
एक रात्रीचा करोडपती.....
अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते....जाणून घेऊ भारतात घडलेल्या काही मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याची ही कहाणी (one night crorepati theft in new Delhi)
२६ नोव्हेंबर, २०१५, एका खासगी बँकेची (Bank) कॅश व्हॅन मनी चेस्टमधून २२ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन नवी दिल्लीच्या विकास पुरी शाखेतून निघाली....बँकेच्या एटीएमपर्यंत रोख रक्कम घेऊन जाऊन ती एटीएममध्ये भरणे हे या व्हॅनच्या ड्रायव्हरचे आणि गार्डचे काम. एकूण नऊ स्टीलच्या पेट्यांमध्ये ही रक्कम भरलेली होती.
हेही वाचा: अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..!
विनय पटेल हे या गार्डचे तर प्रदीप कुमार शुक्ला हे ड्रायव्हरचे नाव. ओखला मंडीपाशी गाडी पोचली तेव्हा वाटेत पटेलने प्रदीप कुमारला गाडी थांबवायला सांगली आणि लघवी करण्यासाठी तो उतरला. ही संधी साधून व्हॅनचा ड्रायव्हर प्रदीप शुक्लाने सरळ रोख रकमेच्या पेट्या असलेल्या व्हॅनसह पळ काढला.
लघवी करुन मागे वळलेल्या पटेलला व्हॅन दिसली नाही. त्यामुळे तो चक्रावला. त्याने प्रदीप कुमारला फोन लावला. त्यावेळी ट्राफिक जास्त असल्याने आणि पुढे जाऊन यु टर्न घेऊन येतो, असं त्यानं पटेलला सांगितली. पण तो परत आलाच नाही. हबकलेल्या पटेलने आपल्या एजन्सीला ही घटना कळवल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचसह पाच पथके या व्हॅनचा शोध घेऊ लागली. ज्या ठिकाणी गार्ड लघवीसाठी उतरला होता, त्या जागेपासून जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपावर ही व्हॅन उभी असलेली सापडली. मात्र, त्या रोख रकमेच्या पेट्या नव्हत्या. ही व्हॅन शोधण्यासाठी पोलिसांनी जीपीएस ट्रॅकरची मदत घेतली होती.
अवघ्या बारा तासातच हा गुन्हा करणारा प्रदीप कुमार पकडला गेला. गोविंदपुरी मेट्रो स्टेशनजवळच्या एका गोदामात त्याने ठेवलेल्या पैशांच्या बाॅक्स सापडल्या. १० हजार ५०० रुपये वगळून अन्य सर्व रक्कम शाबूत होती. त्यानं या पैशातले काही पैसे कपडे आणि घड्याळ खरेदीसाठी वापरलेले होते. थोडक्यात तेवढ्यावरच भागलेले असते.
एका रात्री पुरता करोडपती बनलेल्या प्रदीप कुमार शुक्लाचे औदार्य बँकेच्या पैशांवर जागृत झाले होते. त्या रात्री बँकेच्या रोख रकमेवर डल्ला मारल्यानंतर प्रदीप कुमारने महागडी दारु खरेदी केली. त्यातले काही पैश त्यांनी मोठ्या 'उदारपणे' भिकाऱ्यांनाही वाटले. ज्या गोदामात व्हॅन उभी केली तिथल्या रखवालदाराला त्याने व्हॅनवर लक्ष ठेवण्यासाठी तीन हजार रुपयेही दिले.
पैशांच्या या पेट्या घेऊन जाण्यासाठी प्रदीप कुमारने एक टेंपोही भाड्याने घेतला होता. पण त्याच्या दुर्दैवाने त्या रात्री त्याला टेंपोची वर्दी मिळाली नाही. हा टेंपो दुसऱ्या दिवशी येणार होता. हे सगळे पैसे घेऊन आपल्या बायको मुलासह पळून जाण्याचा प्रदीप कुमारचा प्लॅन होता. पण त्याच्या आतच तो पकडला गेला.
पुढच्या चौकशीत ज्या सिक्युरिटी एजन्सीकडे रोख रक्कम वाहून नेण्याचे काम दिले होते, त्या कंपनीकडून कामात मोठी कसूर झाल्याचे स्पष्ट झाले. या सिक्युरिटी एजन्सीला एका वेळी केवळ पाच कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र, या व्हॅनमध्ये तब्बल २२ कोटी ५० लाख रुपयांच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या.
या सगळ्या प्रकारात दिल्ली पोलिसांकडूनही मोठी चूक झाली होती. सप्टेंबर महिन्यात प्रदीप कुमार शुक्लाच्या पोलिस व्हेरिफिकेशनसाठी सुरक्षा एजन्सीने पोलिसांना अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांचे त्या कडे दुर्लक्ष झाले होते. प्रदीप कुमारच्या नावावर पूर्वीचे गुन्हे असल्याचेही पुढील तपासात स्पष्ट झाले.
या साऱ्या प्रकारात एका रात्रीचा करोडपती प्रदीप कुमार शुक्ला केवळ बारा तासात सापडल्याने बँकेची आणि दिल्ली पोलिसांची अब्रू मात्र वाचली एवढं खरं. दुसऱ्या बाजूला अत्यंत कमी वेळात या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे नाव लिम्का बूक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डसमध्ये गेले ही दिल्ली पोलिसांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू ठरली.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”