सोन्यात गुंतवणूक करावी काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्यात गुंतवणूक करावी काय?}

सोने हा भारतीयांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. घरात सोन्याचा दागिना नाही, असे मध्यमवर्गीय कुटुंब मिळणे तसे अवघडच! अलीकडे दागिन्यांबरोबरच निव्वळ गुंतवणुकीसाठीही सोन्याचा विचार केला जात आहे. अशी खरेदी खरेच फायदेशीर ठरते का?...

सोन्यात गुंतवणूक करावी काय?

भारतीयांना सोन्याचे आकर्षण शेकडो वर्षांपासून आहे. पूर्वी पैशांची गुंतवणूक करण्याचे ते एक मुख्य साधन होते. आता गुंतवणुकीसाठी इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही साधने सोन्यापेक्षा अधिक परतावा मिळवून देऊ शकतात. तरीही लोकजीवनातील सोन्याच्या अढळ स्थानाला धक्का लागलेला नाही.

आठशे टनांची उलाढाल

देशात दर वर्षी आठशे टनांपेक्षा जास्त सोन्याची उलाढाल होते. त्यांपैकी सुमारे सत्तर टक्के सोने दागिन्यांसाठी वापरले जाते. उर्वरित सोने हे नाणी वा डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून खरेदी केले जाते. या ग्राहकांत केवळ गुंतवणुकीच्या हेतूने व्यवहार करणारेही असंख्य आहेत. या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या शेअर बाजार, बँका, टपाल खाते, सरकारी योजना, स्थावर मालमत्ता यांसह अनेक पर्याय उपलब्ध असताना सोन्यात पैसे गुंतवावेत का... ही गुंतवणूक लाभदायक ठऱेल काय आणि याचे उत्तर होकारार्थी असेल तर एकूण गुंतवणुकीत सोन्याचा वाटा किती असावा?.

हेही वाचा: स्टार्टअप म्हणजे काय? कसे काम करते? कशी करावी सुरुवात?

गुंतवणुकीचे निकष

त्याकडे वळण्यापूर्वी आपण प्रथम गुंतवणुकीचे प्राथमिक निकष काय असले पाहिजेत, याचा विचार करूयात. सुरक्षितता, तरलता (लिक्विडिटी) आणि परतावा या तीन कसोट्यांवर आपला प्रत्येक निर्णय तपासून घेणे श्रेयस्कर असते. पहिला मुद्दा आहे सुरक्षिततेचा. म्हणजे आपण कोणत्याही साधनांत गुंतवणूक केली तरी ती कितपत सुरक्षित आहे, हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो.

दामदुपटीचे आमिष

सध्या सर्वसामान्य नागरिकांना अल्प काळात दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अगदी एका महिन्यात `पैशांचा पाऊस' पाडण्याची किमया घडवून आणण्याची `हमी' कोणी तरी देतो आणि तो हे कसे करणार आहे, याची कोणतीही खातरजमा न करता लोक आपले कष्टाचे पैसे त्याच्या हवाली करतात. काही वेळा लोकांत विश्वास निर्माण करण्यासाठी हा अविश्वसनीय वाटणारा परतावा सुरूवातीला दिलाही जातो. हे कसे शक्य होते? अगदी सोपे आहे. नवे सावज मिळाल्यावर त्याच्याकडून मिळालेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना द्यायचे, या पद्धतीने हा प्रकार चालतो. ही साखळी पुढे कुठे तरी तुटते आणि सगळ्यांची मुद्दल क्षणात गायब होते! आपली फसवणूक झाली आहे, हे नीट लक्षात येईपर्यंत दामदुपटीचे आमिष दाखविणारे जादूगार स्वतःच गायब झालेले असतात!

सुरक्षितता महत्त्वाची

सारांश, वरील उदाहरणात भरघोस परताव्याचे आश्वासन आहे. पण त्यात सुरक्षितता अजिबात नाही. आपण बाजारात प्रस्थापित, विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या पेढीतून सोने खरेदी करतो, तेव्हा त्यात फसवणुकीची जोखीम असते का?.. तर सहसा नाही. एकदा सोने विकत घेतल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वध-घटीनुसार त्याचे मूल्य बदलत राहते. तथापि, हा ऐवज आपल्याच ताब्यात राहत असल्याने गुंतवणूक सुरक्षितच असते. त्यामुळे सोने गुंतवणुकीच्या पहिल्या निकषावर उत्तीर्ण होते!

खरेदी-विक्रीतील सुलभता

दुसरा मुद्दा आहे तरलतेचा. म्हणजे या गुंतवणुकीतून बाहेर पडायचे असेल, तर ते लगेच शक्य होते का? आपल्याला पाहिजे तेव्हा सोन्याची विक्री करून पैसे मिळू शकतात का? या प्रश्नांचे उत्तर अर्थातच `होय' आहे. ही सोय खूप महत्त्वाची आहे. समजा एखाद्याची गुंतवणूक स्थावर मालमत्तेत आहे. त्याला ती विकायची असेल, तर `आज निर्णय घेतला आणि उद्या व्यवहार झाला,' असे सहसा होत नाही. त्या जागेला, वास्तूला योग्य ग्राहक मिळणे, त्याच्याकडून मालकाला अपेक्षित असलेली किंमत मिळणे हे तसे सोपे नसते. त्यासाठी अऩेक दिवसांपासून काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. थोडक्यात, ही गुंतवणूक सर्वसाधारणपणे सुरक्षित- चांगली असली, तरी तरलतेच्या कसोटीवर तिला मर्यादा आहेत. सोन्याच्या बाबतीत ही अडचण उद्भवत नाही. दागिने असोत वा नाणी, कोणत्याही पेढीवर त्याची विक्री हवी तेव्हा कधीही करता येते. खरेदी-विक्रीतील ही सहजता सोन्याच्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण आहे.

हेही वाचा: भारतात रस्त्यांचा शोध कधी लागला? कसा झाला त्यांचा विकास, जाणून घ्या

महागाईवर मात करण्याची क्षमता

कोणत्याही गुंतवणुकीचा मूळ उद्देश त्यातून चांगला परतावा मिळावा, हा असतो. त्या अनुषंगाने सोने कितपत उपयुक्त ठरते?.. सध्या बँकांतील मुदतठेवींवर जेमतेम सहा-सात टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळत आहे. किरकोळ महागाईचा दर साधारणपणे साडेपाच ते सहा टक्के आहे. ते पाहता बँकांतील ठेवींतून मिळणारे व्याज महागाईच्या भक्ष्यस्थानी पडते, असे म्हणावे लागेल. त्यामुळे त्या ठेवींचे मूल्य फार तर आहे तेवढेच राहात आहे. ते कमी होत नाही, एवढाच काय तो दिलासा. सोन्याचे वैशिष्ट्य म्हणजे महागाईवर मात करण्याचे ते एक उत्कृष्ट माध्यम मानले जाते. कारण दीर्घ कालावधीत त्यातून मिळणारा परतावा महागाईच्या दरापेक्षा बहुधा जास्त असतो. त्यामुळे सुरक्षितता, तरलता आणि परतावा या तिन्ही कसोट्यांवर सोन्याची झळाळी कायम राहते.

गुंतवणूक किती करावी?

गुंतवणूक या अंगाने सोन्याबद्दलचा ऊहापोह वर केला आहे. अडीनडीला उपयोगी पडणारे साधन म्हणून लोकांना त्याचा भरवसा वाटतो. आता प्रश्न येतो, की त्यात गुंतवणूक किती करावी? सोन्याची गुणवैशिष्ट्ये अनेक असली तरी त्यातून मोठा परतावा मिळेल, अशी अपेक्षा फार ठेवता येत नाही. कारण थोडी जोखीम घेतल्यास त्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देणारे अनेक पर्याय सध्या उपलब्ध झाले आहेत. त्यांपैकी काहींचा उल्लेख सुरूवातीला केला आहे. मात्र, गुंतवणुकीचा कोणताही पर्याय कितीही आकर्षक, सुरक्षित, लाभदायक वाटला तरी सर्व रक्कम त्यात (एकाच ठिकाणी) गुंतविणे कधीही श्रेयस्कर मानले जात नाही. ही बाब अर्थातच सोन्यालाही लागू पडते. आपल्या पोर्टफोलिओत सर्वसाधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत सुवर्णाला स्थान असावे, असा सल्ला दिला जातो. याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीची विविध साधनांत दहा लाख रुपयांची गुंतवणूक असेल, तर त्यातील एक लाख रुपये सोन्यात गुंतविणे योग्य ठरेल!

दागिने की चोख सोने?

ही सोनेखरेदी चोख सोन्यात म्हणजे नाणी, बिस्किटे यांस्वरूपात असेल, तर परतावा चांगला मिळण्याची शक्यता असते. मात्र, दागिन्यांच्या माध्यमातून सोन्याचा व्यवहार केल्यास त्यात घडणावळीचा खर्च वाढतो. शिवाय ते सोनेही 24 कॅरेटचे असत नाही. कारण दागिने तयार करण्यासाठी सोन्यात अन्य काही धातू मिसळणे आवश्यक ठरते. त्यामुळे दागिना मोडण्याची वेळ येते, तेव्हा त्यात विशिष्ट प्रमाणात `घट' धरली जाते आणि सुरूवातीला केलेला घडणावळीचा खर्चही वाया जातो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास, आपणास गुंतवणूक करायची आहे की हौसेसाठी दागिने घ्यायचे आहेत, याचा विचार नीट केला पाहिजे.

डिजिटल माध्यमही उपलब्ध

सोनेखरेदीच्या पारंपरिक पद्धतीत ग्राहकाला सोने स्वतःकडे बाळगावे लागते. त्यात त्याच्या सुरक्षिततेची जोखीम असते. ते चोरीला जाऊ नये, म्हणून अनेक जण बँकेतील लॉकरची सेवा घेतात. त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागते. ही जोखीम टाळण्यासाठी लोकांकडे आता गोल्ड ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड), गोल्ड म्युच्युअल फंड, सॉव्हरिन गोल्ड बाँड आदी पर्याय उपलब्ध झाले आहेत. या प्रकारांत सोन्याची खरेदी होते. पण ते धातू स्वरूपात आपणाकडे येत नाही. त्यामुळे सोने गहाळ होणे, चोरीला जाणे या शक्यताच राहात नाहीत. आपणास कोणत्या पद्धतीचा व्यवहार सुलभ वाटतो आहे, हे पाहून योग्य तो निर्णय घ्यावा. त्यासाठी शुभेच्छा!...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top