श्रीमंत व्हायचंय? मग आधी 'हे' करा!

श्रीमंत व्हायचे असेल तर आधी तसे मनोमन ठरवले पाहिजे.
श्रीमंत व्हायचंय? मग आधी 'हे' करा!
Summary

आपल्या संस्कृतीत लक्ष्मीपूजनाचा विचार आहे. समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधनसंपत्ती असली पाहिजे आणि चांगल्या मार्गाने ती मिळवण्यात गैर काहीच नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. पण त्यासाठी सर्वप्रथम मनभूमी सज्ज केली पाहिजे.

तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? श्रीमंत व्हायचे असेल तर आधी तसे मनोमन ठरवले पाहिजे. कदाचित हे वाक्य अगदीच भोंगळ वाटू शकेल. पण कारणे जाणून घेतली तर हे वाक्य तेवढे भोंगळ नाही, हे तुम्हालाही पटेल. संपन्नता, समृद्धीचे पीक तुमच्या आयुष्यात तरारून यावे, असे वाटत असेल तर आधी चुकीच्या धारणा, समज, गृहिते यांचे तण काढून टाकावे लागेल. मनाची पाटी कोरी केली पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या, योग्य मार्गाने संपत्ती मिळविणे यात काहीसुद्धा गैर नाही, चूक नाही, पाप नाही, हे स्वतःच्या मनावर स्वतःच बिंबवले पाहिजे. या बाबतीत स्वतःच स्वतःच्या धारणा तपासाव्या लागतील. आपल्याकडे गरिबीचे उदात्तीकरण करण्याची रीत आहे.

मनात खोलवर ज्या जाणीवा रुजलेल्या असतात, त्या दिशेनेच आपली कृती घडते. या जाणीवांमध्ये लहानपणापासून ज्या प्रकारची मूल्ये ठसविली जातात किंवा आपोआप ठसली जातात, त्यांचाच वाटा मोठा असतो. आपल्या भाषेत ज्या प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार रुजलेले असतात, तेही विशिष्ट मानसिकता घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भाषा-संस्कृती या अभिन्न गोष्टी असतात, हे वेगळे सांगायला नको. ट्रकच्या मागे लिहिलेले, ‘धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती’ हे वाक्य नेमका कोणता संदेश देते? आरोग्य आणि गरीबी एकत्र नांदते हे त्यातील सूचन बरोबर आहे का? श्रीमंती आणि दुबळेपणा हे समीकरण तरी बरोबर आहे का? श्रीमंती धट्टीकट्टी असू शकणार नाही, असे कशाच्या आधारावर म्हणायचे? असे प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजेत.

श्रीमंत व्हायचंय? मग आधी 'हे' करा!
कोरोनातील अनलॉकनंतर ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नव्या संधी!!

नवी परिभाषा घडवायला हवी. Behind every fortune there is a crime हे ‘गॉडफादर’फेम ख्यातनाम लेखक मारिओ पुझोचे वाक्य शिरोधार्य मानण्याचे कारण नाही. वास्तविक ते गुन्हेगारी जगतातील एका कुरूप वास्तवाचे वर्णन आहे. तो काही अबाधित असा सिद्धान्त नाही. पण हे एक वाक्य इतक्या वेळा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, की त्याचा मूळ संदर्भच हरवून जातो आणि जणु काही हे सिद्ध झालेले समीकरणच आहे, असे मानले जाते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींबद्दल संशय घेतला जातो आणि आधार म्हणून हे वाक्य बिनदिक्कतपणे इतरांच्या तोंडावर फेकले जाते. एखाद्याला प्रमोशन मिळाले, घसघशीत पुरस्कार मिळाला, धंद्यात बरकत आली, या सगळ्या घटनांकडे पाहताना, नक्कीच काहीतरी काळेबेरे केले असणार, अशी शंका घेणारे बरेच असतात. या वृत्तीमुळे संबंधित व्यक्तीलाही त्रास होत असेलच. पण त्याहीपेक्षा एक नकारात्मक वातावरण निर्माण होते.

श्रीमंत व्हायचंय? मग आधी 'हे' करा!
जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'!

खरे म्हणजे Behind every fortune there is a reason हाही विचार करण्याची गरज आहे. तसा विचार केला म्हणजे यशस्वी व्यक्तीने केलेल्या परिश्रमांची, गुणवत्तेची, कौशल्याची चर्चा होऊ शकते. निकोप अशी स्पर्धा त्यातून साकारू शकते. यशाच्या रहस्याचा सकारात्मक शोध घेतला जाऊ शकतो. इतरांनाही एकाच्या यशातून प्रेरणा घेत पुढे जाण्याची उर्मी निर्माण होते.
नेहमीच्या भाषा व्यवहारातील कितीतरी बाबींचा उल्लेख करता येईल. ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, हा वाक्प्रचार एक शहाणपणाचा संदेश देतो; हे खरेच आहे. तो म्हणजे आपली ऐपत लक्षात घेऊन खर्च करायला हवा. ती शिकवण योग्यदेखील आहे. पण कधीतरी हातपाय ऐसपैस पसरण्यासाठी अंथरूणदेखील अधिक रूंद केले पाहिजे, याचीही शिकवण द्यायला हवी. ती आपल्या मनात खोलवर रुजवली पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com