गृहकर्ज फेडावे, की गुंतवणूक करावी? | Financial Planning-Home Loan or Investment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Financial Planning-Home Loan or Investment}

गृहकर्ज फेडावे, की गुंतवणूक करावी?

घरखरेदीसाठी घेतलेले कर्ज लवकरात लवकर फिटावे, अशी अनेकांची इच्छा आणि प्रयत्न असतो. अशा वेळी बोनस किंवा अन्य मार्गाने हाताशी मोठी रक्कम आल्यावर, ते पैसे कर्जफेडीसाठी वापरावेत, की अन्यत्र गुंतवावेत, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्यांच्यासाठी..(Financial Planning-Home Loan or Investment)

छोटे का असेना, आपले स्वमालकीचे- हक्काचे एक घरकुल असावे, असे स्वप्न जवळपास प्रत्येकाचे असते. घर म्हणजे आयुष्यातील एक मोठी गुंतवणूक असते. आपली वर्षानुवर्षांची बचत गाठीशी असली, तरी केवळ त्या पुंजीतून ही खरेदी सहसा होत नाही. त्यासाठी बव्हंशी लोकांना गरज भासते ती गृहकर्जाची.

कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था

राष्ट्रीयीकृत वा सहकारी बँका, खासगी वित्तसंस्था, पतपेढ्या असे अनेक पर्याय त्यासाठी उपलब्ध असतात. सर्वसाधारणपणे राष्ट्रीयीकृत बँकांचा गृहकर्जावरील व्याजदर सर्वांत कमी असतो. त्यांचे कागदपत्रांविषयीचे निकष अगदी कडक असतात. त्यामुळे त्यांच्याकडील कर्जप्रकरणे मंजूर व्हायला अन्य वित्तसंस्थांच्या तुलनेत अधिक वेळ लागू शकतो. हे निकष अन्यत्र जेथे शिथिल असतात, त्या ठिकाणचा व्याजदर बहुधा जास्त असतो! अर्थात, कर्ज कोठून आणि कसे घ्यावे, हा या लेखाचा विषय नाही. विषय आहे- एकदा कर्ज घेतल्यावर ते पूर्ण मुदतीनंतर फेडावे की शक्य होईल तेवढे आधी?...

पैसे उभारताना कसरत

एकंदरीत अनुभव असा असतो, की घरखरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव करताना मध्यमवर्गीयांची खूप कसरत होते. साठवलेले पैसे, मित्र-आप्त यांच्याकडून पैशांची उसनवारी, दागिन्यांची मोड, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतून घेतलेली उचल... असे अनेक पर्याय त्यसाठी अजमावे लागतात. त्याला अखेरची जोड म्हणजे गृहकर्ज.

हेही वाचा: एक चहावाला कसा बनला फुटबॉलचा देव?

कर्जदारापुढील प्रश्‍न

हे कर्ज घेतल्यानंतर सुरूवातीचे काही महिने- वर्षे आर्थिक आघाडीवर पदोपदी परीक्षा घेणारे असतात. त्यातून यथावकाश तावून सुलाखून थोडे स्थिरावल्यावर स्थैर्य लाभायला लागते. मासिक पगार वाढलेला असतो. कोणाचा धंदा-व्यवसाय असेल तर त्यातून पैशांची आवक सुधारलेली असते. कधी बोनस वा अन्य माध्यमातून मोठी रक्कम हाती येते. अशा वेळी आपण त्यातील काही किंवा पूर्ण हिस्सा गृहकर्ज लवकर फेडण्यासाठी वापरावा का, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

कोणता पर्याय लाभाचा?

एक गोष्ट आधीच स्पष्ट केली पाहिजे, की या प्रश्‍नाचे सर्वमान्य असे कोणतेही ठोस असे उत्तर नाही! यासंदर्भात सुचविला जाणारा कोणताही पर्याय व्यक्तिनिहाय वेगवेगळा असू शकतो. कारण गृहकर्ज लवकर मार्गी लावले काय किंवा ठरलेल्या मुदतीनुसार परतफेड केली काय, या दोहोंचेही काही ‘फायदे-तोटे’ आहेत. ते जाणून घेऊन, त्यांतील कोणता विकल्प आपल्यासाठी योग्य ठरू शकेल, याचा निर्णय कर्जदाराने घेतला पाहिजे. त्यासंदर्भात सर्वस्वी सल्लागारावर अवलंबून राहून चालणार नाही.

मुदतपूर्व परतफेड केव्हा करावी?

कोणत्याही कर्जाची परतफेड मुदतपूर्व करायची असेल, तर सुरूवातीच्या काळातच हप्त्याखेरीजचे (ईएमआय) अतिरिक्त पैसे कर्जखात्यात जमा करीत राहणे अधिक फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, एखादे कर्ज वीस वर्षे मुदतीचे असेल, तर शेवटच्या पाच-दहा वर्षांत ‘प्री-पेमेंट’ केल्यावर व्याजाचे जेवढे पैसे वाचतील, त्यापेक्षा अधिक पैशांची बचत पहिल्या पाच वर्षांत केलेल्या परतफेडीमुळे होईल. म्हणजे ‘प्री-पेमेंट’ची रक्कम एकसारखी असली, तरी ती आपण केव्हा जमा करणार, यावर खूप काही अवलंबून असते.

हेही वाचा: ब्यूटी विथ ब्रेन : मॉडेल पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी

व्याजावरील रक्कम वाचविण्यासाठी..

गृहकर्जाच्या हप्त्यात मुद्दल आणि व्याज यांचा समावेश असतो. हा हप्ता सुरू होतो, तेव्हा प्रारंभीच्या काळात हप्प्यातील मोठा वाटा व्याजापोटी जातो. त्यामुळे मुद्दलाची परतफेड अगदी संथ गतीने होत असते. या टप्प्यात ‘प्री- पेमेंट’ सुरू केल्यास मुद्दलाची म्हणजे कर्जाची रक्कम लवकर कमी होण्यास मदत होते. त्यातून अर्थातच व्याजाचा बोजा तेवढ्या प्रमाणात कमी होतो. हा लाभ शेवटच्या टप्प्यात केलेल्या प्री-पेमेंटमधून तेवढा मिळत नाही. कारण त्यावेळी होणाऱ्या परतफेडीत मुद्दल जास्त आणि व्याजाची रक्कम कमी, अशी परिस्थिती असते.

गुंतवणूक की कर्जाची परतफेड?

हा झाला मुदतपूर्व कर्जफेडीचा मुद्दा; पण शिलकी पैसे कर्जफेडीसाठी न वापरता त्याची गुंतवणूक योग्य ठिकाणी केली, तर ते अधिक फायदेशीर ठरेल काय, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो. सध्या शेअर बाजारात तेजी आहे. त्यामुळे ही रक्कम तेथे वापरून चांगली कमाई करावी, असे काहींना वाटते. गृहकर्जाचा प्रतिवर्ष व्याजदर बव्हंशी बँकांत सात टक्क्यांच्या आसपास आहे. थेट कंपन्यांच्या शेअरमध्ये किंवा कामगिरीत सातत्य असलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजनांत अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास, यापेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे आपल्या गाठीशी असलेले जास्तीचे पैसे शेअरमध्ये गुंतवावेत आणि त्यातून मिळणाऱ्या लाभातून कर्जफेड करावी, असाही विचार करणारा एक वर्ग आहे. अनेकांनी हा पर्याय अमलातही आणला आहे. मात्र, तो सरसकट सर्वांना उपयोगी पडेल काय याची शाश्‍वती नाही. कारण शेअर बाजारात आगामी काळात तेजी राहील की मंदी, याचे भाकीत तज्ज्ञही करू शकत नाहीत. त्यामुळे अल्प काळासाठी (शॉर्ट टर्मकरिता) केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल किंवा नाही, मिळाल्यास किती याचा कसलाही अंदाज बांधता येत नाही. थोडक्यात, हा मार्ग जसा बरकतीचा आहे, तसाच तो जोखमीचाही आहे.

प्राप्तिकरात सवलत

कर्ज मुदतीआधीच ‘निल’ करण्याजोगी आर्थिक स्थिती असली, तरी हे कर्ज असलेलेच बरे, या मतावर विश्‍वास असलेली मंडळीही भरपूर आहेत. त्यामागील एक मुख्य कारण म्हणजे या कर्जाची परतफेड सुरू असताना दर वर्षी प्राप्तिकरात मिळणारी सवलत. बव्हंशी नोकरदार मध्यमवर्गीयांना ही तरतूद दुहेरी लाभाची वाटते. म्हणजे एका बाजूला स्वतःच्या मालकीचे घर होते आणि दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत राहून करही कमी भरावा लागतो!

सरासरी आठ वर्षांत कर्जफेड

कर्जाची परतफेड मुदतीआधी करण्यात हशील नाही, असे मानणाऱ्या समविचारी मंडळींची संख्या लक्षणीय आहे. मात्र, यासंदर्भातील एका आकडेवारीनुसार लोक गृहकर्ज घेताना भले वीस वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त मुदतीसाठी अर्ज करीत असले, तरी प्रत्यक्षात कर्जफेडीचा सरासरी कालावधी त्यापेक्षा खूपच कमी- आठ वर्षांचा आहे! याचा अर्थ आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार लवकरात लवकर उतरावा, असा प्रयत्न संबंधितांकडून अधिक होत असतो.

भावनिक सुरक्षितता महत्त्वाची

लोकांची आर्थिक स्थिती कशी आहे, त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे उपलब्ध आहेत काय, या मुद्द्यांबरोबर कर्जफेडीबाबत लोकांची मानसिकता तेवढीच महत्त्वाची असते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर किंवा शक्य तेवढ्या लवकर कर्ज फेडून निश्‍चिंत व्हावे, कोणताही आर्थिक ताण नसावा, अशी मानसिकता अनेकांची असते. त्यामुळे पैसा हाती येईल तसा कर्जखात्यात जमा करीत राहण्याकडे त्यांचा कल असतो. आर्थिक फायद्या-तोट्यापेक्षा त्यांना ही भावनिक सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची वाटते.

इमर्जन्सी फंड गरजेचा

मुदतीआधीच सगळे कर्ज चुकते करायचे असेल, तर त्याचेही नियोजन नीट केले पाहिजे. हाती पैसे आले की ते सगळे कर्जखात्यात जमा केले, असे सरधोपट धोरण योग्य नाही. स्वतःची आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी काही अनपेक्षित गोष्टींनाही सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दीड वर्षात अनेकांना नोकऱ्या अचानक गमवाव्या लागल्या. त्यामुळे नियमित उत्पन्नाचा खात्रीशीर स्रोतच नाहीसा झाला. कधी घरात गंभीर आजारपण उद्‍भवते, त्याचा सामना करताना मोठा खर्च होतो. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास दुःखाचा आणि आर्थिक संकटांचा डोंगर कोसळतो.. अशा अकल्पित घटनांना तोंड देण्याकरिता कुटुंबाकडे राखीव निधी (इमर्जन्सी फंड) असला पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक तेवढी तरतूद करून मगच मुदतपूर्व कर्जफेडीकडे वळणे योग्य ठरेल.

पर्सनल लोन टाळा

वैयक्तिक कर्जापेक्षा (पर्सनल लोनपेक्षा) गृहकर्जाचा व्याजदर कमी असतो. त्यामुळे पर्यटन किंवा मोटारीसारख्या महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज घेण्याचा विचार असेल, तर कमी व्याजदराचे गृहकर्ज आधी फेडून इतर बाबींसाठी चढ्या व्याजदराचे वैयक्तिक कर्ज घेणे, आर्थिक शहाणपणाचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत गृहकर्ज मुदतपूर्व फेडण्याऐवजी ते पैसे इतर उद्दिष्टांसाठी वापरणे अधिक व्यवहार्य ठरेल.

प्री-पेमेंटचे नियम

कर्जाचे प्री-पेमेंट करताना काही बँका त्यासाठी शुल्कही आकारू शकतात. ‘फ्लोटिंग’ व्याजदर असेल तर ही आकारणी सर्वसाधारणपणे होत नाही. मात्र, कर्जदाराला वर्षभरात अशा प्रकारे किती वेळा पैसे जमा करता येतील, हे बँका ठरवू शकतात. अनेक वित्तसंस्था कर्ज दिल्यानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत प्री-पेमेंट स्वीकारत नाहीत.

सुखकर आर्थिक प्रवासासाठी

कर्जासाठी बँक किंवा इतर वित्तसंस्था निवडताना, त्यांचे यासंबंधीचे नियम काय आहेत, हे नीट समजावून घेतले पाहिजे. एकदा कर्ज घेतल्यावर त्यांचे विशिष्ट नियम गैरसोईचे वाटू लागले, तर त्यांपासून सुटका करून घेणे सहजसोपे नसते. कारण हे कर्ज प्रदीर्घ काळासाठीचे असते. त्यामुळे कर्ज घेताना घाई न करता चार ठिकाणी चौकशी करून, आवश्‍यक तेथे जाणकारांचा, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत. म्हणजे नवीन घरातील निवास आणि कर्जफेडीचा प्रवास दोन्ही सुखकर होतील!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top