती!

सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती!

sakal_logo
By
सुधीर भगत

बेंजामिन ग्राहम, वॉरेन बफे, राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, रामदेव अग्रवाल अशा महारथी गुंतवणूकदारांची नावं जरी ऐकली तर अंगावर काटा येतो. असामान्यरित्या गुंतवणूक करून या व्यक्तींनी अब्जावधी रुपयांची धनसंपत्ती निर्माण केली. आर्थिक विषयावर बोलताना सर्वोत्तम वक्ते सुद्धा या व्यक्तींची उदाहरणे नक्की सादर करतात. ही उदाहरणे आपल्याला मोहित करतात. आपण त्यांच्या विद्वत्तेपुढे नतमस्तक होतो आणि कुठेतरी मनामध्ये विचार निश्चित करतो, की ‘हे आपणास शक्य नाही.’ आपण तसे विद्वान नाही. श्रीमंत होणे हा आपला अधिकार नाही. मित्रहो, पण ते तसं खरं नाही. गुंतवणूक करण्याची विद्ववत्ता आणि विद्वान यांच्यात फरक आहे. म्हणूनच सामान्य माणसांच्या असामान्य श्रीमंतीला सलाम करावासा वाटतो.

हेही वाचा: सहकारी बँकिंग क्षेत्र ‘सॉफ्ट टार्गेट’ होतंय?

माझ्या कामानिमित्त मी अशा दोन अतिशय सामान्य, जेमतेम ११ वी इयत्ता शिकलेल्या गुंतवणूकदारांना भेटलो. त्यांनी माझ्या गुंतवणूकदारांविषयीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आणि मला थक्क केले. व्यवसायात काही अशा व्यक्ती भेटतात की ज्यांच्या विचारसरणीत आपण रमलो तर एखादी ‘एमबीए’ची पदवीसुद्धा थिटी वाटेल. मला त्यांना भेटून पुरेपूर समजले, की पुस्तकी शिक्षणाचा आणि आर्थिक साक्षरतेचा काहीही संबंध नाही. या दोन व्यक्तींच्या मैत्रीने मी भारावून गेलो. या व्यक्तींचा उल्लेख कुठेच होत नाही, कारण त्या तुमच्या-आमच्यासारख्या सध्या आणि सर्वसामान्य आहेत.

या लेखात आपण या व्यक्तींबद्दल थोडं जाणून घेऊया, त्यांची यशकथा समजून घेऊया. ते पैशासोबत प्रत्यक्षात कसा व्यवहार करतात, हे समजून घेऊया.

हेही वाचा: मैदानावरच्या रणरागिणींचे पुढचे पाऊल!

मला एका ज्येष्ठ व्यक्तीचा मार्च २०२० मधील लॉकडाउनच्या काळात फोन आला होता. ते म्हणाले, माझं नाव रोहिदास रामचंद्र शिंदे आहे. त्यांनी माझ्या एका ग्राहक गुंतवणूकदार व्यक्तीचा संदर्भ दिला आणि म्हणाले, ‘‘मला भेटायचे आहे तुम्हांला. मी मुंबईला असतो. येऊ का पुण्याला भेटायला?’’ त्यांचे वय लक्षात घेता मी सांगितले, ‘‘मी जेव्हा मुंबई भेटीसाठी येईन, त्या दिवशी मी आवर्जून भेटतो आपणास.’’ त्यांनी ‘हो’ सांगून भेटण्यासाठी आग्रहाची विनंती केली.

त्यापुढील महिन्यातच माझी मुंबई भेट ठरली. मी शिंदेकाकांना नियोजन करून फोन केला. त्यांनी आनंदाने होकार दिला. म्हणाले, घरचा पत्ता मुलास मेसेज करण्यास सांगतो. पत्ता एका चाळीचा होता, सायन, कोळीवाडा, मुंबईचा. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी थोडा नाराजच झालो. एक तर माझा नवीन व्यवसाय आणि त्यामध्ये असा छोट्या चाळीतील व्यक्तीचा संदर्भ म्हणजे मोठी गुंतवणूक मिळणार ही शक्यता शून्य. तरीही खिन्न मनाने मी या जागी गेलो, कारण मला मुळातच हा व्यवसाय मनापासून प्रिय आहे. मनात म्हणालो, बघू, भेटू तरी...
माझे स्वागत त्यांच्या त्या वनरूम-किचनच्या घरी अगदी राजेशाही पद्धतीने झाले. विविध पदार्थ मला खाण्यास देऊ केले गेले.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''

मी विचारले, ‘‘काका, तुम्हाला काय मार्गदर्शन हवंय? त्यांच्या हातात एक फाइल होती. ती माझ्या हाती देत ते म्हणाले, ‘‘सर, हा माझा पोर्टफोलिओ आहे. काही बदल सुचवा आणि मार्गदर्शन करा.’’ आतमध्ये एक डी-मॅटचा पेपर होता (कंपनीचे शेअर ज्यामध्ये नमूद असतात.). पन्नासपेक्षा अधिक कंपन्यांची नावं असलेली ती यादी होती. भारतातील अग्रगण्य, मोठमोठ्या व्यवसायांचे, कंपन्यांचे शेअर त्यात होते. मी पुन्हा पुन्हा ती यादी बघितली. शिंदे सरांचे नाव पडताळून पाहिले. त्यांचेच नाव स्पष्ट होते तिथे. मी आश्चर्यचकित झालो. एखाद्याच्या हातात सोन्याची बिस्किटे आभाळातून पडावी एवढा धक्का मला बसला. कारण ही गुंतवणूक सोने आणि हिऱ्यांपेक्षा सुद्धा अफाट होती. ते म्हणाले, ‘‘सर, काय झालं? काही चुकलंय का? त्या कागदाचे कोविड महासाथीपूर्वीचे मूल्यांकन एक कोटी रुपयांच्या वर होते. या क्षणी ते दोन कोटी रुपयांच्या आसपास असेल. हे संपूर्ण सत्य आहे.

मी त्यांना बदल सुचवावेत, असे त्यामध्ये काहीही नव्हते. मला उत्सुकता होती, की शिंदेकाकांनी एवढा उत्तम पोर्टफोलिओ कसा बनवला? मी त्यांना विचारले, की तुम्ही काय काम करता आणि मला तुमच्या गुंतवणुकीची सूत्र सांगा.

मला समजले, की शिंदेकाका काही वर्षांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. त्यांचे शिक्षण दहावी पास होते आणि अगदी लहान अशा कंपनीमध्ये ते कामगार होते. पगार सुरवातीला रुपये दोनशे फक्त आणि रिटायरमेंटच्या वेळी अठरा हजार रुपये होता. मी खूपच अस्वस्थ झालो. त्यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करताना गुंतवणुकीच्या छोट्या-छोट्या गोष्टी वाचायला सुरवात केली. उत्तम लेख ते नंतर वाचू लागले.

हेही वाचा: अखेर तालिबान्यांना झाली उपरती!

शेअर खरेदी करणे म्हणजे कंपन्यांसोबत भागीदारी करणे, हे त्यांना पक्के समजले. मग प्रश्न होता कुठल्या कंपनीची भागीदारी उत्तम व गुंतवणूक कशी, कधी करावी? या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्य गुंतवणूकदारास मिळणे खूप कठीण असते. यासाठी काही तत्वे या श्रेष्ठ व्यक्तीने काटेकोर पाळली होती. ती पुढीलप्रमाणे-

१) ज्या कंपनीचे उत्पादन ग्राहक सातत्याने खरेदी करतात आणि सर्वसामान्य माणूस ज्या वस्तूंशिवाय नित्य व्यवहार करू शकत नाही, त्या कंपनीचे शेअर बिनधास्त घ्यायचे. उदाहरणार्थ, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडियन ऑईल, पिडिलाइट, बजाज आॅटो

२) दरमहा पगार होताच एकतरी शेअर नित्यनेमाने खरेदी करायचाच.

३) कोणत्याही कंपनीची भागीदारी त्यांनी आजतागायत सोडलेली नाही.

४) कर्ज, फ्लॅट, बँक एफडी आदींपासून ते दूर राहिले.

शिंदेकाकांना पूर्ण खात्री होती, की या कंपन्या उत्तम कामगिरी करतात. या कंपन्यांची वाढ होणार, हे निश्चित आहे आणि म्हणून आपले पैसे देखील उत्तम वाढतील.
संयम, गुंतवणूक शिस्त, सर्वोत्तम कंपन्यांची निवड हे माझ्या धनवृद्धीचे कारण आहे, असे शिंदेकाका गर्वाने सांगतात.

मला आज रोहिदास रामचंद्र शिंदे हे वॉरेन बफे यांच्याएवढेच थोर वाटतात. श्रीमंत फक्त दोनच व्यक्ती असू शकतात, एक म्हणजे जे स्वतः व्यवसाय करतात किंवा दुसऱ्याच्या उत्तम व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात. या सर्वसामान्य गुंतवणूकदाराने मला साध्या-सोप्या; पण असामान्य गुंतवणुकीचा धडा त्यादिवशी अप्रत्यक्षरित्या शिकवला. मी खरोखरच धन्य झालो.

दुसऱ्या व्यक्तिची यशोगाथा

दिलीप त्र्यंबक सावंत ही दुसरी व्यक्ती. ११ वी पर्यंत शिक्षण असेल यांचे. तसे मी यांना लहानपणापासून ओळखतो. गणित, संख्या, भागाकार, गुणाकार उत्तम. शिक्षण जरी नसलं तरी व्यावहारिक बुद्धी एखाद्या ‘आयआयएम’मधील मुलांसारखी आहे यांची. दिलीप यांचे म्हणणे आहे, की पैसे वास्तवामधे यांच्याशी बोलतात. ते खरेही असेल.


लहानपणापासून शिक्षणाची आवड दिलीप यांना नव्हती. व्यवसाय करणे आणि पैसे मोजून त्याचे नियोजन करणे त्यांना लहानपणापासून खूपच प्रिय होते, म्हणून त्यांनी ही आवड जोपासली. अतिशय निम्न मध्यमवर्ग संस्कृती व कुटुंबात राहूनसुद्धा कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवण्याची त्यांची तीव्र इच्छा प्रशंसनीय होती. हा मराठी माणूस पैसे तोलतो. गुंतवणूक करण्याचे नियम वाचले नसूनसुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने कृती करतो. दिलीप यांच्यासमवेत गप्पा मारताना त्यांचे धनसंपत्तीवृद्धीचे कौशल्य समजल्यावर मी चक्रावून गेलो. सर्वसामान्य व्यक्ती असे विचार करू शकतो, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

आज दिलीप यांची मोठी संपत्ती आहे आणि बहुतांश संपत्ती त्यांती उत्तम गुंतवणूक करून निर्माण केली आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. व्यवसायात कमावलेला पैसा अर्धा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवायचा आणि अर्धा स्वतःच्या व्यवसायात गुंतवायचा, हे समीकरण त्यांनी कधीच सोडले नाही. जन्मतः दैवी वरदान असल्यासारखे त्यांनी पैशाचे मालमत्तावाटप उत्तम केले; ज्यामुळे त्यांना ‘लिक्विडीटी’ आणि ‘ग्रोथ’ सहज प्राप्त करता आली.

दिलीप यांच्या पैसे हाताळण्याच्या काही सवयी अप्रतिम आहेत. त्यामधील काही पुढीलप्रमाणे आहेत-

१) रोज झोपण्यापूर्वी चुकीचा, गरज नसतानाही केलाला खर्च लिहून काढणे व पुढील वेळेस तो टाळणे.

२) महिन्याला लागणारे पैसे खर्चाच्या योग्य त्या वाटण्या करून ठेवणे.

३) जमा-खर्चाचे पुस्तक दरमहा तपासणे.

४) कर्ज आणि व्याजावर सुख-चैनीच्या वस्तू न घेणे.

५) अकस्मात धनलाभाच्या आणि परताव्याच्या मार्गांपासून दूर राहणे.

६) कोणासही उधार पैसे देताना, समोरील व्यक्तीकडून तपशीलवार माहिती घेणे.


दिलीप यांचे गुंतवणुकीचे तर्कशास्त्र पुढीलप्रमाणे-

१) प्रॉपर्टी गुंतवणुकीशी कधीही लग्न करू नका. एकदा तुम्हाला २० टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक नफा दिसला, की मालमत्ता विकून नफा काढून घ्या.

२) दीर्घ कालावधीसाठी इक्विटी-शेअरमध्ये किमान ३० टक्के गुंतवणूक करा किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाची कास धरा किंवा दोन्ही करा.

३) दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीच्या विविधतेसाठी ‘पीपीएफ’चे खाते महत्त्वाचे आहे.

४) जर तुमच्या गुंतवणुकीचा परतावा करआकारणीमुळे घटत असेल, तर दुसरा चांगला उपाय शोधण्याचा प्रयत्न करायचा.

५) अर्थव्यवस्था खराब असताना नेहमी थांबा, शांत राहा आणि गप्प बसा.

६) गुंतवणुकीच्या उत्तम संधींसाठी काही रक्कम नेहमी उपलब्ध ठेवावी.

पैशाचे मानसशात्र या व्यक्तींच्या नसानसांमध्ये भरले आहे. दिलीप यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. त्याच्या धनकौशल्याच्या उपजत गुणांबरोबर ते एक उत्तम व्यक्तीसुद्धा आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही पिडीत व्यक्तीचा ते आधार आहेत. समाजाचे ऋण ते पावलापावलांवर फेडतात. चांगले मित्र व त्यांच्या व्यवसायवाढीसाठी नेहमी अग्रगण्य भूमिका घेतात. कोणतीही समस्या आणि अडचणी विचारांनी सोडवतात. आयुष्य एन्जॉय करतात...

दिलीप यांचे म्हणणे आहे, की आपणास सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा निवृत्तीनंतर जर राहणीमानाचा दर्जा कमी करावा लागत असेल, तर आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले नाही. पैसे आले, की प्रथम त्याच्याशी संवाद साधा आणि त्याला विचारा, ‘मी तुझे काय करू?’... म्हणूनच वाटतं, खरंच पैसा यांच्याशी बोलतो... बघा, त्यांच्याप्रमाणे आचरण केलं तर हाच पैसा तुमच्या-आमच्याशी पण संवाद साधू लागेल...

go to top