मालिका निर्मात्यांची डोकी तपासा! Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 How TV shows try to keep the audience hooked }
S+ मालिका निर्मात्यांची डोकी तपासा!

मालिका निर्मात्यांची डोकी तपासा!

दूरचित्रवाणी नवा नवा होता तेव्हा किती ते त्याचं अप्रुप. ज्यांच्या घरी होता त्यांचा मोठा रूबाब. नंतर हळूहळू तो घराघरात पोहोचला आणि लोकांच्या मानगुटीवरच बसला. असंख्य घरात सकाळी उठल्यापासून उत्तररात्रीपर्यंत तो कोकाटत असतो. वास्तविक प्रबोधनाबरोबरच मनोरंजन आणि विरंगुळा असं हे माध्यम. मात्र, अलिकडच्या काही काळात ते इतकं भरकटलं आहे की, मालिकांचा रतिब घालणाऱ्यांची डोकी एकदा सामुहिक तपासायला हवीत, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागल्या आहेत.

''मालिकांचे विषय, संवादलेखन, अभिनय, प्रकाशयोजना, कपडेपट, रंगभूषा...आणि दिग्दर्शन या काही प्राथमिक टप्प्यावरील बौध्दिक दिवाळखोरीचा जरी विचार केला, तरी यामधील प्रत्येकाला चिरडून मारलं पाहिजे, अशी भावना होते ओ...''असे एक गृहस्थ कळवळून मला सांगत होते. काहीतरी कामाचे निमित्त काढून ते मला भेटायला कार्यालयात आले होते आणि दूरचित्रवाणी व त्यावरील मालिका याच विषयावर बोलत राहिले. "घरात सगळेजण आपापल्या कामात, मोबाईलमध्ये व्यस्त आणि मी एकटाच रिकामा. कारण मी निवृत्त! मग बसतो दूरचित्रवाणी लावून. सुरूवातीच्या काळात म्हणजे नवा नवा आला तेव्हा तो बरा होता. मर्यादित वेळ, सहकुटुंब सहपरिवार पाहण्यायोग्य कार्यक्रम असायचे, पण आता? प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंतच बघतात हो कार्यक्रम निर्माते!" या गृहस्थांचा मालिकांवरील अभ्यास चांगलाच झालेला होता. कोणती मालिका कोणत्या वेळी लागते, पात्रांची नावे सगळे सगळे तोंडपाठ! प्रत्येक मालिकेविषयी सांगताना त्यांचा चेहरा अधिकाधिक त्रासिक होत होता. घरात बसून होणारी घुसमट लक्षात येत होती. ( How TV shows try to keep the audience hooked)

यावर काहीतरी लिहायला हवं वाटलं, म्हणून मग विविध वयोगटातील लोकांशी गेले काही महिने बोलत राहिलो. आणि लक्षात आले की, ''जो त्रास ज्या सेवानिवृत्त वृध्द नागरिकाला होतोय तशीच स्थिती सर्वांची आहे. साऱ्यांचं एकच म्हणणं-आमच्या डोक्यावर का लादतात असले कार्यक्रम. आम्हा प्रेक्षकांना काय हवं काय नको त्याचा कधीतरी विचार का करत नाहीत. मलाही ते पटले.''

हेही वाचा: बिबट्या आला शेजारी

1. कौटुंबिक मालिका

सध्याच्या जगरहाटीत केवळ चौकोनी कुटूंबे उरलेली आहेत. तरीही मालिकेत मात्र पाच-पाच भाऊ, त्यांच्या पाच-पाच बायका, प्रत्येकाची दोन-दोन पोरं यात भर पुन्हा आजी-आजोबांची! आणखी भर असते एखादी अविवाहिता, एखादी घटस्फोटीता, दोन मोलकरीण! पुन्हा या साऱ्यांचे एकमेकाशी पटत नाही. तरीही एकत्र नांदतात. कोणीही पुरूष कामावर जात नाही, बायकांना भांडण्याशिवाय काम नाही. दररोज कुटील कारस्थानं रचत बसणे एवढाच साऱ्यांचा धंदा. तरीही महालाएवढ्या घरात राहतात एकत्र नांदतात.

घराचा हॉल सभागृहाएवढा. उंबऱ्यापासून जिन्याच्या पायरीपर्यंत सगळीकडे लाल गालिचे, शुभ्र रंगातील चार-पाच सोफासेट, दारा-खिडक्यांना झुळझुळणारे मलमली पडदे, टीपॉयवर जगातील सर्व फळांची करंडी. महिला-पुरूष 24 तास उंची कपड्यात. महिला दागिण्यांनी मढलेल्या, पुरूषांचे ओठ लिपस्टिकने रंगलेले आणि ज्यांना आजी-आजोबा बनविलेले असते त्यांचे सगळे केस पांढरे नसतात, एखादीच बट असते. हे लोक झोपतात कधी, उठतात कधी हे दाखवतच नाहीत.

यांची मोलकरीण तर महाराणी शोभावी अशा थाटाची अतिशय देखणी असते. काम करून करून तिचा पिट्टा पडत असेल; पण ती कधी घामेजलेली दिसतच नाही. (आणि आमच्या घरी एक फुलपात्र जरी जास्त असेल, तर आमची भांडीवाली मावशी इतर भांड्यांवर राग काढते.)

मग यातून अनेक प्रश्नांचा भुंगा डोक्यात भुणभुण करतो. 1. बायका कजाग आणि पुरूष नेभळट असूनही यांचा संसार चालतोच कसा? 2. वीज-पाणी-मिळकत कर यांची बिले, घरसामान भरते कोण? 3. कपडे धोब्याकडे जातात की धोबीच घरी येतो? 3. घर चालविण्यासाठी पैसा आणून ओततो कोण? 4. मुलांचा अभ्यास कोण घेतो? 5. गाड्यांमध्ये पेट्रोल भरते कोण? 6. यांना शेजारी-पाजारी असतात की नसतात?...असे प्रश्न अनुत्तरीच राहतात. कुटुंबातील सर्वजण एकमेकाच्या चांगल्या ओळखीचे असूनही प्रत्येकवेळी बोलताना वाक्याची सुरूवात संबधीताच्या नावानेच का बरे करत असावीत?...एकूणच हा सगळा हास्यास्पद कारभार असतो.

2. रडारडी, कजागता

पूर्वीच्या चित्रपटात सासू, सून, जाऊ, दीर किंवा सासूचा लांबचा भाऊ अशापैकी एक पात्र खलनायक किंवा खाष्ट म्हणून समोर यायचे. मग नुसता छळ, कारस्थाने, अपमान! बिचारी सोशिक नायिका रडरड रडायची. काहीवेळाने ती उपासमारीने पडायची. तिला लागायचं. तिचे हाल बघवायचे नाहीत. ते इतकं खरंखुरं वाटायचं की चित्रपटगृहातील प्रेक्षक हळहळायचा, शिव्याशाप द्यायचा. हीच पोचपावती कलाकार समजायचे...आणि आताच्या मालिकेत. किळस येते. एवढ्या सुंदर घरात दाखवला जाणारा छळ अतार्किक दिसतो. सगळ्या खलनायिका म्हणजे भयपटातील पात्रासारख्या. ढालगज. कोपरापर्यंत बांगड्या, लांबलचक दागिणे, हातावर किंवा मनगटावर किंवा दंडावर विचित्रपणे गोंदण. डोळ्यांची विचित्र हालचाल, बोलण्यातील जरब दाखविण्यासाठी काहीतरीच हावभाव केले जातात.

हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

3. भिक्कार संवाद आणि भाषा

एकमेकाशी बोलताना सारखे दुसऱ्याचे नाव घेतले जाते. उदाहरणार्थ-''अरे अमन तुला एक सांगू का. हं कामिनी बोल ना. अमन, तू संध्याकाळी घरी लवकर येशील का. हो कामिनी येतो. का गं आज काही विशेष कार्यक्रम आहे का. नाही रे अमन...'' कोण लिहित असतील असे संवाद? 21 मिनिटांच्या भागात मोजून 31 वाक्ये, मात्र अमन व कामिनी ही नावे तीनशे वेळा. उगीचच ताणायचं म्हणजे किती ताणायचं याला काही मर्यादा आहे की नाही. बरं हा लेखकाला आपण राहतो तेवढाच परिसर माहितीचा, तरीही पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागातील भाषेत लिहितो. त्याहून भिक्कार म्हणजे कलाकार. दर बारा मैलावर बोलीभाषा बदलते, मात्र कलाकार उगीचच कोल्हापुरी भाषा बोलायची म्हणून गावठी बोलत राहतो. अरे लोकं वेड्यात काढतात रे.

4. तंत्राच्या बाबतीत अजूनही मागासलेपणा

कॅमेरा, प्रकाश योजना यामध्ये सगळ्या मालिका मागास आहेत. पहाटेचं धुकं दाखविण्यासाठी अजूनही धूर करतात. स्वयंपाक करताना चुलीचा धूर दाखवताना तो इतका असतो की, एखाद्या साखर कारखान्याचे धुराडे पेटले की काय इतपत शंका यावी. कॅमेऱ्याचा अँगल कसा असावा, तो कसा फिरवावा, त्याची गती किती असावी याचे काही तारतम्यच नाही. प्रकाश योजना अतिशय वाईट असते. रात्रीच्या दृश्यातही दिवसासारखा प्रकाश. हॉलमध्ये सर्वजण बोलत बसले असतील तर पात्रांचे कपडे, पडदे सगळे एकसारखेच आणि त्यांच्यावर फेकलेला प्रकाशही सारखाच. निळ्या रंगावर अधिक प्रेम दिसते. तंत्रज्ञान कधी बदलणार?

5. सगळेकाही सेम टू सेम

मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबावर आधारित मालिका घ्या, धार्मिक मालिका घ्या, चरित्र मालिका सगळे सेम टू सेम. यापेक्षा गावाकडील पारावरची नाटके बरी. त्यात संवादात उत्स्फूर्तता, अभिनयात जिवंतपणा असते. कपडे फाटके साधे असतात....एकुणच आपलेपणा वाटतो. या मालिका मात्र बेगडी असून मनाला भिडत नाही. कथेपासून दिग्दर्शनापर्यंत सगळी बोंबाबोंब!

हेही वाचा: Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

6. गीत गायन स्पर्धा

या प्रकारच्या मालिकांमध्येही स्पर्धक, परिक्षक अभिनय करतात. परिक्षक वस्सकन अंगावर येतात- स्पर्धक रडतात, परिक्षक कौतूक करतात-स्पर्धक दंडवत घालतात, स्पर्धक चुकतात-परिक्षक गातात, परिक्षक विनोद करतात-स्टुडिओतील प्रेक्षक आडवे पडेपर्यंत हसतात...सगळा अभिनय रे अभिनय! येथेही कपडेपट उधळलेला असतो. सणाप्रमाणे कपडे-गाणी! यात तीन परिक्षक असतात. एक दोन गाणी हिट झालेला एकजण पुरुष, दुसरी बाई अनोळखी, तिसरा संगीत क्षेत्रातून निवृत्ती पत्करलेला. ते एकमेकांना टाळ्या देतात, वाहव्वा करतात आणि दररोजच्या समारोपावेळी स्वत:चं गाणं म्हणतात. बिचारे स्पर्धक टाळ्या वाजवत राहतात-आपल्यावर खप्पा मर्जी होवू नये म्हणून!

कार्यक्रम गाण्यांचा की 'फॅशन शो'चा समजत नाही. महिला परिक्षकाचे अपुरे तंग कपडे, भडक मेकअप, हायहिल्स पाहूनच निम्मे स्पर्धक आपोआप आऊट होत असतील. इथे बाल स्पर्धकांना परिक्षक खांद्यावर घेवून नाचतात, त्यांना पप्या देतात...मला सांगा यात गाणं आणि सूर दिसतात का हो? फक्त टाळ्या वाजतात आणि त्याही सूत्रसंचालिकेने सांगितल्यावर. गाणं संपल्यावर भीक मागिल्यासारखे मत मागण्यास स्पर्धकांना सांगितले जाते. अरे काय चालले आहे काय?

7. क्राईम

गुन्हेगारी विषयक मालिकेत पोलिस शिपायापासून अधिकारी खात्यातील वाटतच नाही. एकाचा हेअर कट पोलिसी नसतो, सतत एकमेकाला सर सर म्हणतात, कसलाही रिपोर्ट आला की, आधी शिपाई वाचतो आणि ऐकणारा अधिकारी एकदम अचंबित होवून ओरडतो, क्क्याय! कोणत्या पोलिस ठाण्यात असे दृश्य दिसते? आणि गंमत म्हणजे सपेन्सच्या नावाखाली उगीच लांबच्या लांब भरकटवले जाते. पण खरं म्हणजे पहिल्या दहा मिनिटात प्रेक्षकांनी खरा गुन्हेगार कोण? हे ओळखलेले असते!

8. विनोदी

विनोदी मालिकेत हसू यावे म्हणून पुरूषांना साड्या नेसवल्या जातात, पांचट विनोद मारले जातात, मद्यप्राशन दाखवले जाते, शारिरिक व्यंगावर टिका टिपण्णी केली जाते...हे पाहताना कोणालाही हसू येत नाही. यामुळे आपलं हसं होवू नये म्हणून ध्वनीमुद्रित केलेला हास्याचा आवाज दर पंधरा सेकंदांनी वाजवला जातो. खरं म्हणजे हाच मोठा विनोद आहे.

एकूणच या मालिका डोक्‍याचा पार भुगा करून सोडतात. त्या दररोज बघायला पाहिजे असंही नाही. समजा दोन महिने तुम्ही परग्रहावर आहात आणि परत येवून मालिका लावली तरी काही बिघडत पडला नाही. कारण या मालिकांना असतो शेंडा ना बुडखा!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top