अप्पू: द रिअल हिरो...पुनीत राजकुमार!
सामाजिक बांधिलकी जपणारा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार अचानक काळाच्या पडद्याआड गेला. टॉलीवूड अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. कसदार अभिनयाच्या जोरावर त्याने तीन दशके प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. मृत्यूनंतर त्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येत सिनेप्रेमींनी केलेली गर्दी त्याच्यावर असलेल्या अतीव प्रेमाची साक्ष देते. श्रद्धांजली वाहण्यासाठी ११ दिवसानंतरही लाखो चाहत्यांची रांग पुनीतच्या स्मृतीस्थळी कायम होती. दीनदुबळ्यांसह, विद्यार्थी तसेच अनाथांसाठी त्याने उभारलेली माणुसकीची भिंत अन् सामाजिक योगदानातून त्याने अनेकांचे जीवन सुखकर केले. 'अप्पू' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रिअल हिरोला महिना उलटला तरी कर्नाटकासह देशभरातील चाहत्यांकडून अश्रूंची सूमनांजली वाहिली जात आहे.
'अप्पू' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या पुनीतने ३० चित्रपटांतून अभिनय साकारला. तो केवळ अभिनेताच नव्हता तर गायकही होता. कन्नड चित्रपट सृष्टीत तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता असल्याचे बोलले जाते. पुनीतच्या चित्रपटांचे गारुड केवळ टॉलीवूडवर होते, असे नाही तर ते बॉलीवूडवरही होते. त्याच्या हिंदी भाषेत डब झालेल्या चित्रपटांचा यूट्यूब तसेच इतर सोशल माध्यमांवर बोलबाला असतो. जिममध्ये व्यायाम करताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. केवळ ४५ व्या वर्षी पुनीतला मृत्यू कवेत घेईल, असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. बंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात त्याने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी अखरेचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. त्यामुळे देशभरातील राजकीय तसेच सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली.

