सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!

प्रिया जोशी

काही दिवसांपूर्वी माझ्या एका प्रिय सखीचा फोन आला. तिच्या सुरेल आवाजात ती गुणगुणली... हो, ती पट्टीची गायिका असल्यामुळे तिचं नेहेमीचं बोलणं सुद्धा अगदी सुरीलं, नादमय असतं. ती म्हणाली," तुझ्याकडे एक काम आहे. सध्या मी एका गाण्याचा रियाज करायचं ठरवते आहे; पण त्यासाठी मला त्या गाण्याचा अर्थ हवा आहे. म्हणजे गाणं मराठीच आहे , आणि त्याचा लौकिकार्थ मला माहित आहे. पण तुला ते गाणं ऐकल्यावर काय वाटतं ते मला जाणून घ्यायचंय. तुझ्या नजरेतून - तुझ्या भावविश्वात डोकावणाऱ्या अर्थाची ओळख करून घ्यायची आहे."

तिचं ते बोलणं ऐकून मनावर जरा दडपण आलं; आणि जेव्हा तिनी ते गाणं कोणतं ते सांगितलं तेव्हा तर मी पूर्ण गारदच झाले. गाणं होतं - ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...’

हो ! उंबरठा चित्रपटातलं.... सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेलं.... हृदयनाथ मंगेशकरांनी संगीताचा साज चढवलेलं आणि लतादीदींच्या स्वर्गीय आवाजात अक्षरशः चिंब न्हाऊन निघालेलं ....आणि या सगळ्याचा कळस म्हणजे - स्मिता पाटीलच्या सशक्त अभिनयातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारं एक अजरामर काव्यशिल्प !!!

क्षणभर वाटलं, माझ्या या सखीचा जरा जास्तच जीव आहे माझ्यावर. बहुतेक माझ्या प्रेमात आंधळी वगैरे झाली असावी. म्हणूनच तर माझ्याबद्दल हा नको तेवढा, काहीसा अनाठायी कॉन्फिडन्स वाटतोय तिला

पण त्याच वेळी एक वेडी इच्छाही होत होती... तिनी दिलेलं आव्हान स्वीकारायची.. स्वतःच स्वतःच्या सीमारेषा पडताळून बघायची! आणि शेवटी मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलं. फक्त तिच्याकडून जरा जास्त मुदत मागून घेतली.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!
केवळ तीन सेकंदांच्या व्यायामाने व्हा तंदुरुस्त!

सगळ्यात आधी you tube वर गाण्याचा व्हिडिओ बघितला. गाणं संपल्यानंतरही कितीतरी वेळ त्यातले शब्द मनात घोळत राहिलो; पण त्याहीपेक्षा जास्त लक्षात राहिले ते नायिकेचे अश्रूंनी ओथंबलेले भावुक डोळे !! नुसते लक्षातच नाही राहिले - तर मनात घर करून बसले. काय नव्हतं त्या डोळ्यांत ?? एका विरहिणीचं दुःख, तिच्या मनात पिंगा घालणाऱ्या हजारो सुखद आठवणी, आपल्या जोडीदारापासून दुरावलेली पत्नी, मुलांपासून लांब राहावं लागणारी आई... आणि एकाच वेळी त्या विरहाच्या आगीत जळणारी तिची ती दोन्ही रूपं !! एकही शब्द न उच्चारता, चेहेऱ्यावरची रेषही न हलवता केवळ आपल्या डोळ्यांतून आणि त्यांत साठलेल्या अश्रूंतून बघणाऱ्याला सुन्न करण्याचं हे अशक्य काम स्मिता पाटीलच करू जाणे !!

तिच्या त्या निःशब्द अश्रूंचं आणि पर्यायाने त्या गाण्याचं गारुड काही केल्या माझा पिच्छा सोडेना. पण गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्या गाण्याबद्दल विचार केला तेव्हा तेव्हा बाकी सगळं विसरून फक्त तिचे ते अश्रूच सतत आठवत राहिले. परिस्थितीमुळे असहाय झालेल्या एका विरहिणीचे अश्रू..... कुठल्याही क्षणी डोळ्यांच्या लक्ष्मणरेषा उल्लंघून गालांवर ओसंडायला तयार असलेले तिचे ते असहाय पण तरीही जीवाला घोर लावणारे मूक अश्रू - राहून राहून मला तिच्या जीवाची होत असलेली तगमग दाखवत राहिले.

आणि मग माझ्याही नकळत तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यावर तरंगत तरंगत माझं मन भूतकाळात गेलं...युगांचा प्रवास करत यमुनेच्या तीरावर - वृंदावनात जाऊन पोचलं . आणि मला तिथे ‘ती’ दिसली... यमुना काठच्या एका कदंब वृक्षाखाली बसलेली.... पैलतीरावर नजर स्थिर करून; आपले पंचप्राण डोळ्यांत आणून- जणू कुणाची तरी वाट बघणारी...

हो... जगाचंच नाही तर स्वतःचंही भान विसरलेली; केवळ आपल्या प्राणप्रिय कान्हाची वाट बघणारी ‘ती’... आपल्या डोळ्यांतल्या पाण्यामुळे अंधुक झालेल्या यमुना काठी पुन्हा पुन्हा आपल्या मुरलीधराला शोधणारी ... कृष्णाची प्राणप्रिय राधा!!

आता मला त्या गाण्यातला शब्द न् शब्द राधेच्या मनातून उमटताना दिसत होता.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!
टिपू सुलतान : म्हैसूरचा वाघ की जुलमी राजा

माझ्या डोळ्यांसमोर राधा कृष्णाची वृंदावनातली ती शेवटची भेट अगदी स्पष्ट दिसत होती. दिवसाच्या शेवटच्या प्रहरात आकाशातून झिरपणाऱ्या संधीप्रकाशात यमुने काठच्या त्या डेरेदार कदंब वृक्षाखाली ते दोघं बसले होते. दोघांच्याही व्याकुळ नजरा एकमेकांच्या हृदयाचा ठाव घेत होत्या. आता दोघांना शब्दांच्या आधाराचीही गरज भासत नव्हती. कृष्णाच्या नजरेतून, त्याच्या स्पर्शातून आणि त्याच्या बासरीच्या प्रत्येक सुरातून तो आपलं मन राधेपाशी मोकळं करत होता. जणू काही तो तिला सांगत होता - ‘‘ही आपली शेवटची भेट! आता यापुढे आपण एकमेकांना कधीच भेटणार नाही. पण माझ्या यापुढील आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत रमलेला असेल. प्रत्यक्ष भेटता आलं नाही तरी आपण सतत एकमेकांबरोबर राहू... तू मला दिलेलं हे मोरपीस आणि माझ्या गळ्यात घातलेली ही वैजयंतीची माला आयुष्यभर माझ्या बरोबर राहील... माझ्या मस्तकातून स्फुरलेल्या प्रत्येक विचारात आणि माझ्या हृदयातून उमटलेल्या प्रत्येक स्पंदनात माझी राधा असेल...आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला साथ देणारी माझी राधा!’’

कृष्णाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द राधेला व्यथित करत होता. खूप काही बोलायचं होतं तिला, जाब ही विचारायचा होता... की, ‘‘आपल्या दोघांच्या आयुष्याचा निर्णय तू एकट्याने कसा घेतलास? आणि का? तू मला सोडून गेल्यावर माझी काय अवस्था होईल हे माहीत असूनही तू हा असा निर्वाणीचा विचार करून मोकळा झालास. तुझ्या त्या मोरपिसात आणि वैजयंती माळेत तू मला कायम बघशील.. पण मी कुठे शोधू तुला? कशी भेटू तुला?’’

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!
नेमेची येतो तो’ अर्थसंकल्प

पण तिनी एक शब्दही न उच्चारता देखील कृष्णानी तिचं मन वाचलं. तिच्या त्या प्रश्नांनी कृष्णाच्या नीलवर्णी चेहेऱ्यावर क्षणभरासाठी विचारांचं, चिंतेचं वलय पसरलं. पण मग पुढच्याच क्षणी आपल्या उत्तरियात खोवलेली आपली बासरी काढून ती राधेच्या कोमल हातांत ठेवत कृष्ण म्हणाला,‘‘माझी ही बासरी मी तुझ्या सुपूर्द करून जातो आहे.’’ राधेच्या अचंबित चेहेऱ्याकडे बघत कृष्ण खिन्नपणे हसला आणि म्हणाला, ‘‘तू आहेस म्हणून माझ्या या बासरीत स्वर आहेत. माझ्या प्रत्येक श्वासात मिसळलेला तुझा श्वास म्हणजेच या बासरीतून निघालेलं कर्णमधुर संगीत! पण तुझ्याविना माझ्या हातातली ही बासरी कायमची मौन होईल. अशा रित्या झालेल्या या बासरीचं मी काय करू? आणि म्हणूनच ही मी तुला देऊन जातोय. माझे श्वास हिच्यात ठेवून जातोय. यापुढे माझ्या या बासरीतून सप्त सूर निघतील ते फक्त आणि फक्त तुझ्या कानांवर पडण्यासाठीच. इतरांकरता ही सदैव मौनच राहील.’’

त्याचं ते बोलणं ऐकून, प्रत्यक्ष मुरलीधराची ती बासरी आपल्या हातांत बघून राधा मंत्रमुग्ध झाली. तिला तशाच भारावलेल्या मनस्थितीत सोडून कृष्ण हलक्या पावलांनी तिथून निघून गेला. त्याच्या प्राणप्रिय राधेचं ते लोभसवाणं रूप आपल्या नीरज नयनांत साठवून घेत तो रात्रीच्या काळोखात दिसेनासा झाला.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!
अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..!

त्या शेवटच्या भेटीनंतर प्रत्येक रात्री राधा मात्र त्याच कदंब वृक्षाखाली यमुनेच्या तीरावर तिच्या कृष्णाची वाट बघत राहिली. त्यांची ती शेवटची भेट पुन्हा पुन्हा अनुभवत राहिली. त्याची बासरी आपल्या कानाशी धरून तिच्यात लपलेले सप्तसूर ऐकत राहिली. त्यांत आपले श्वास मिसळून गुणगुणत राहिली....

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

तुझेच मी गीत गात आहे

अजुन ही वाटते मला की

अजुन ही चांद रात आहे

यमुनेच्या काळ्याशार पाण्यात ती प्रेमवेडी राधा आपल्या कृष्णाचं प्रतिबिंब शोधत राहिली. आणि प्रत्येक लाटेबरोबर दिसणारी त्याची ती निरनिराळी रूपं डोळ्यांत साठवून ठेवू लागली....

कळे ना मी पाहते कुणाला

कळे ना हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे

तुझे हसू आरशात आहे

तिच्यापासून दूर असूनही तिच्या आठवणींत व्याकुळ होणाऱ्या माधवाला जणू काही समजावत राहिली, त्याचं सांत्वन करत राहिली....

सख्या तुला भेटतील माझे

तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा

अबोल हा पारिजात आहे

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!
मोदीविरोधी टीकेचे अस्त्र बोथट का ठरते?

आपली अबोल प्रीती जपणारी राधा मनोमन जाणून होती की कृष्णाच्या सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या नात्यात त्याच्याशी कायमची बांधली जाते. आणि म्हणूनच तिच्या निरागस मनात एक असूयेची, काहीशा असुरक्षित भीतीची कळ उठल्यावाचून राहिली नाही. ‘आपण ज्याच्यासाठी रोज झुरतोय त्याला आपली आठवण तरी येत असेल का?’ हा प्रश्न तिच्या मनाला भेडसावत राहिला. कितीही नाही म्हटलं तरी शेवटी तिच्या मनात उफाळून आलेल्या स्त्रीसुलभ शंकेनी हळूच डोकं वर काढलं आणि त्या मनस्थितीतच तिनी कृष्णाला विचारलं....

उगीच स्वप्नांत सावल्यांची

कशास केलीस आर्जवे तू

दिलेस का प्रेम तू कुणाला

तुझ्याच जे अंतरात आहे

मिळालं असेल का तिला या प्रश्नाचं उत्तर? पटली असेल का तिची खात्री? कोणास ठाऊक!

पण या सगळ्या विचार मंथनातून मला मात्र एक गोष्ट जाणवली... हा असा प्रेमातला विरह जगणं - आणि या चिरकालीन विरहात देखील टिकून राहणारं, क्षणोक्षणी बहरत जाणारं प्रेम करणं शक्य आहे. फक्त त्यासाठी प्रत्येक स्त्रीला राधा आणि प्रत्येक पुरुषाला कृष्ण होता आलं पाहिजे!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com