
अवीट गोडीची गाणी अन् त्याचे गायक, सध्या दुर्लभ झाले आहेत...
तुम्ही `पुष्पा` चित्रपट बघितलात? बघितलाच असणार! अर्थातच आवडलाही असणार. अल्लू अर्जुनचा अभिनय, खिळवून ठेवणारी कथा, अँक्शन, संवाद कमालच आहेत. त्यातली गाणी तर भन्नाट. `उं बोले या साला`, `आजा सामे मंदिर सामे` अशी गाणी तुम्ही किती तरी वेळा युट्यूबवर बघितली असतीलच पण तुम्हाला ही गाणी कुणी गायली आहेत माहीत आहे? नाही ना आठवतं! समजा हिंदी गाणी माहीत नसतील, तर तेलगू, मल्याळम भाषेत सुपरहिट झालेली गाणी तरी कुणी गायली आहेत माहीत आहे? हेही फार आठवणार नाही. बरं, हा चित्रपट जाऊ दे. गेल्या दोन-तीन वर्षात सुपरहिट झालेल्या कोणत्याही चित्रपटातली कोणतीही सुपरहिट गाणी आठवा. तुम्हाला त्यांचे शब्द माहीत असतील, चाल पाठ असेल, गायकाचा किंवा गायिकेचा आवाजही डोक्यात बसला असेल, पण त्याचं नाव तुम्हाला आठवणार नाही.
फार कशाला, मोहित चौहानची चार गाणी सांगा, बेनी दयालची गाणी सांगा, नेहा कक्करचा आवाज कुणासारखा वाटतो ते आठवा असं म्हटलं तरी जमणार नाही. बी. प्राक, जुबिन नॉटियाल, गुरू रंधवा, दर्शन रावल, मोनाली ठाकूर ही गेल्या काही काळात सुपरहिट गाणी देणाऱ्या गायक-गायिकांची नावं आहेत, असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल ना? श्रेया घोषाल, सोनू निगम, अरिजितसिंग, मोहित चौहान, सुनिधी चौहान किंवा ए. आर. रेहमान अशी अक्षरशः चार-दोन नावं सोडली, तरी ज्यांचा आवाज ऐकला की लगेच नाव कळतं अशी नावं गेल्या काही काळात राहिलेलीच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मुकेश, मोहंमद रफी अशा गायकांचे आवाज आजही सगळ्यांच्या डोक्यात फिट आहेत, त्यांची गाणी कधीही ओळखता येतात, पण नव्या जमान्यातल्या फार कुणाला हे साध्य होत नाही असं दिसतंय, हे तर खरंच. गायक हा पूर्वी नव्हे-अगदी दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत `ब्रँड` होता, पण असा ब्रँड होण्याची प्रक्रियाच बंद होत गेल्याचं आपल्याला दिसतंय. तुमच्याही लक्षात आलं असेलच ना?
कशामुळे झाली गायक हा ब्रँड अस्तंगत होण्याला सुरवात?
त्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. आपल्याला एखादं गाणं अमुक गायकानं किंवा गायिकेनं गायलं हे माहीत कधी व्हायचं पूर्वी? एक तर आकाशवाणीवर निवेदकानं सांगितल्यामुळे किंवा कॅसेटवर त्या गाण्याच्या गायकाचं नाव वाचल्यामुळे. बरोबर ना? आता नीट बघितलं तर या दोन्ही माध्यमांची परिमाणं बदलत गेली, तसा गायक या ब्रँडवर परिणाम होत गेला. म्हणजे आकाशवाणीवर एखादं गाणं लागायचं, तेव्हा त्याचे गीतकार, संगीतकार, चित्रपट आणि गायक सांगितले जायचे आणि अजूनही सांगितले जातात. साधारण सतरा-अठरा वर्षांपूर्वीपासून खासगी एफएम वाहिन्यांचं प्रस्थ वाढलं आणि त्यांनी ही माहिती सांगणं बंदच करून टाकलं. त्याच्याऐवजी निवेदक इतरच बडबड करत असतो. त्यातला चांगला-वाईट, आवड-निवड हा मुद्दा वेगळा असला, तरी खासगी एफएम वाहिन्यांवर गाण्याशी संबंधितांची नावं कळतीलच असं नाही हा मुख्य मुद्दा.
तीच गोष्ट कॅसेट्सची. पूर्वी आकाशवाणीवर गाणी ऐकल्यावर त्यांच्या कॅसेट्स आवर्जून विकत घेतल्या जायच्या आणि त्या वारंवार ऐकल्या जायच्या. या सगळ्या कॅसेट्सवर सगळी माहिती ठळकपणे छापलेली असायची. त्यामुळे एखादा नवीन आवाज असेल तर आवर्जून बघितलं जायचं आणि माहिती कळायची. पुढे सीडी आल्या तरी हा सिलसिला सुरू होता. मात्र, पेन ड्राइव्ह आणि आता तर नुसतं स्ट्रीमिंग सुरू झाल्यावर गाण्याशी संबंधित माहिती घेणं ही गोष्ट बाजूला पडली ती पडलीच. इंटरनेटच्या मदतीनं गाणी ऐकली जरूर जातात, पण इतर माहिती पोचेलच असं नाही. अनेकदा चुकीचीच माहिती असते.
हेही वाचा: 1985 च्या निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एक आमदार निवडून आला होता
आणखीही अनेक मुद्दे आहेत. पूर्वी रंगमंचीय कार्यक्रम खूप असायचे. म्हणजे समजा मदनमोहन यांच्याविषयी कार्यक्रम असेल, तर मग त्या कार्यक्रमात गाण्यांबरोबरच इतर किस्से, अनुषंगिक माहिती असं सगळंही निवेदकाकडून ऐकायला मिळायचं. गेल्या काही वर्षांत तेही कमी झालंय असं दिसतं. टीव्हीवरही संगीताचे किती तरी रिअॅलिटी शो असले, तरी अमुक गाणं स्पर्धकानं गायलं, तरी मूळ गाणं कुणी गायलं होतं, संगीत कुणाचं होतं, चित्रपट कोणता अशी माहिती प्रेक्षकांना मिळतेच असं नाही.
अशा एक ना अनेक गोष्टी. काही गोष्टी तर आणखी भयानक आहेत. एकेका गायकाचा ब्रँड तयार झाला आणि तो एखाद्या कंपनीच्या, स्टुडीओच्या जास्त वरचढ व्हायला लागला, तर त्याचे पंख कापण्याचेही प्रकार घडतात. एक अगदी ज्वलंत उदाहरण सोनू निगमचं. अतिशय विशिष्ट, गोड आवाज असणारा हा गायक. दहा वर्षापूर्वीपर्यंत त्याचा मखमली आवाज कित्येक चित्रपटांमधून ऐकू यायचा, मात्र नंतर नंतर वेगवेगळी राजकारणं होत गेली आणि सोनू निगमला जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जाऊ लागलं. त्यानं गायलेली अनेक गाणी नंतर अरिजितसिंग वगैरेंनी गायल्याचेही प्रकार घडले आहेत. त्याच्या आधीच्या पिढीतले कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण असे अनेक लोकही हळूहळू बाजूला गेले किंवा केले गेले किंवा ते बदलत्या जमान्याशी जुळवून घेऊ शकले नाहीत.
हेही वाचा: आयटीमध्ये नोकरी करायचीये काय केले पाहिजे?
त्यामुळे त्यांच्या आवाजातली गाणी हल्ली आपल्याला ऐकायला मिळतच नाहीत. ज्यांची गाणी ऐकायला मिळतात त्यांच्या आवाजात तो ठहराव नसतो, वजन नसतं, मेहनत नसते, वैविध्य नसतं. त्यामुळे त्यांचे आवाज आपल्या कानात राहतीलच असं नाही, त्यामुळे एक श्रोता म्हणून आपणही एखादं गाणं आवडल्यावर त्या गायकाची-गायिकेची माहिती जाणून घ्यायला फारसे उत्सुक नसतो. बरं, आज एखादं सुपरहिट गाणं गाणारा गायक किंवा गायिका उद्या किंवा परवा तशीच कामगिरी करेल याचीही खात्री नसते. लता मंगेशकर, मोहंमद रफी, किशोरकुमार, आशा भोसले हे दिग्गज लंबी पारी खेळण्यासाठी आले होते. ते त्यांची मेहनत, संगीतनिष्ठा घेऊन आले होते, कष्टांची तयारी घेऊन आले होते. त्यांच्याशी तुलना करणारे कोण गायक-गायिका आहेत असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मिळेलच असं नाही. या दिग्गजांच्या काळात इतर माध्यमं नव्हती.
लोकांना आकाशवाणी, दूरदर्शन आणि कॅसेट्सशिवाय दुसरं मनोरंजनाचं साधन नव्हतं, त्याचा फायदा द्यांना मिळाला हे सगळे भाग आहेतच. पण तरी एकेका गाण्यासाठी प्रचंड मेहनत करणारे गायक, त्यांच्याकडून अचूक गाऊन घेण्याची इच्छा आणि तयारी असलेले संगीतकार, एकेक शब्दासाठी झगडणारे गीतकार, टीमवर्क करणारे वादक आज दिसतात का हाही एक प्रश्न आहेच. हल्लीची गाण्यांच्या रेकॉर्ड़िंगची प्रक्रिया तर जितकी सोपी झाली आहे, तितकीच तिच्यातली खोली कमी झाली आहे, हेही खरंच. द्वंद्वगीत गाणारेही एकाच वेळी रेकॉर्डिंगला येत नाहीत. अनेकदा प्रत्येक जण त्याचं त्याचं गाऊन जातो. फार कशाला, वादकसुद्धा अनेकदा त्यांचे त्यांचे तुकडे वाजवून जातात आणि मग त्याचं मिक्सिंग केलं जातं. या सगळ्यातून गायकाचा ब्रँड तयार होणं राहोच, संगीतकाराचा तरी ब्रँड कसा तयार होणार? काल ऐकलेलं गाणं आज आठवत नाही अशी स्थिती
एक असंही आहे, की काळाचा महिमा म्हणा किंवा कमी होत चाललेल्या खोलीचा परिणाम म्हणा, अनेक ब्रँड्स अस्तंगत होत चालले आहेत. साध्या टीव्ही मालिका घ्या. मालिकांमधल्या कलाकारांची नावं देणं वाहिन्यांनी बंद केलं आणि त्या कलाकारांचे ब्रँड्स बनणं कमीच झालं. मालिकांचे दिग्दर्शक तरी आपल्याला कुठं माहीत असतात हल्ली? एक सपाटीकरणाची प्रक्रिया सगळीकडेच सुरू झाली आहे, त्यात कलाही भरडल्या जाऊ लागल्या आहेत आणि त्यातूनच गायक, अभिनेते, दिग्दर्शक यांचे ब्रँड्स तयार होणं, त्यांची ओळख ठसणं या गोष्टी कमी झाल्या आहेत हे खरं. असो, श्रोता म्हणून आपण नवंही ऐकायचं आणि जुनंही ऐकायचं. चांगलं ते मनात साठवत राहायचं.... शेवटी मनात ब्रँड तयार होण्याची प्रक्रिया तर कुणीच थांबवू शकत नाही ना?
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”