हिंदुत्व आणि भारतीय राजकारण..! आजच्या पिढीचे प्रश्न काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindutva and Indian Politics }

हिंदुत्व आणि भारतीय राजकारण..! आजच्या पिढीचे प्रश्न काय?

देशातील काही राज्यात निवडणुकांचे बिगूल वाजायला लागले आहेत. निवडणुकांचा मध्यावधी टप्पा आता सुरू होईल. आणि प्रचाराचा टप्पाही शिगेला पोचलेला दिसेल. निवडणूक होणाऱ्या राज्यांपैकी महत्त्वाची आणि निर्णायक निवडणूक ठरणार आहे ती उत्तरप्रदेशमधील. आगामी म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची ही ‘लिटमस टेस्ट’ असणार आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणूक आणि हिंदुत्व याचा जवळचा संबंध आहे. अर्थात तो राम मंदिर, काशी यामुळे प्रामुख्याने अधोरेखित होत असतो. यासाठी १९९१ पासूनचा इतिहास आहे. त्यामुळे सहाजिकच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तो बाजूला राहील असे अजिबात नाही. सध्या या राज्यात राजकीय पक्ष फोडाफोडीला जोर आला आहे.

विवेकाचा वापर आवश्यक

सत्तेपासून वंचित राहिलेल्या राजकीय पक्षांची सत्ता पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न ही लोकशाहीमध्ये एक सामान्य पद्धत आहे. परंतु त्या प्रक्रियेतही, विवेकाचे पालन करणे आवश्यक आहे. ती राजकारणातील आंतर-स्पर्धा आहे, शत्रूंमध्ये होणारे युद्ध नाही. स्पर्धा असावी, परंतु ती निकोप असावी, परंतु त्यामुळे समाजात कटुता, भेदभाव, अंतर वाढवणे आणि परस्परांमध्ये वैर होऊ नये, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच या स्पर्धेचा फायदा घेणारी, भारताला कमकुवत किंवा खंडित ठेवणारी, भारतीय समाज सदैव कलहग्रस्त राहावा यासाठी आपल्या विविधतेला गैर सांगून आधी पासून चालत आलेल्या दुर्भाग्यपूर्ण विषमतेला अजून अधिक बिकट आणि संघर्षमय करणारी आणि आपापसांत भांडणे लावणारी तत्त्वे या विश्वात आहेत आणि त्यांचे हस्तक भारतात देखील आहेत.

उपासना पद्धती

हिंदुत्व या शब्दाचा अर्थ उपासनेशी जोडल्यामुळे तो संकुचित केला गेला आहे. हा शब्द आपल्या देशाच्या अस्मितेचा, अध्यात्म्य आधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि समस्त मूल्य संपदेसह अभिव्यक्ती देणारा आहे. हा शब्द भारतवर्षाला आपले मानणाऱ्या, त्याच्या संस्कृतीच्या वैश्विक आणि सार्वकालिक मूल्यांना आचरणात आणू इच्छिणारे तसेच यशस्वीपणे असे करून दाखवणारी पूर्वज परंपरेचा गौरव मनात ठेवणाऱ्या सर्व १३० कोटी समाज बांधवांना लागू आहे. या शब्दाच्या विस्मरणाने आपल्याला एकात्मतेच्या सूत्रात बांधणारे बंध तसेच देश आणि समाज यांचे बंध शिथिल झालेत. म्हणूनच ज्यांना हा देश आणि समाज खंडित करायचा आहे, ज्यांना आपल्याला आपापसांत लढवायचे आहे, ते लोक जो शब्द सर्वांना जोडतो त्यालाच आपल्या निंदा आणि टीकेचे प्रथम लक्ष बनवितात. हिंदू कोणत्याही पंथ किंवा संप्रदायाचे नाव नाही, कुण्या प्रांताने व्युत्पन्न केलेला शब्द नाही, हा कोणत्याही जातीचा वारसा नाही, कुण्या एका भाषेचा पुरस्कार करणारा शब्द नाही. आपल्या या समस्त विशिष्ट ओळखीला कायम सन्मानित आणि स्वीकृत करून भारत भक्तीला आणि मानवतेच्या विशाल प्रांगणात सर्वांना सामावून घेणारा आणि सर्वांना जोडणारा शब्द आहे. आपल्या राष्ट्राचे ‘स्व’ त्व हेच हिंदुत्व आहे. संपूर्ण राष्ट्र जीवनाचे सामाजिक, सांस्कृतिक क्रिया अभिव्यक्ती करणाऱ्या मूल्यांचा तसेच वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाच्या अभिव्यक्तीचे नाव हिंदू असा या शब्दाचा आशय आहे. त्या शब्दाच्या भावनेच्या परीघामध्ये येण्यासाठी आणि राहण्यासाठी कुणाला आपल्या उपासना, प्रांत, भाषा इत्यादी काही वैशिष्ट्य सोडण्याची गरज नाही. केवळ आपलेच वर्चस्व स्थापित करण्याची इच्छा सोडून द्यावी लागते. फुटीरतावादी भावना स्वतःच्या मनातून काढून टाकावी लागते. वर्चस्ववादाचे स्वप्न दाखवणारे, कट्टरवादाच्या आधारे, फुटीरतावादाला उत्तेजन देणाऱ्या स्वार्थी आणि विद्वेषी लोकांपासून वाचवून ठेवावे लागते.

हिंदुत्ववाद सत्तासोपानाचा मार्ग नाही

हिंदुत्ववाद हा काही सत्तासोपानाचा मार्ग नाही. ती आमची परंपरा आहे. आता काही मंडळींनी हिंदुत्व हा सत्तासोपानाचा मार्ग आहे, असे समजून भ्रमित करणारी मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टपणे जाणवते. तथाकथित अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना खोटी स्वप्ने आणि काल्पनिक द्वेष पसरवून भारताच्या विविधतेच्या मूळ गाभ्यावर घाला

घालून शाश्वत ऐक्य मोडून काढण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे. राजकीय स्वार्थ, कट्टरता आणि अलगाव, भारताबद्दलचे वैमनस्य आणि जागतिक वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा यांचे एक विचित्र संयोजन भारताच्या राष्ट्रीय ऐक्याविरूद्ध काम करत आहे. भारतीय भारतापासून वेगळे राहू शकत नाही. असे सर्व प्रयोग अयशस्वी झाले आहेत. ‘स्व’ कल्याणाचा शहाणपणा आपल्याला एकत्व भावनेमध्ये जाण्यासाठी दिशादर्शक आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. भारताच्या भावनिक एकात्मतेत आणि विविधतेचा स्वीकार आणि त्याच्या सन्मानाच्या मुळामध्ये हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा आणि हिंदू समाजाने स्वीकारलेली प्रवृत्ती आणि सहिष्णुता आहे हे प्राधान्याने लक्षात घेण्यासारखी बाब आहे. निवडणुका येतच राहतील, परंतु आपण त्याकडे कशा पद्धतीने पाहतो हे लक्षात घेतले पाहिजे. कारण पुढील पिढीचे प्रश्न वेगवेगळे आहे. त्या प्रश्नांकडे अधिक विवेकाने आणि गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

माहितीची आवश्यकता

आजच्या युवा पिढीचे प्रश्न काय आहेत, त्यांना नक्की काय पाहिजे याचा साकल्याने विचार निवडणुकीच्या अनुषंगाने झाला पाहिजे. हिंदुत्व ही आपली जगण्याची पद्धती आहे, हे सांगत असताना आपला उज्ज्वल भूतकाळही या पिढीसमोर योग्य पुराव्यानिशी उलगडून दाखविला पाहिजे. त्यामुळे त्याला भारतीय समृद्ध परंपरांची माहिती मिळेल आणि त्याचाही देशाकडे पाहण्याचा कल बदलेल, हिंदुत्व संकुचित भावना नाही. भारत हा विविध परंपरेने नटलेला देश आहे. सहाजिकच पंथही वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत योग्य पद्धतीने या युवा पिढीसमोर माहिती ठेवणे क्रमप्राप्त आहे. कारण आजच्या व्हॉट्सॲपच्या जमान्यात भ्रमित करणारी माहिती अत्यंत वेगाने प्रसारित होत असते. ती वारंवार सांगितली जात असल्याने खरीही वाटायला लागते. या माहितीत बहुतांश वेळा स्त्रोताचा अभाव असतो आणि यथायोग्य पुरावेही नसतात. त्यामुळे खरी माहिती समाजासमोर येणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात मताचे राजकारण करताना ती निश्चित योग्य प्रकारे समाजासमोर येत नाही.