Technology and Economy जाणून घ्या भारताची पुढे कशी असेल वाटचाल
Technology and Economy जाणून घ्या भारताची पुढे कशी असेल वाटचालEsakal

Technology and Economy जाणून घ्या भारताची पुढे कशी असेल वाटचाल

कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत विज्ञान, तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान असल्याचे अनेक देशांच्या वाटचालीवरून स्पष्ट झाले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या Modern Technology वापरावर भर दिला जात असल्याने आपली अर्थव्यवस्थाही वेगाने प्रगती करत असल्याचे दिसत आहे

दीपक घैसास
deepak.ghaisas@gencoval.com

कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत विज्ञान, तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान असल्याचे अनेक देशांच्या वाटचालीवरून स्पष्ट झाले आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया, जर्मनी आदी प्रगत, विकसित देशांची वाटचाल बघितली, तर हे सहज लक्षात येते. आपल्या देशातही पूरातन काळापासून तंत्रज्ञान Technology होते, असे म्हटले जाते.

मात्र, काळाच्या ओघात त्याचा वापर झाला नाही आणि विकासाच्या आघाडीवर आपण मागे पडलो. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या Modern Technology वापरावर भर दिला जात असल्याने आपली अर्थव्यवस्थाही वेगाने प्रगती करत असल्याचे दिसत आहे. Modern Technology and effects on economy of India

दोन वर्षांपूर्वी कोविडच्या शेवटच्या काळात मी एका अमेरिकन मित्राबरोबर तेथील एका विमानतळावर होतो. नियमानुसार आमचे लसीकरण झाले आहे याचा पुरावा सुरक्षारक्षकांना सादर करणे आवश्यक होते. माझ्या अमेरिकन मित्राने खिशातून एक बऱ्याच वेळा घडी केलेल्या कागदाचा चिटोरा काढून तो अलगद उलगडून दाखवला. मी मात्र माझ्या मोबाईलवरचे Mobile ॲप काढून त्यावर असलेले प्रमाणपत्र दाखवले. ते पाहून तो अमेरिकन अधिकारी व माझा अमेरिकन मित्र फारच प्रभावित झाले.

अमेरिकेसारख्या विकसित देशाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले होते. सध्याच्या काळात भारताने दाखवलेली तंत्रज्ञान अंगीकरणाची वृत्ती व गती हे दोन्ही जगाला विस्मित करून जात आहे. अगदी आरोग्य सेवांपासून Health Services ते निवडणूक मतदान यंत्रांपर्यंत ज्या प्रमाणात भारत हे तंत्रज्ञान स्वीकारत आहे व जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवत आहे. त्याचा भारताच्या अर्थकारणावर दूरगामी व खोलवर एक चांगला परिणाम होत आहे.

तंत्रज्ञान व अर्थकारण Economics यांचा संबंध काही आजचा नाही. मानवी इतिहासात तंत्रज्ञान व मानवाची आर्थिक उन्नती यांचा घनिष्ट संबंध आहे. सर्वांत जुने तंत्रज्ञान म्हणजे अग्नी! याचा उपयोग स्वतःच्या रक्षणासाठी व अन्न शिजविण्यासाठी माणसाने केला. हे सर्वांत जुने तंत्रज्ञान माणूस आजही अन्न शिजविण्यासाठी व रक्षणासाठी वापरतो आहे.

अग्नीचे स्रोत बदलले; पण उपयोग अजून तोच आहे. त्यानंतर मातीपासून मडकी, भांडी बनवायचे तंत्रज्ञान माणसाला कळले. चाकाचे ज्ञान, तर क्रांतीकारक ठरले. त्यानंतर पवनचक्की, १०४४ मध्ये शोध लागलेले होकायंत्र व त्याचा प्रवासासाठी होणारा उपयोग अर्थकारणावर मोठाच परिणाम साधून गेला. १०५५ मध्ये छपाई तंत्रज्ञान आले व त्याचा उपयोग ज्ञानसंवर्धन, विचारांची देवघेव याचबरोबर अर्थार्जनावर परिणामकारक ठरला.

१७६५ च्या सुमारास वाफेचे इंजिन आले व त्याचा मानवाचा अर्थकारणावर लक्षणीय परिणाम झाला. मालाची व प्रवाशांची ने-आण याचबरोबर हे इंजिन कारखानेही चालवू लागले. १९३७ मध्ये संगणक आले व १९४७ मध्ये ट्रान्झिस्टरचे तंत्रज्ञान अवगत आले. १९७४ मध्ये माहिती तंत्रज्ञाना सुरुवात झाली. तेव्हापासून ते २०१० मध्ये आलेल्या एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. याचा जागतिक अर्थकारणावर किती खोलवर परिणाम झाला आहे, हे आपण पाहात आहोत.

अर्थात, एखाद्या देशाची आर्थिक प्रगती व वाढ ही त्याच्या ठोकळ उत्पादनवाढीशी जोडली गेली असली, तरी देशाची संतुलित आर्थिक प्रगती हेही परिमाण अत्यंत आवश्यक आहे. संतुलित विकास हा भौगोलिकदृष्ट्या पसरला पाहिजे, त्याचबरोबर तो विकास देशातील सर्व स्तरांपर्यंत पोचला पाहिजे. अशा विकासामुळे रोजगार निर्मिती झाली पाहिजे व देशभरातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शैक्षणिक व आरोग्य सेवेचे फायदे पोचले पाहिजे.

या सर्वांबरोबर जेव्हा देशाचे ठोकळ उत्पादन वाढते, तेव्हाच तो देश प्रगत ठरतो. आजवरच्या इतिहासाने हे दाखवून दिले आहे, की ज्या ज्या देशाने नवे तंत्रज्ञान अंगिकारले व त्याचा उपयोग संतुलितपणे केला त्या त्या देशांनी कमाल आर्थिक प्रगती साधली. अमेरिका, युरोप, जपान वगैरे प्रगत देशांची यादी आपण बघितली, तर लक्षात येते, की या देशांमध्ये केवळ नवे तंत्रज्ञान उदयासच आले असे नाही, तर त्याचा वापरही अत्यंत विचारपूर्वक झाला व त्यामुळे या देशांनी आर्थिक प्रगती साधली.

भारताचा तंत्रज्ञान अंगिकार
पुरातन काळातही भारतात अत्यंत प्रगतीशील असे तंत्रज्ञान असावे असा एक अंदाज बांधला जातो. आपल्या ऋषीमुनींनी अत्यंत खडतर अभ्यास करून अवकाश शास्त्रापासून ते पदार्थविज्ञान, अणुशास्त्र आदी क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित केले होते, असे म्हणतात; पण त्याचा ठोस पुरावा आज उपलब्ध नाही. वेद-पुराणांची ग्वाही दिली जाते, पण अजूनही हे असे महत्त्वपूर्ण ज्ञान कुठे लुप्त झाले हे माहीत नाही.

परंतु, पूर्वी भारत सुजलाम-सुफलाम व जागतिक व्यापारामध्येही अग्रेसर होता, त्याचे कारणही त्यावेळी भारतीय समाजाने अंगिकारलेले त्यावेळचे तंत्रज्ञान हेच असावे. हल्लीच्या काळात म्हणजे साधारण पहिल्या महायुद्धानंतर मानवाने आपले ज्ञान व तंत्रज्ञान उत्पादने विकसित करण्याकरिता वापरले. युरोप व अमेरिकेने याचा यशस्वी पाठपुरावा करून जगात औद्योगिक क्रांती केली. या तंत्रज्ञानाचा फायदा युरोप व अमेरिकेला झाला व त्यांच्या अर्थकारणात मूलभूत फरक झाले.

प्रगत देशांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. भारत त्यावेळी पारतंत्र्यात होता. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा त्याला फायदा झाला नाहीच; पण त्या उलट इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी भारतातील कच्चा माल आपल्या कारखान्यांना पुरवून तयार मालाचा पुरवठा जगभरात सुरू केला. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्थाही खालावत गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी व जपान यासारख्या देशांनी ज्ञानाचा उपयोग गुणवत्तेसाठी केला.

त्या देशांनी इंजिनिअरिंग व मोटारगाड्यांच्या क्षेत्रात एवढी मजल मारली, की त्या देशात बनविलेल्या मालाला जागतिक मागणी वाढत गेली व त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात वातहात लागलेल्या या अर्थव्यवस्था जोमाने उभ्या राहिल्या व स्वतःची गणती प्रगत देशांमध्ये करू लागल्या. भारत या काळात नुकताच स्वतंत्र झाला होता; पण आपण संरक्षित अर्थव्यवस्थेची कास धरली. देशी उत्पादनांना वाव मिळावा म्हणून जागतिक स्पर्धा टाळत आपण हा स्वदेशी माल आपल्याच बाजारपेठेत ढकलू लागलो. यामुळे स्वदेशी उद्योगांना स्पर्धा राहिली नाही व कोणत्याही गुणवत्तेचा माल या संरक्षित अर्थव्यवस्थेत ढकलायला ते मोकळे झाले.

भारतीय उद्योगांना व अर्थव्यवस्थेला यामुळे दूरगामी नुकसान पोचले. सार्वजनिक क्षेत्रातील अनुत्पादकता, खासगी क्षेत्राची नवे तंत्रज्ञान अंगिकारण्याची उदासीनता या सर्वांमुळे भारतीय अर्थव्यवस्था या काळात केवळ दोन ते तीन टक्क्यांनी वाढत राहिली व जागतिक स्पर्धेत मागे पडत राहिली. १९९० च्या सुमारास ही अर्थव्यवस्था इतकी नाजूक अवस्थेत पोचली, की त्यावेळच्या सरकारला देशाच्या अर्थकारणाचे व अर्थव्यवस्थेचे धोरण बदलणे भाग पडले.

१९९१ ला भारतात जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामुळे विदेशी उत्पादक व गुंतवणूकदार भारतात येऊ लागले. उत्पादक आपले तंत्रज्ञान भारतात आणू लागले. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी भारतीय उत्पादकांनीही नव्या तंत्रज्ञानाची आयात करून जागतिक दर्जाचा माल तयार करण्यास सुरवात केली. यामुळे केवळ भारतीय बाजारपेठच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत भारतीय माल आपली जागा शोधू लागला.

याच सुमारास आणखी एक क्रांती झाली व ती संगणक व दूरसंचार या क्षेत्रात झाली. म्हणजेच ज्ञानाचा उपयोग ज्ञानासाठी होऊ लागला. भारतीय व्यवस्थेत तंत्रज्ञानाची आता कमी नव्हती. वर्षागणिक मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान पदवीधर चांगले शिक्षण होऊन बाजारात उतरत होते. या संगणक क्रांतीमुळे भारताचे संगणक क्षेत्र वाढीला लागले. भारत जागतिक संगणक सेवांच्या नकाशावर अग्रक्रमाने उभा राहिला व भारतीय संगणक तंत्राचा दबदबा जगभरात जाणवू लागला.

अर्थव्यवस्थेतील या सेवाक्षेत्राने नंतरच्या दशकात ६० ते ७० टक्क्यांनी वार्षिक वाढ करत भारतीय अर्थकारणाला नवा आकार दिला. अर्थव्यवस्थेत जेव्हा आपण ठोकळ उत्पादन व सेवाक्षेत्र अशा तीन भागांचा विचार करतो. २०१० पर्यंत भारताच्या एकूण ठोकळ उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६५ टक्क्यांवर पोचला. औद्योगिक उत्पादनाचा वाटा १८ टक्के व उरलेला हिस्सा शेती उत्पादनाचा झाला. जागतिक अर्थकारणात औद्योगिकक्षेत्र प्रथम वाढते व सेवाक्षेत्र त्याच्या मागोमाग वाढते. भारतात मात्र, सेवाक्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढत गेले व औद्योगिक क्षेत्राला त्याच्या वाढीकरिता याचा फायदा झाला.

आज भारतात भारतीय अर्थव्यवस्था कोविड नंतरच्या काळातही सहा ते सात टक्क्यांनी वाढत आहे. ही वाढ जगात सर्वांत जास्त आहे. आज चीन तीन ते चार टक्क्यांनी, अमेरिका १.२ टक्क्यांनी, तर जर्मनी ०.८ टक्क्यांनी वाढताना दिसते. या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती ही आजच्या ३.७ लाख कोटी डॉलरवरून २०३० पर्यंत सात ते दहा लाख कोटी डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज जागतिक स्तरावर मांडला जात आहे.

अर्थात, याकरिता भारताला व येथील उद्योगांना सातत्याने नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे व ते आपापल्या उद्योगात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. या नव्या तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, महाजालांची जोडणी, मोठी माहिती व त्याचे पृथःकरण, क्लाउड कॉम्प्युटिंग, आभासी विश्व, महाजालावरची सुरक्षा, यंत्रमानव आदी बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. आपण जितक्या डोळसपणे या नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करू व ज्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात त्याचा उत्तम वापर करून घेऊ, त्यावर आपल्या आर्थिक विकासाची व प्रगतीची गती ठरणार आहे.

हे देखिल वाचा -

Technology and Economy जाणून घ्या भारताची पुढे कशी असेल वाटचाल
MONEY MAKING नोकरीतली प्रगती आणि 'इसाॅप' काय आहे हा फंडा

डिजिटल परिवर्तन
भारताला गरीब देश म्हणणाऱ्या या जगाला आज तोंडात बोटे घालायला लावणारी भारतातील क्रांती म्हणजे डिजिटल क्रांती. कोविड काळात या क्रांतीला प्रचंड गती मिळाली. शिक्षण, पतसंस्था, आरोग्य सेवा, मालाची ने-आण, माल घरपोच पोचवण्याची व्यवस्था, रेल्वे आरक्षण, बस आरक्षण, सेमिनार, सरकारी व्यवहार अशा कित्येक बाबतीत भारतीय आम जनतेने ज्या वेगाने ही डिजिटल क्रांती हाताळली त्याला तोड नाही.

लसीकरणाचे ॲप हे सरकारी असूनही अत्यंत चोख काम करत होते व त्यामुळे १०० कोटी लोकांना दोन वेळा लस देण्याची प्रक्रिया जगभरातील प्रगत देशांपेक्षाही प्रभावीपणे झाली. याचा फार मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर येण्यामध्ये झाला. आज पैशाची देवाणघेवाण ही चलनी नोटांमध्ये न होता केवळ ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून अगदी मोठ्या दुकानांपासून ते गावातील भाजीवाल्यापर्यंत सहजगत्या होताना दिसते.

ही डिजिटल देयक व्यवस्था आज दिवसाला एक ते दीड कोटी वेळा वापरली जाते व २० टक्के वेगाने त्याची भारतभर वाढ होत आहे. ही सामान्य जनतेकरिता सोयीची तर आहेच; पण त्याचबरोबर या सगळ्या व्यवहारांची डिजिटल नोंद राहते व त्यामुळे काळ्या पैशाच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चाप बसत आहे. आज नवी पिढी बहुतेक खरेदी ही ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून करते आहे. यामुळे भारतीय उत्पादकांना केवळ भारतीयच नाही, तर जागतिक बाजारपेठ मिळत आहे.

ग्राहकांच्या अपेक्षा जसजशा वाढत आहेत, त्या प्रमाणात उत्पादक व सेवा संस्थांना आपल्या नवीन व जुन्या बाजारपेठांसाठी नवी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. उद्योगवाढीसाठी याला पर्याय नाही. जे उद्योग नवी तंत्रज्ञान वापरणार नाहीत किंवा वापरायला उशीर करतील ते लयाला जातील व त्यांची जागा नवी तंत्रज्ञान अंगिकारलेले उद्योग घेतील यात शंका नाही.

आज जगभरात ४.० अशा नावाने नव्या उद्योगांची मांडणी सुरू आहे. डिजिटल लॉजिस्टिक्स, डिजिटल साह्य, डिजिटल आर्थिक व्यवहार, निर्णय प्रक्रियेतील डिजिटल माहितीचा व आज्ञावलीचा आधार अशा गोष्टी आता या नवीन उद्योगमांडणीत अनिवार्य झाल्या आहेत. यांच्या उपयोगाने आजच्या जागतिक औद्योगिक स्पर्धेत तुम्ही टिकू शकाल; पण तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल, तर मात्र सतत नवसंकल्पना तयार करणे व त्यांचा उपयोग आपापल्या क्षेत्रात करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्वांत मोठा बदल उद्योजकांनी आपल्या मानसिकतेमध्ये करणे आवश्यक आहे. कारण उद्योग ४.० ही केवळ तंत्रज्ञानाची बाब नाही, तर मानसिकतेची बाब आहे

सर्वदूर पोचणारे तंत्रज्ञान
बऱ्याच लोकांचा असा समज असतो, की तंत्रज्ञान म्हणजे केवळ संगणक व माहिती-तंत्रज्ञान; पण आज ते खरे नाही. आपल्या जीवनातील प्रत्येक भागावर या तंत्रज्ञानाचा मोठा पगडा आहे. घरात वापरले जाणारे धुलाई यंत्र, ओव्हनपासून ते करमणुकीची साधने, दूरध्वनी, दूरसंचार अशा प्रत्येक बाबीत नवनवीन तंत्रज्ञान डोकावत आहे.

आज घरात केर काढायला, झाडू-पोछा करायला यंत्रमानव आहेत. त्यामुळे कित्येक गृहिणींचे काम सोपे झाले आहे. या वैयक्तिक गोष्टींबरोबरच आपण जेव्हा उद्योगक्षेत्रात बघतो तेव्हा लक्षात येते, की अर्थव्यवस्थेमध्ये असा एकही प्रभाग नाही, की ज्यामध्ये तंत्रज्ञानाची खास करून नवनवीन तंत्रज्ञानाची गरज नाही. थोडक्यात, या गोष्टीचा ऊहापोह खालीलप्रमाणे ः

१) नैसर्गिक संपत्ती ः सर्वच अर्थव्यवस्थांचा मूळ गाभा हा नैसर्गिक संप्तीमध्ये असतो. शेती व उत्पादन उद्योग हे सर्वस्वी नैसर्गिक संपत्तीवरच अवलंबून असतात. गेल्या कित्येक दशकांमध्ये मानव ज्या वेगाने ही संपत्ती संपवत चालला आहे हे पाहता एक वेळ अशी येईल, की पृथ्वीवरील ही संपत्ती संपून जाईल. म्हणूनच मानव चंद्र, मंगळ आदी ग्रहांवर अशी संपत्ती मिळेल काय याचा शोध घेत आहे.

अशा संपत्तीत तेल, खनिजे, पाणी, झाडे, पर्वत, पाऊस अशा सर्वच पंचमहाभूतांसह गोष्टींचा समावेश होतो. आज मानवनिर्मित उपग्रहांबरोबर अनेक प्रकारचे तंत्रज्ञान या नैसर्गिक संपत्तीपर्यंत पोचण्यास मदत करत आहेत. पाऊस व पाणी याबाबतची अनिश्चितता संपवण्यासही तंत्रज्ञान मदत करत आहे. खनिजे, तेल, पाणी आदींचे जमिनीखालचे, समुद्राखालचे साठे शोधण्यासही या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे.

२) शेती ः शेती हा पूर्वापार चालत असलेला उद्योग असला, तरीसुद्धा जगाची लोकसंख्या पाहता तेवढीच जमीन किती धान्य पिकवणार! पण आज जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकसुधारित बियाण्यांची निर्मिती होत आहे. भारतात अशाप्रकारचे कापसाचे उत्पादन पूर्वीच सुरू आहे. अशा बियाण्यांमुळे उत्पादकता वाढून एकरी जास्त पिके घेता येतात.

त्याशिवाय नवीन प्रकारची खते, जंतूनाशके याविषयीचे तंत्रज्ञानही शेती व्यवसायाला साह्यभूत ठरत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे हवामानाविषयीचे अंदाज अचूक येऊ लागले आहेत व त्याचा फायदा शेती व्यवसायाला होत असतो. याशिवाय शेतीमाल, भाज्या, फले साठविण्याचेही तंत्रज्ञान बदलत असते व याचा फायदा शेतकऱ्याला बाजारात भाव टिकवून ठेवण्यामध्ये होत असतो.

३) आरोग्य सेवा ः आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा माझ्यामते, आरोग्य सेवेला झाला आहे. आज वैद्यकीय क्षेत्रामधील प्रत्येक व्यक्तीला या नव्या तंत्रज्ञानाची ओळख असणे अनिवार्य झाले आहे. अगदी चिकित्सा सेवेपासून ते शस्त्रक्रियांपर्यंत ज्याप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर होतो तो विस्मयकारक आहे. लॅप्रोस्कोपी, रोबोटिक प्रकारच्या शस्त्रक्रिया या अचूक व कमी त्रासदायक असतात.

रुग्ण दोन दिवसांत घरी जाऊन आपापल्या कामाला लागतात. सीटी स्कॅन, एमआरआयसारखी इमेजिंग यंत्रे शरीराचा आतपर्यंत ठाव घेऊन अचूक निदान करायला मदत करतात, तर संगणक सिम्युलेशन तंत्राने प्रशिक्षण; तसेच औषध संशोधनदेखील पूर्वीपेक्षा खूपच वेगवान झाले आहे.

आज आरोग्यसेवा दूरवर खेड्यातही उपलब्ध होण्यासाठी ‘टेली-मेडिसीन’सारख्या व्यवस्था या नव्या तंत्रज्ञानामुळे अस्तित्वात आल्या आहेत व याचा फायदा नागरिकांच्या आरोग्याला व त्यायोगे अर्थाकारणाला होत आहे. वैद्यकीय यंत्र बनवणारे उद्योगही जगभरात भरपूर प्रगती करत आहेत. या यंत्रांचे चालवणे, तेल-पाणी वगैरेसाठी लागणारे मनुष्यबळ अर्थव्यवस्थेत नवे रोजगार संधी उपलब्ध करत आहेत.

४) करमणूक ः जगभरात करमणूक उद्योग हा सातत्याने प्रगत करत आहे. या क्षेत्रात आज ज्याप्रकारे चित्रपट पूर्ण करण्यात येतात, ते पूर्वीपेक्षा खूपच वेगळे आहे. तयार चित्रांचे वितरणही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने थेट चित्रपटगृहांमध्ये करण्यात येते. आज एका ठिाकणाहून हे वितरण जगातल्या कोणत्याही चित्रपटगृहात किंवा अगदी थेट घरा-घरांमध्येसुद्धा करता येते.

चित्रीकरणासाठी कलाकारांना प्रत्यक्ष जागेवर जाण्याची गरजच नसते. हिरव्या पडद्यावर हे सगळे चित्रीकरण पूर्ण करून नंतर पाठीमागे वेगवेगळी ठिकाणे ‘चिकटविली’ जातात. या सर्वांमुळे आज चित्रपटनिर्मितीत कमालीची वाढ झाली आहे. तेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती तर होतेच; पण संपूर्ण अर्थकारणाला नवी दिशा मिळत आहे.

५) उत्पादन उद्योग ः हा उद्योग नव्या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलत चालला आहे. वाफेचे इंजिन व त्यानंतर आलेली औद्योगिक क्रांती व आजचा उत्पादन उद्योग यातून बरेच पाणी वाहून गेले आहे. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे तंत्रज्ञान आज उत्पादन उद्योगात सर्रास वापरले जाते. यामुळे उत्पादनक्षमता, तर वाढतेच आहे; पण उत्पादनातील अचूकता व एकंदर उत्पादकता यामध्ये आमूलाग्र बदल दिसून येतो.

अर्थात, यामुळे रोजगारीवर गदा येईल काय, ही भीती बोलून दाखवली जाते; पण माझ्या मते ही नवी यंत्रे तयार करणे व ती सतत चालू ठेवणे याकरिता प्रत्यक्ष माणसांची गरज कायम राहणार आहे. म्हणजेच रोजगारनिर्मिती वाढत राहील. त्याहीपुढे जाऊन आता थ्रीडी प्रिंटिंग नावाचे नवे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यामुळे ग्राहकाला नेमके हवे आहे, अशा वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. जेव्हा यापुढील काळात या तंत्रज्ञानावर आधारित नवे कारखाने उभे राहतील, तेव्हा या उद्योगात क्रांतिकारक बदल घडतील व हा उद्योग अधिक बरकतीस येईल.

६) लॉजिस्टिक्स ः हा व्यवसाय आता भारतातही बाळसे धरू लागला आहे. भारतात बनणारे रस्त्यांचे जाळे, नवे तंत्रज्ञानावर आधारित गोदामे, बंदरे, विमानतळ या सर्वांमुळे कच्च्या मालाची व तयार मालाची ने-आण सुकर होत आहे. यामुळे बाजारपेठेत पोचायला लागणारा वेळ कमी होऊन उद्योगांची मालसाठ्यातील गुंतवणूक कमी होणार आहे. नाशिवंत मालाचे आयुष्य वाढणार आहे व शेती आणि उत्पादन उद्योगाला याचा फायदा मिळून संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक नवी गती मिळणार आहे. संगणकीकरण, डिजिटायजेशन, दूरसंचार यंत्रणा, उपग्रह दळणवळण या सर्वांमुळे हे शक्य होत आहे.

७) बाजारपेठेतील वाढ ः नव्या तंत्रज्ञानाचा फायदा हा प्रत्येक उद्योगाला बाजारपेठेत असीम वाढ करून देण्यात यशस्वी होत आहे. माहिती महाजाल, आभासी विश्व, उत्तम दळणवळण या सर्वांमुळे सीमारहित बाजारपेठ खुली होत आहे. तुमचा माल गुणवत्तेच्या व चांगल्या किमतीच्या आधारे आज तुम्ही कोठेही विकू शकता. अर्थात, अशा उपलब्ध होत जाणाऱ्या बाजारपेठांमुळे उद्योगांची विक्री वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.

Technology and Economy जाणून घ्या भारताची पुढे कशी असेल वाटचाल
Money Matters फक्त पैसे मिळवणारा श्रीमंत की दुसऱ्यांच्या स्वप्नांचा विचार करणारा?

वित्तउद्योग व तंत्रज्ञान
माझ्या मते, वित्तउद्योगाने सर्वांत आधी व सर्वांत अधिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. १९९० पर्यंत संगणकांना विरोध करणारे वित्तसंस्थांचे कर्मचारी आज नव्या तंत्रज्ञान अंगिकारण्यात अग्रेसर असल्याचे जाणवते. आज प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत न जाता संपूर्ण पैशाचे व्यवहार घरबसल्या, प्रवासात असताना, संगणकावर किंवा अगदी मोबाईलवरही पूर्ण करता येतात. शेअरची खरेदी-विक्री आधीच एका क्लिकवर होत होती; पण आज म्युच्युअल फंड, कर्जरोखे, मुदत ठेव योजना अशा सर्वच प्रकारच्या गुंतवणुका तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत वेगाने व पारदर्शकपणे सहजसाध्य आहेत.

फक्त नवीन पिढीच नाही, तर सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक प्रथम साशंकपणे मात्र, आता सराईतपणे हे तंत्रज्ञान वापरताना दिसतात. भारतात डिजिटल देयकांची उलाढाल वार्षिक २३ टक्के गतीने वाढते आहे. यूपीआय, बीबीएएससारखी नवी वित्तीय उत्पादने सर्वत्र वापरात आलेली दिसत आहेत. पथकर गोळा करण्यासाठी वापरात असलेल्या यंत्रणेची उलाढाल १२३ टक्क्यांनी वाढत आहे, तर बिल पेमेंटची व्यवस्था ५०० टक्क्यांनी वाढली आहे.

भारताने अंगिकारलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार इतका झपाट्याने झाला आहे, की ती गती याहीपुढे जाऊन ब्लॉकचेनसारखे तंत्रज्ञान हे वित्तीय संस्थांचा चेहरामोहराच बदलून टाकेल. आज भारतातील सरकारी बँका, खासगी बँका, सहकारी बँका व अगदी पतसंस्था या सर्वांमध्ये नवे तंत्रज्ञान अंगिकारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

या सर्वांचा उद्देश एकच, की ग्राहक कसे टिकवून ठेवता येतील, त्यांना वेगाने, स्वस्तात व पारदर्शीपणे कशी सेवा देता येईल हे पाहणे. हे जमणार नसेल, तर ती वित्तीय संस्था लवकरच आपला गाशा गुंडाळेल. आता जगात आभासी वित्तसंस्थांचा जमाना आला आहे. त्यामुळे तुमच्या उद्योगाचा आकार हा तुमच्या शाखा किती आहेत यावर अवलंबून नाही, तर तुम्ही कोणते तंत्रज्ञान वापरत आहात व किती सहजतेने व सुरक्षितपणे वापरत आहात यावर अवलंबून असेल. हे तंत्रज्ञानच आता वित्तीय उद्योगाला स्थैर्य व बळकटी देऊ शकते व असा सशक्त उद्योग हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असतो.

पुढची वाट ः
आपण सगळेच आजच्यापेक्षा उद्या जास्त चांगला असेल, या आशेवर जगत असतो. देशाचे तंत्रज्ञान व अर्थकारण हेही याच संकल्पाने पुढे जात असते. आज जगभरातील संशोधनामुळे जवळजवळ दररोज नवे तंत्रज्ञान बाजारात येत आहे. अर्थात, हे सर्वच तंत्रज्ञान उपयोगी असेलच असे नाही. अनेक निकषांवर ते तपासून बघणे जरुरी आहे; पण एकदा खात्री पटली, की असे तंत्रज्ञान अंगिकारणे हे उद्योग व अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.

आज प्रत्येक राज्याचे सरकार व केंद्र सरकारही ‘ई-गव्हर्नस’चा स्वीकार करत सरकारी सेवांमध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याकडे पाहत आहे. अगदी जमिनींचे सात-बारा उतारे ते करनिर्धारण, सारा वसुली या सर्वच विषयांत नवे तंत्रज्ञानाचा वापर बहुतेक राज्यांमध्ये सुरू झाला आहे. प्राप्तिकर निर्धारण प्रक्रियेत आज आपल्याला प्राप्तिकर कार्यालयात जावे लागत नाही व हेच वस्तू व सेवाकराच्या बाबतीतही दिसून येते. या सर्वांमुळे एकंदर अर्थव्यवहारात येणारा वेग व पारदर्शकता याचा देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

भ्रष्टाचारालाही काही प्रमाणात आळा बसताना दिसतो आहे. सरकारने आता खुल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजेच ‘ओएनडीसी’ची (ONDC) घोषणा केली आहे. या तंत्रज्ञानामुळे लहान-मोठ्या सर्वच उद्योगांना त्याचा वापर करत आपला उद्योग वाढवता येईल. यामध्ये प्रथमतः ३६,००० व्यापारी सामील झाले असून, त्याचा प्रसार २३६ शहरांमध्ये झाला आहे. त्यामुळे ग्राहकाला हे सर्व व्यापारी एकाच भागात दिसतील व त्यामुळे वाजवी किंमत व उत्तम सेवा देणाऱ्यांकडूनच ते माल खरेदी करतील.

अर्थात, ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांचीही गुणवत्ता व बाजारपेठ यामध्ये लक्षणीय वृद्धी होईल. भारतात वित्तीय संस्थांकडून देण्यात येणाऱ्या कर्जाची मंजुरी व छाननी करण्यासाठी ‘ओसीईएन’ (OCEN) नावाचा नवा प्लॅटफॉर्म येऊ घातला आहे. यात तुम्हा-आम्हा सर्वांचेच क्रेडिट रेटिंग असेल व ते आपणच केलेल्या आर्थिक व्यवहारांककडे बघून संगणकाने ठरवलेले असेल. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर होणार आहे. यामुळे कर्जमंजुरीची, जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती वेगाने पारदर्शीपणे होईल.

नव्या तंत्रज्ञानावर आधारित अशा अनेक आज्ञावली बाजारात येणार आहेत, ज्या उद्योगाला सुलभ व सुकर ठरतील व अर्थव्यवस्थेला आणि अर्थकारणाला सुयोग्य वेग देतील.
हे सर्व सुरू असताना भारतीय म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. हे सर्व बदल दिलखुलासपणे मान्य करून अंगिकारणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कोणतेही तंत्रज्ञान मनुष्यस्वभाव बदलू शकत नाही. खोटेपणाची आवड, भ्रष्टाचार, साठेबाजी आदी उद्योगात असणारे रोग तंत्रज्ञानामुळे कमी होऊ शकतील; पण शेवटी त्या दुष्प्रवृत्तींना टाळणे हे जास्त श्रेयस्कर आहे व कोणत्याही जगात ते केवळ आपल्याच हातात आहे.

(लेखक प्रसिद्ध उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com