'कोरोनाकाळ' मानवी जीवनावर आघात... many people | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Psychological support}

'कोरोनाकाळ' मानवी जीवनावर आघात...

एखादी मोठी दुर्घटना घडली की सामुहिक श्रद्धांजली वाहिली जाते, हे सर्वश्रूत आहे. मात्र, कोरोनाकाळात बळी पडलेल्या जीवांना भागवत कथेतून सामुदायिक श्राद्ध ही संकल्पना प्रथमच अनुभवली. भंडारदरा पर्वतरांगांच्या पायथ्यालगतच्या भैरवगडमध्ये असलेल्या ज्ञानेश आश्रमात अनेक कुटुंबातील मंडळींनी सामुदायिक श्राद्धाचा विधी केला. या अनोख्या विधीतून घरातील कुटुंबीयांना निश्चितच मानसिक आधार तर मिळालाच; पण जगण्याची उमेदही मिळाली. गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या सहवासात असलेल्या भैरवगड परिसरात नयनरम्य 'ज्ञानेश' आश्रमात जाण्याचा योग आला.अमरावतीपासून या भागात जाताना तशी रखरख. पण, जसजसा भैरवगड जवळ येऊ लागतो, तेव्हा हाच परिसर अतिशय सुंदर दिसू लागतो. 'ज्ञानेश ' आश्रमात पाऊल ठेवताच तिथे काही कार्यक्रम सुरू असल्याची चाहूल लागली. आत गेल्यावर लक्षात आले, की तेथे भागवत कथा सप्ताह सुरू होता.

हेही वाचा: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!

तेथील महंत ज्ञानेश्वर महाराज वाघ भागवत कथा सांगत होते. जगापासून अतिशय दूर असलेल्या भागात सुरू असलेल्या या कार्यक्रमाला बऱ्यापैकी भाविक कथा ऐकण्यासाठी उपस्थित होते.मीही जाऊन बसलो. महाराजांचे प्रभावी विवेचन मनाला भावले. जीवनात संस्कार नेमके काय बदल घडवून आणू शकतात, याचा परिपाठ ऐकायला मिळाला. कथा ऐकताना कसे दोन तास गेले हे कळालेच नाही. मात्र, कथेत बसल्यानंतर तेथे असलेली एक गोष्ट मला सारखी विचार करायला लावत होती. कथेच्या मंडपात शंभर एक लोकांचे फोटो लावले होते. तेथे त्यांच्यासमोर पूजा मांडली होती. त्या फोटोचे गूढ माझ्या मनाला अनेकदा कथेतून बाहेर आणत होते. विचार केला, हे स्वातंत्र्य सैनिक असावेत; पण नंतर वाटले, त्यात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही दिसत होते. त्यामुळे तसे नसावेत, त्यांतर वाटले हे सर्व या आश्रमाशी संबंधित लोक असावेत. डोक्यात अक्षरश: त्या विचारांचे काहूर माजले होते. महाराजांनी कथेचा शेवट घेतला. कार्यक्रमानंतर महाराजांशी संवाद होणार होता. त्यामुळे मला त्यांची ओळख करून घेण्याच्या बरोबरीने या फोटोंविषयी माहिती जाणून घेण्याची घाई झाली होती. शेवटी महाराजांचे दर्शन घेतले

एकमेकांची ओळख करून घेतली आणि लागलीच मंडपात पूजा केलेल्या फोटोबाबत मी महाराजांना प्रश्न केला. त्यांनी दिलेली माहिती ऐकून मला मानवता धर्म नेमका काय असतो, याची अनुभूती आली. महाराज म्हणाले, की कोरोना महामारीमध्ये या परिसरातील या व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्या काळात त्यांचे कोणतेही विधी झाले नाही. त्यामुळे या भागवत कथेत त्यांचा श्राद्धाचा कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्याचा विचार आला. तसे आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. भागवत कथा ही जीवनमुक्त करते. त्या माध्यमातून हे सारे जीव मुक्त व्हावेत, त्यांचे कार्य करण्याची संधी घरातील मंडळींना मिळावी, त्यांना मानसिक आधार यावा, यासाठी या कथेच्या माध्यमातून त्यांना जीवनमुक्त करण्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या माणसांप्रती असलेल्या श्रद्धाभाव जोपासण्याची संधी यातून उपलब्ध करून दिली. त्यावेळी मन भरून आले.

जन्म-मृत्यू ही गोष्ट तर कोणालाच चुकत नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो, त्या काळात दहा दिवस लोक येत जात असतात. भावकीतले लोक जेवण घेऊन येऊन घरात जेवतात. त्यामुळे घरातील मंडळींना उभारी मिळते. लहान मुलांना, त्या घरातील महिलांना त्यातून जगण्याची उभारी मिळते, या सर्व वातावरणामुळे आपण एकटे नाही, याबाबच विश्वास निर्माण होतो. या चालीरीती ग्रामीण भागात अजूनही सुरू आहेत. मात्र, शहरातून या गोष्टी हद्दपार होत चालल्या आहेत, हे योग्य नाही. त्यामुळे मानसिक आधार म्हणून का होईना, काही विधी त्या-त्या वेळी होणे गरजेचे आहे. समाज बदलत चालला म्हणजे वडिलांना बाबा किंवा पप्पा असेच म्हणतो ना. की मामा म्हणतो, ते जसे आहे, तसे दहावा, तेरावा हे विधी त्या-त्या वेळी त्या-त्या दिवशी व्हायला हवेत त्याला सामाजिक आधार आहे, हे वेगळेच तत्वज्ञान मला या आश्रमात अनुभवायला मिळाले.

हेही वाचा: गोरखपूर, योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचा विकास!

कोरोनाची महाभयंकर लाट अणि वेदनादायी आठवणी :

महामारी हा शब्द आपण फक्त ऐकून होतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून महामारी म्हणजे काय, हे साऱ्या जगाने अनुभवले. कोरोना नामक विषाणूने तब्बल दोन वर्ष जगावर राज्य केले. कोरोनाला रोखणे कोणालाच शक्य झाले नाही. त्यामध्ये लाखो जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. यामध्ये अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली. कोणतेही औषध नसल्याने उपचाराविना समोर घरातील माणसे गमावल्याने साऱ्या जगाने काही काळ मानसिक धीर सोडला होता. या काळात घरातील कुटुंबांतील माणसांपासून ते राष्ट्रांमधील व्यवहारापर्यंत सारे एकमेकांपासून दुरावले. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करावी लागली. घरातून बाहेर पडणे अवघड झाले. तब्बल एक ते दीड वर्ष घरातूनच सारे काही जीवन जगावे लागले. प्रत्येकाला आपला जीव संभाळणे इतकेच माहीत होते. या काळात आपले कोण आणि परके कोण याची जाणिवही अनेकांना झाली. मानवता या शब्दांची संकल्पना याच काळात खऱ्या अर्थाने अनेकांना उमगली.

या काळात घरातल्या माणसाच्या अंत्यविधीला जाता आले नाही, इतकी वाईट परिस्थिती जगाने अनुभवली. सर्व कार्यक्रमांवर, तसेच दैनंदिन व्यवहारावर, चालीरीतींवर कोरोनाने निर्बंधांरूपी जणू अंकुश ठेवला होता. लग्नकार्य थांबली, दहावे-तेरावे थांबले. कोणाला काय करावे, हेच त्या काळात उमगत नव्हते. आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचविणे हा एकमेव उद्देश प्रत्येकजण दीड वर्षांत जगला. केवळ संसर्ग झाला म्हणून क्वारंटाईन होण्यासाठी घरातून पायी चालत गेलेली माणसे काही दिवसात काळाच्या पडद्याआड गेली. त्याचा चेहराही घरातील माणसांना बघता आला नाही. इतकी भयंकर परिस्थिती या पिढीने अनुभवली. केवळ ज्येष्ठ नव्हे, तर तरुणांनाही कोरोनाने आपल्या कवेत कायमचे घेतले. त्यामुळे अनेक कुटुंबे आपला मानसिक आधार गमावून बसली. या काळात अत्यंविधी, सावडणे, दहावे, तेरावा-चौदावे हे सारे विधी कोणाचेही झाले नाही. त्याचे कारण कोरोनाने मृत्यू झाला की अंत्यविधी स्मशानभूमीतील माणसेच करीत होती. निर्बंधांमुळे कोणी कोणाकडे जाण्या-येण्याचा विषयच नव्हता. त्यामुळे दुःखही घरातल्या माणसांशिवाय कोणालाच व्यक्त करण्याशिवाय पर्याय नव्हता. फोनवरून सांत्वन करणे हा एकमेव मार्ग होता. मग तो कितीही जवळचा असो, हे सारे भयंकर वातावरण कधी संपेल, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. त्यामुळे सारी भयग्रस्त परिस्थिती सारे जग तब्बल दीड वर्ष जगले. सारे आध्यात्म आणि विज्ञानही या काळात हतबल झाले होते. मात्र, कोरोना संपल्यानंतर आध्यात्मातूनच हे सारे पुन्हा जागेवर येऊ लागले याचा आनंद या आश्रमातील या सार्वजनिक श्राद्धातून दिसून आला. महाराजांबरोबर बोलल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा झाला.

बालसंस्कार शिबिर...

कथेतील संस्काराचा विषय महाराजांच्या चर्चेतही मी पुढे आणला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुलांवर संस्कार करण्याचे भान आई-वडिलांना राहत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांनाच भाेगावा लागतो. मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार केले गेले पाहिजेत, यावर महाराज ठाम होते. त्यांच्या मते सध्याच्या काळात वाढत असलेले वृद्धाश्रम याबाबत मला अजिबात सहानुभूती वाटत नाही, त्याचे कारण त्याच्या विचाराच्या मुळाशी गेल्यावर कळते. जेव्हा काही ज्येष्ठांवर वृद्धाश्रमात येण्याची वेळ येते, तेव्हा त्याचे जीवन पाहिले ती वेळ येण्यामागे त्यांचे कर्मच कारणीभूत असते. लहानपणी आपल्या मुलांवर आपण काय संस्कार करतो, यावरच पुढच्या आई-वडिलांच्या जीवनातील उत्तरार्धातील जीवन अवलंबून असते. त्या काळात मुलांना योग्य संस्कार, योग्य वेळ दिला नाही, तर तेही म्हातारपणात कसे वेळ देतील. तुम्ही शिकवलेलेच ते पुढे अनुकरणात आणतात. त्यामुळे वृद्धाश्रमात येण्याची वेळ ही त्यांनी केलेल्या कर्माची फळे असतात, या विचारावर महाराज तरी ठाम होते. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात महाराज आश्रमात राज्यस्तरीय संस्कार शिबिर आयोजित करतात. त्यातून योग्य संस्कार नव्या पिढीवर करतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :CoronavirusCorona Death