मध्यप्रदेशात मराठी भाषा जोपासली जातेय कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indore }
मध्यप्रदेशात मराठी भाषा जोपासली जातेय कारण...

मध्यप्रदेशात मराठी भाषा जोपासली जातेय कारण...

हिंदी भाषेचं अधिराज्य असलेल्या मध्यप्रदेश राज्याची औद्योगिक व आर्थिक राजधानी म्हणून इंदूर शहर ओळखले जाते. शालेय जीवनापासून या शहराविषयी ऐकून होतो. पण, तिथे जाण्याचा योग पत्रकारीतेच्या निमित्ताने जानेवारी २०२२ मध्ये आला. कारण, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सलग पाच वर्षांपासून इंदूर शहर देशात प्रथम क्रमांक पटकावत आहे. पाच वर्षांपूर्वी जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य असलेल्या इंदूरने काय जादू केली की, स्वच्छतेत देशभर त्याचे गुणगान गायले जात आहे. इंदूर महापालिकेने राबविलेले प्रयोग आपल्या पिंपरी चिंचवड शहरातही राबवू, असा संकल्प सोडत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काही पत्रकारांना इंदूरला पाठवले होते. त्यानिमित्ताने इंदूरला जाण्याचा योग आला.

हेही वाचा: ‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ : जाणून घेऊयात गुणकारी अद्रकाचे फायदे

तेथील अधिकाऱ्यांशी बोलताना, नागरिकांशी संवाद साधताना माय मराठीचे महत्त्व कळले. कारण, इंदूरमध्ये सर्व हिंदी भाषिक आहेत, असे समजून आम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलत होतो, पण, आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड येथील असल्याचे कळल्यावर ते मराठीत बोलत होते. अधिक माहिती घेतल्यावर कळले की त्यांचे घराने मूळचे मराठी आहेत. पण, पेशवाई, मराठेशाहीच्या काळात उत्तरेकडे राज्य विस्तारासाठी निघालेले मराठी सरदार, मावळे इंदूरमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात तीन-साडेतीनशे वर्षांपासून मायमराठीचे जतन त्यांनी केले आहे. करत आहेत. घरांसह सार्वजनिक जीवनातही ते मराठी भाषेचा वापर करत आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य सभा नावाची संस्था इथे कार्यरत असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्या संस्थेशी संबंधित व्यक्तीकडून इंदूर येथील मराठी साहित्यिका शोभा तेलंग आणि प्रफुल्ल कस्तुरे अर्थात कस्तुरे मामा यांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. संस्थेचा पत्ता घेऊन मी तिथे येत असल्याचे सांगितले. त्यांना खूप आनंद झाला. सायंकाळी सातच्या सुमारास संस्थेच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांचे प्रशस्त ग्रंथालय बघितले. आणि मायमराठीचे महत्व कळले.

हेही वाचा: तुम्ही एकटे नाही, एक काम केलं तर! वाचून सांगा पटतंय का?

इंदूर सारख्या हिंदी भाषिक पट्ट्यातील शहरात मायमराठीचा ठसा आजही टिकून आहे. तेथील साहित्यिकांनी, मराठी माणसांनी, मराठी प्रेमींनी टिकवून ठेवला आहे. 'समस्त भारतीय भाषा भगिनींशी सामंजस्य राखून बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषा, शिक्षण, साहित्य व संस्कृतीची निष्ठापूर्वक जोपासना व संवर्धन करणे व मराठी अस्मिता टिकवून ठेवणे,' हे महाराष्ट्र साहित्य सभेचे उद्दिष्ट आहे. 'मराठी असे आमुची मायबोली, वृथा ही बढाई सुकार्याविणे,' हे संस्थेचे ब्रीद आहे. इंदूर मधल्या महात्मा गांधी मार्गावर संस्थेचे कार्यालय आहे. १८ सप्टेंबर १९१५ रोजी संस्थेची स्थापना झाली आहे. दिवाण बहादुर गो. रा. खांडेकर आणि 'आनंद'कर्ते वा. गो. आपटे संस्थेचे संस्थापक आहेत. तेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि संस्थापक चिटणीस होते. संस्थेच्या प्रथम कार्यकारी मंडळात न्यायमूर्ती दा. वि. कीर्तने अध्यक्ष आणि इतिहास संशोधक प्रा. ल. बा. देव चिटणीस होते. मी संस्थेत गेलो तेव्हा, विद्यमान अध्यक्ष आश्विन खरे, सचिव प्रफुल्ल कस्तुरे, सदस्य अनिल दामले, अरविंद जवळेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक शोभा तेलंग यांची भेट झाली. त्यांच्या कडून संस्थेची माहिती मिळाली आणि मन भरून आले. मराठी भाषेसाठी खस्ता खाणारे त्यांचे प्रयत्न दिसून आले. या संस्थेने साठावा शारदात्सव साजरा केला. सध्या संस्थेची सदस्य संख्या २०३२ आहे. २५ हजारांहून अधिक ग्रंथ संपदा आहे. दुर्मिळातील दुर्मीळ ग्रंथ येथे उपलब्ध आहेत. सध्या कार्यकारणीत अनिल मोडक, अतुल बनवडीकर, भालचंद्र रेडगावकर, दीपाली सुदामे, हेमंत मुंगी, मनोज पेमगिरीकर, मदन बोबडे, नरेंद्र मुजुमदार, पंकज टोकेकर, सुरेश कुलकर्णी यांचाही समावेश आहे.

इंदूर येथील महाराष्ट्र साहित्य सभेबाबत अधिक माहिती घेतल्यावर मराठी भाषेच्या इंदूर प्रवासाबाबत इतिहास कळला. तो माधव साठे यांनी शब्दांकित केला आहे, त्यामध्ये नमूद माहितीनुसार, पुण्यश्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केला. मल्हारराव होळकर माळव्याचे सुभेदार झाले. त्यांनी इंदूरला राजधानी केली. त्यांच्या बरोबर मराठी भाषा व संस्कृतीचे पदार्पण झाले. विविध विषयांवर लीलया लेखणी चालविणारे शारदोपासकही इथे आले. या प्रदेशात इतिहासाला ज्ञात असलेली मराठी साहित्य निर्मितीची परंपरा सन् १८६१ पासूनची आहे. बाळकृष्ण मल्हार हंस, एकनाथशास्त्री करकंबकर प्रभृतींनी दर्जेदार लिखाण करून साहित्य निर्मितीचे बीज पेरले.

बीज अंकुरले-
साहित्य निर्मितीला अधिक चालना येण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असावे म्हणून येथील काही व्यक्तींनी प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश येऊन १८ सप्टेंबर १९१५ रोजी सभेचे बीज पेरले गेले. त्या बीजाचा आज प्रचंड वटवृक्ष झाला आहे. त्या वटवृक्षाच्या शाखांची माहिती अशी,
ग्रंथालय - संस्थेच्या स्थापनेनंतर अवघ्या चारच वर्षानी काही मोजकी पुस्तके गोळा केली. पाच फेब्रुवारी १९१९ रोजी ग्रंथालयाची स्थापना केली. निरनिराळ्या विषयांवरील पुस्तकें घरी नेऊन वाचण्याची सोय झाली. आजमितीस सभेच्या ग्रंथालयात २५ हजारांहून अधिक ग्रंथ आहेत. दर वर्षी यांत भर पडत आहे. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे दुर्मिळ ग्रंथ सभेने जतन करून ठेवले आहेत. त्याचा लाभ विद्यार्थी व अभ्यासक घेतात.
वाचनालय - वाचकवर्ग हा सुशिक्षित चाकरमान्यांचा वर्ग. त्यांना वर्तमानपत्रे व नियतकालिके विकत घेणे आर्थिक दृष्ट्या अडचणीचे. ही अडचण दूर व्हावी म्हणून सभेत वाचनालय आहे. त्यात उपलब्ध होणारी दैनिक, साप्ताहिके, मासिके व अन्य एकूण नियतकालिके ६० आहेत. वाचनालय निःशुल्क असून रोज सरासरी १०० वाचक वाचनालयाचा लाभ घेतात.
बालवाचनालय- मुलांना लहानपणापासून मराठी वाचनाची गोडी लागावी म्हणून बालवाचनालयाची स्थापना करण्यात आली. आज बालवाचनालयात सुसंस्कारक्षम अशी २ हजार ५०० पुस्तके आहेत. सभासदांना त्यांच्या पाल्यांसाठी बालोपयोगी पुस्तकें घरी घेऊन जाण्याची मुभा आहे. त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात नाही.
मध्यप्रदेशीय मराठी साहित्य संग्रह - इंदूर शहर हे मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात येते. या माळव्यात विशेषतः इंदूरला मराठी साहित्य निर्मितीची परंपरा खूप जुनी आहे. माळव्यातील साहित्याचा संग्रह सभेत आहे.

शारदोत्सव - सभेचा शारदोत्सव म्हणजे छोटेखानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच. प्रथम शारदोत्सव १९२८ मध्ये झाला होता.पण या उत्सवास आजचे स्वरूप प्राप्त झाले ते १९४७ मध्ये आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शारदोत्सवापासून. तेव्हा पासून तुरळक अपवाद सोडले तर, शारदोत्सवाची परंपरा अखंडित राहिलेली आहे. खांडेकर, फडके, विद्याधर गोखले, सेतुमाधवराव पगडी, म.म.द.वा. पोतदार, कुसुमावती देशपांडे, सुधीर रसाळ यांच्यासारखे कादंबरीकार, नाटककार, इतिहासतज्ज्ञ व समीक्षकांनी शारदोत्सवाचे अध्यक्षपद भूषविले आहे. ही यादी बरीच मोठी आहे. शारदोत्सवाच्या सोहळ्यात व्याख्यानमाला, कविसंमेलन, आणि तसेच निबंधलेखन, समस्यापूर्ति व कविता, प्रहसन या स्पर्धा आयोजित केल्या जातात. विविध क्षेत्रांतील नामवंतांचा व उगवत्या प्रतिभांचा सन्मान केला जातो. २००७ मध्ये सुवर्णमहोत्सवी शारदोत्सव प्रा. अरुण साधू यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला.
पारितोषिके व शिष्यवृत्ती- महाराष्ट्र साहित्य सभेला श्री वि. सी. सरवटे पुरस्कार उत्कृष्ट ललित साहित्य कलाकृतीस, कै. माधवराव यादवराव जोशी महाविद्यालयीन शिष्यवृत्ती, कै. सौ. विमलाबाई सहस्त्रबुद्धे शालेय शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

प्रकाशने : मराठी साहित्य समालोचन (४ खंड) ले. वि. सी. सरवटे, मध्यभारतीय मराठी वाङ्मय (१८६१ ते १९३५) कृ. गं. कवचाळे, माळव्यातील अर्वाचीन कवि (संकलन), सुमनहार (संकलन), मळवाट (संकलन),६० वर्षांची वाटचाल (साहित्य सभेचा इतिहास) ले. मा. स. रावेरकर, मुक्तिबोध एक अवधूत कवी, अनु. बाळ ऊर्ध्वरेषे.
अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनें - सभेची स्थापना होऊन जेमतेम एक वर्षही झाले नव्हते तोच अ. भा. मराठी साहित्य सम्मेलनाच्या १९व्या (१९१७) अधिवेशनाचे यजमानपद सभेला मिळाले. सम्मेलनाध्यक्ष होते, रावसाहेब गणेश जनार्दन आगाशे. त्या नंतर २०वे (१९३५) सम्मेलन औंध संस्थानाधिपती श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी व पुन्हा ७४वे संमेलन २००१ मध्ये विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली अशी तिन्ही सम्मेलने थाटात पार पडली.
आकाशवाणीवर मराठी - इंदूरला मराठी कलावंतांची वाण कधीच नव्हती. " पण येथील आकाशवाणीवर त्यांना वाव नव्हता. यासाठी आपल्या सभेच्या "शिष्टमंडळाने दिल्लीपर्यंत धाव घेतली. आकाशवाणीवर मराठी माणसांचा प्रचंड मोर्चा ११ मे १९७९ रोजी गेला. इतर प्रयत्नही भरपूर केले. शेवटी त्यांना यश येऊन २९ जून १९८० पासून दर रविवारी अर्धा तास मराठी कलावंतांसाठी राखून ठेवण्यात आला.

मराठी साहित्य अकादमी- ही स्वायत्त संस्था असून तिच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र साहित्य सभेचे योगदान मोठे आहे.
संगणकीकरण - ग्रंथालयात असलेल्या ३५ हजार पुस्तकांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. सभेचे हिशोबही संगणकावर करण्यास सुरुवात केली आहे.

साहित्य सभा भवन
सुरुवातीला सभेचे तीन मजली, भव्य व भक्कम भवन १९४३ साली बांधले गेले. पुढे १९६७ साली भवनाचा विस्तार करण्यात आला. त्या नंतर २००१ साली सगळ्या इमारतीचे झाले. विद्युतसोपान व नलकूप खनन इत्यादी सोयी करण्यात आल्या. साहित्य सभा भवन म्हणजे नित्य आणि नैमित्यिक होणाऱ्या वाङ्मयीन यज्ञांचा मंडपच! या शिवाय, भवनामुळे सभेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले.

आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
भवन निर्मितीमुळे सभेला आर्थिक स्थैर्य आले, याचा अर्थ एवढाच की नित्य चालणाऱ्या साहित्यिक गतिविधींना लागणाऱ्या खर्चाची सोय झाली. ग्रंथालयाचा कायाकल्प, मध्यप्रदेशीय मराठी साहित्य संग्रह अद्यावत करणे, मध्यप्रदेशीय मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे लेखन, मिनी थिएटरचे निर्माण व मराठी एकांकिकांच्या हस्तलिखितांचा संग्रह एवढीच उद्दिष्टे सभेने निश्चित केली आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top