rishi sunak Indian contender for the PM post in Britain
rishi sunak Indian contender for the PM post in Britain

ऋषी सुनक : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा भारतीय दावेदार

कोरोना संसर्गाच्या लाटेने अनेक बड्या नेत्यांची परीक्षा पाहिली आहे. या लाटेच्या धडकांनी अनेकांना घरीही बसवले आहे. संसर्ग रोखण्याबरोबरच अर्थव्यवस्था अडचणीत येऊ न देण्याची कसरत अनेकांना करावी लागली आणि त्यात कितीतरी अपयशी ठरले. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान झालेले बोरिस जॉन्सन यांना कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा सामना करावा लागला. यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. जगात सर्वात प्रथम लसीकरण ब्रिटनमध्ये सुरू झाले, संसर्ग येथेच लवकर आटोक्यात आला. युरोपच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाणही ब्रिटनमध्येच चांगले होते. पण लाटेत नाव उलटायला वेळ लागत नाही. ब्रिटनमध्ये संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून अशा परिस्थितीत जॉन्सन यांनी स्वतःच्या सरकारने केलेल्या कोरोना नियमांचा भंग करत एका पार्टीमध्ये हजेरी लावली. यावरून त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांच्या काँझर्व्हेटिव्ह पक्षातून होत आहे.


अशा घटना कोणत्याही देशात घडत असल्या तरी ब्रिटनमध्ये घडणाऱ्या या घडामोडींमध्ये भारतीयांनी रस घेण्यामागे एक कारण आहे. जॉन्सन यांना खरोखरच राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या जागी भारतीय वंशाचे नेते, देशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांचे नाव चर्चेत आहे. जॉन्सन यांचे समर्थक असलेल्या सुनक यांना पक्षातून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
ऋषी सुनक हे मूळ भारतीय असले तरी त्यांच्या आजोबांनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा भारताशी थेट संबंध आला नव्हता. त्यांच्या वडिलांचा जन्म केनिया, तर आईचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. नंतर हे कुटुंब 1960 च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील हे ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये जनरल प्रॅक्टिशनर होते, तर आईचे औषधांचे दुकान होते. भारतीयांना त्यांची ओळख झाली ती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई झाले तेव्हा. नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता हिच्याशी त्यांचा विवाह झाला, तेव्हा भारतीयांना परिचयाचे झालेले ऋषी सुनक हे नाव नंतर, 2019 मध्ये ते देशाचे अर्थमंत्री झाले, तेव्हा अधिक ठळकपणे लक्षात राहीले. आता थेट पंतप्रधान पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com