‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा?}

‘आयपीओ’च्या माध्यमातून शेअरसाठी अर्ज करणे हे डिजिटल प्रक्रियेमुळे आता सोपे झाले आहे.

‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा?

- निरंजन अवस्थी

यंदाच्या वर्षी अनेक कंपन्या प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) बाजारात येताना दिसत आहेत. या ‘आयपीओं’ना गुंतवणूकदारांचा पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. ‘आयपीओ’च्या माध्यमातून शेअरसाठी अर्ज करणे हे डिजिटल प्रक्रियेमुळे आता सोपे झाले आहे. २००७ मध्ये नव्याने नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांपैकी केवळ २० ते २३ टक्के कंपन्यांनी सकारात्मक परतावा दिला आहे, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याचाच अर्थ ‘आयपीओ’च्या लाटेमध्ये उडी मारणे नेहमीच फायद्याचे असते, असे नाही. जर आपण आपले पैसे तज्ज्ञांच्या टीमला व्यवस्थापित करण्यासाठी दिले, तर आयपीओ गुंतवणुकीची त्रिसूत्री अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणली जाऊ शकते. ‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा, हे आपण बघितले पाहिजे.

शेअर बाजारातील कल हे दुधारी तलवारीसारखे असू शकतात. काही लोक यामधून लाभ मिळवितात, तर अनेक लोक पैसा गमावतात. भारतातील प्राथमिक समभाग विक्रीची किंवा ‘आयपीओ’ची लाट हा एक चर्चेचा विषय आहे. एका अंदाजानुसार २०२१ मध्ये ३६ हून अधिक कंपन्यांनी ‘आयपीओ’चा पर्याय निवडला आहे. या प्राथमिक समभाग विक्रींद्वारे एकत्रितपणे ७२,००० कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी उभारला गेला आहे. २०२० मध्ये ‘आयपीओ’द्वारे जमा केलेल्या ३१,१२८ कोटी रूपयांपेक्षा ही रक्कम खूप जास्त आहे. यावरूनच भारतातील प्राथमिक समभाग विक्रीच्या बाबतीत गुंतवणूकदारांमध्ये किती उत्सुकता आहे, हे लक्षात येते. येथे प्रश्न असा आहे, की ‘आयपीओ’मधील शेअरसाठी अर्ज केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी पैसे कमावले आहेत का?, याचे उत्तर नाही असे आहे.

प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) शेअरसाठी अर्ज करणे हे डिजिटल प्रक्रियेमुळे आता सोपे झाले आहे. मात्र, त्यातून शेअर मिळणे हे नशिबाचा भाग आहे. अनेक गुंतवणूकदार चांगल्या ‘आयपीओ’मध्ये शेअर मिळण्याची शक्यता वाढावी, यासाठी मार्ग शोधण्यासाठी ऑनलाईन शोध घेतात. मात्र, यातील काही युक्त्या किंवा धोरणे; जसे, की कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या डीमॅट अकाउंटमार्फत अर्ज करणे, आयपीओ सुरू झाल्यावर पहिल्या तासातच अर्ज करणे अशा गोष्टी ‘आयपीओ’च्या बाजारात क्वचितच काम करतात. अनेक वेळा गुंतवणूकदार खराब दर्जाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात.

हेही वाचा: रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्याय

सरसकट उडी मारणे अयोग्य

ज्यांनी २००७ मधील तेजी पाहिली नाही किंवा गुंतवणूक केली नाही, त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे धडे आहेत. काही अभ्यास हे दर्शवितात, की शेअरच्या वधारण्याच्या गतीकडे पाहून आंधळेपणाने गुंतवणूक करणे उपयुक्त ठरत नाही. असा अंदाज आहे, की २००७ च्या तेजीमध्ये नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांपैकी २५ ते ३० टक्के कंपन्या या डी-लिस्ट झाल्या आहेत किंवा शेअर बाजारातील व्यवहारातून बाहेर गेल्या आहे .२००७ मध्ये नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांपैकी केवळ २० ते २३ टक्के कंपन्यांनी सकारात्मक परतावा दिला आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याचाच अर्थ ‘आयपीओ’च्या लाटेमध्ये उडी मारणे नेहमीच फायद्याचे असते, असे नाही.

भारतासारख्या उच्च वाढीच्या अर्थव्यवस्थेत ‘आयपीओं’ना पूर्णपणे टाळण्याची गरज नाही; मात्र सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. ‘आयपीओं’मध्ये गुंतवणूक करताना प्रभावी निर्णय घेण्यास मदत करणारे काही घटक समजून घेऊया.

१) खराब कंपन्यांना टाळा

चांगल्या काळात निकृष्ट दर्जाचे व्यवसायही उच्च मूल्यांकनाची मागणी करतात. गुंतवणूकदारांनी दोन गोष्टी शोधण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे व्यवसायाची खरी किंमत आणि दुसरी म्हणजे ‘आयपीओ’च्या किमतीत पैसे कमवू शकतो का? निकृष्ट दर्जाच्या व्यवसायात गुंतवणूक करणे म्हणजे एक प्रकारे आपत्तीच आहे. हे लक्षात घ्यायला हवे, की खराब दर्जाच्या कंपन्या बाजारातील भावना आणि नोंदणीनंतरच्या फायद्यांच्या आधारावर लाभ मिळवितात. त्यांच्या शेअरची किंमत काही काळासाठी ‘आयपीओ’च्या किंमतीपेक्षाही जास्त असू शकते. अशा कंपन्यांच्या बाबतीत वैयक्तिक गुंतवणूकदार क्वचितच तोटा वेळेवर रोखू शकतात. म्हणूनच गुंतवणूकदारांनी अशा खराब कंपन्यांना टाळावे.

हेही वाचा: भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे?

२) योग्य निवड करणे

वाढत्या वा वधारणाऱ्या बाजारपेठेत भविष्याचा विचार नसल्याने मूल्यांकने ताणलेले दिसतात. मात्र, नजिकच्या भविष्यातील वाढीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भविष्यातील वाढ आणि नफ्याचा योग्य अंदाज लावता आला तर गुंतवणूकदारांना इतरांपेक्षा पुढे जाण्यास मदत होऊ शकते. भविष्यातील कमाईचा संदर्भ लक्षात घेता सध्याची किंमत जर योग्य असेल तर गुंतवणूकदारांना ‘आयपीओ’चा फायदा होऊ शकतो. विशेष करून उदयोन्मुख उद्योगातील कंपन्या ज्या सक्षम व्यवस्थापनाने चालविल्या जातात आणि ज्यांना गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे, असे काही काळातच लाभदायक किंवा मल्टीबॅगर ठरू शकतात. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे तुम्हाला ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ठोस कारण हवे.

३) किंमतीत समायोजन

जेव्हा एखादी कंपनी सार्वजनिक होते, तेव्हा माहितीचा एक निश्चित संच उपलब्ध असतो, मात्र नोंदणीनंतर कंपनी वेळोवेळी माहिती देत असते. गुंतवणूकदारांनी याच्या आधारावर आपल्या अपेक्षा ठेवाव्यात. बाजारातील अपेक्षेप्रमाणे कंपनीची कामगिरी नसेल तर यातून बाहेर पडणे योग्य व अर्थपूर्ण ठरेल. मात्र काही वेळेस एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत खूपच अस्थिर असते. अनेकदा अपेक्षा व आयपीओची किंमत ही अर्ज करण्याच्या वेळेस खूप जास्त असते. अशा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कंपनीला थोडा वेळ लागतो आणि म्हणून अनेक गुंतवणूकदार अधिर होऊन शेअर विकून टाकतात. अशा कंपन्यांच्या शेअरच्या किंमती नंतर आकर्षक होतात. बदलत्या परिस्थितीची जाणीव असलेल्या गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांचे शेअर खरेदी करून त्याचा लाभ घेतला पाहिजे. अनेकदा कंपन्यांच्या शेअरच्या किंमती आकर्षक होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. केवळ जाणकार गुंतवणूकदारांना दीर्घकालीन क्षमता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक कायम ठेवण्याचे अर्थ व मूल्य समजते.

हेही वाचा: चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...

‘आयपीओ फंड’ बाजारात

जर आपण आपले पैसे तज्ज्ञांच्या टीमला व्यवस्थापित करण्यासाठी दिले, तर आयपीओ गुंतवणुकीची ही त्रिसूत्री अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणली जाऊ शकते. काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी आता ‘आयपीओ फंड’ आणायला सुरवात केली आहे. हे वरील त्रिसूत्रीपणे काम करतात. नव्याने नोंदणीकृत झालेल्या शेकडो ‘आयपीओ’मधील सर्वोत्कृष्ट संकल्पना असलेला पोर्टफोलिओ व्यवस्थापित करण्यासाठी हे फंड मदत करतात. उत्तम जोखीम व्यवस्थापन रचनेमुळे घसरणीवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. ‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग काढण्याचा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्या गुंतवणूकदारांना मध्यम कालावधीचा दृष्टीकोन ठेऊन चांगल्या दर्जाच्या ‘आयपीओं’मध्ये गुंतवणूक करायची आहे, अशांनी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करायला हरकत नाही.

(लेखक एडलवाईज एएमसीच्या प्रॉडक्ट, मार्केटिंग व डिजिटल विभागाचे व्यवसायप्रमुख आहेत.)

(डिस्क्लेमर ः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Share MarketIPO
go to top