गोरखपूर, योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचा विकास!
गोरखपूर : पूर्व उत्तर प्रदेशातील एक मोठं शहर. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या या सपाटीच्या प्रदेशात पाण्याची, नैसर्गिक संसाधनांची मुबलकता दिसून येते. येथील गोरक्षनाथ पीठाचे महंत व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा गड. शहरात कोणत्याही व्यक्तीशी बोलल्यावर त्याच्या तोंडात आदित्यनाथांबद्दल गौरवोद्गारच ऐकायला मिळतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी योगी गोरखपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढत होते व त्यांनी एका लाखापेक्षा कमी मताधिक्य घेतल्यास तो त्यांचा नैतिक पराभव ठरेल, असं स्थानिक लोक सांगत होते. योगींना हा पराभव टाळला व एका लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन ते सहज निवडून आले. भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाल्यानं योगींचा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ते २५ मार्चला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. (Development of Gorakhpur Yogi Adityanath and Uttar Pradesh article by Mahsh bardapurkar)
गोरखनाथ मठ(Gorakhpur Math)
गोरखनाथ मठाचा संबंध ११व्या शतकातील नाथ संप्रदायाचे विख्यात संत गुरू गोरक्षनाथ यांच्याशी जोडला जातो. नाथ संप्रदाय हिंदू धर्मातील शैव परंपरेचा एक भाग आहे. नाथ संप्रदायातील लोक आपला संबंध दत्तात्रेयाशी जोडतात. दत्तात्रेय ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अवतार मानले जातात. दत्तात्रेयांनी आपल्या अनुयायांच्या सोबत गुजरातमधील गिरनारच्या जंगलात राहिले होते, अशी मान्यता आहे. मत्स्येंद्रनाथ हे संत गोरक्षनाथ यांचे गुरू होते. गोरक्षनाथांनी ११व्या शतकात उपनिषदांमधील श्लोक सोप्या भाषेत लोकांपुढे आणले. त्यांनी जातीच्या आधारावर कधीही भेद केला नाही. गोरक्षनाथाचा अर्थ गाईंचे रक्षण करणारा. गोरखनाथ हे शक्तिपीठ हळूहळू एका समाजवादी ठिकाणामध्ये विकसित झाले. आजही मकरसंक्रांतीला सर्व जाती-धर्माचे लोक मठात एकत्र येतात आणि त्यांना खिचडीच्या प्रसादाच्या वाटप केले जाते. आज या मठाची ओळख धार्मिक व राजकीय संस्था अशी झाली आहे. या मंदिरात गुरू गोरक्षनाथ यांच्या आदर्शानुसार कोणतेही धार्मिक अथवा जातीय नियम पाळले जात नाहीत. गैरब्राह्मणही या मंदिराचा पुजारी होऊ शकतो. योगी आदित्यनाथही ब्राह्मण नसून, ते ठाकूर समाजाचे आहेत. गेल्या अनेक दशकांपासून हा मठ राजकारणाचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या मठाचे तत्कालीन महंत दिग्विजय नाथ यांनी राम जन्मभूमी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिग्विजय नाथ १९२१मध्ये कॉंग्रेसचे सदस्य बनले, मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांचे महात्मा गांधींबरोबरचे संबंध बिघडले व त्यांच्या विरोधात भाषणं केल्यानं दिग्विजय नाथ यांना तुरुंगात जावे लागले. त्यांनी १९४९मध्ये राम जन्मभूमी आंदोलनात उडी घेतली व त्यांनी १९६७मध्ये हिंदू महासभेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
गोरखनाथ आणि धर्म
चंद्रगिरी, दक्षिणेतील ‘बडव’ देश, काठेवाडात गोरखमठी आणि पंजाब अशी त्याची विविध जन्मस्थाने विद्वान सांगतात. हजारीप्रसाद द्विवेदी त्याचा काळ नवव्या शतकाचा उत्तरार्ध, तर रा. चिं. ढेरे तो १०५० ते ११५०च्या दरम्यानचा मानतात. काही दंतकथांत कबीर (सु. १४८८–१५१२) व गुरू नानक (१४६९– सु. १५३८) यांच्याबरोबर गोरखनाथाचा संवाद झाल्याचे उल्लेख आढळतात. ‘गोरखनाथ’ ह्या नावासंबंधी दोन मते प्रामुख्याने मांडली जातात : ‘गो’ म्हणजे इंद्रिये. इंद्रिये ताब्यात ठेवणारा तो गोरक्षनाथ. दुसरे मत असे, की गोरखनाथाचा जन्म मच्छिंद्रनाथाच्या अनुग्रहाने ‘गोबरा’तून झाला म्हणून गोरक्षनाथ. हजारीप्रसाद गोरखनाथाची जात ब्राह्मण मानतात, तर श्री. ढेरे तो दक्षिणेत स्थायिक झालेल्या काश्मिरी ब्राह्मण कुलात जन्मल्याचे सांगतात. मोहनसिंग तो एका हिंदू विधवेचा अवैध पुत्र असावा, असे म्हणतात. समाजाच्या खालच्या स्तरात त्याचा जन्म झाला असावा, असेही एक मत आहे. (Gorakhpur News)
अमरनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरी, गोपीचंद व विमलादेवी हे गोरखनाथाचे प्रमुख व प्रसिद्ध शिष्य होत. पंच ‘म’कारावर आधारलेली विवेकशून्य व आचरणभ्रष्ट साधना त्या काळी विशेष बोकाळलेली होती. गोरखनाथाला ती मान्य नव्हती. त्यांनी योगमार्गाचा अवलंब केला. पतंजलीच्या अष्टांग योगाऐवजी त्याने षडंग योग (आरंभीची यम व नियम ही दोन अंगे गौण व इतर सहा अंगे प्रमुख) स्वीकारला. तो हठयोग म्हणून ओळखला जातो. गोरखनाथाच्या ग्रंथांत या साधनामार्गालाच अधिक महत्त्व दिलेले आहे. गोरखनाथाने प्रवर्तित केलेल्या योगमार्गाच्या वा नाथ संप्रदायाच्या बारा शाखा वा पंथ आहेत. म्हणून ‘बारहपंथी’ असेही नाव या संप्रदायास आहे. या संप्रदायाचे अनुयायी कानफाटा वा दरसनी साधू म्हणून ओळखले जातात. या बारा शाखांपैकी पहिल्या सहा शाखा प्रत्यक्ष शिवाने व शेवटच्या सहा गोरखनाथाने प्रवर्तित केल्याचे मानतात. ह्या बारा शाखा अशा : (१) भूजची (कच्छ) कंठरनाथी, (२) पंजाब, पेशावर व रोहटकची पागलनाथी, (३) पेशावर व अफगाणिस्तानची रावल, (४) पुरी, मेवास्थानेश्वर (थानेसर) व कर्णालची पंख किंवा पंक, (५) मारवाडची बन, (६) जोधपूरची गोपाल किंवा रामके, (७) बंगालची चांदनाथ कपिलानी, (८) टिला, अंबाला, कर्णाल येथील हेठनाथी, (९) बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील चोलीनाथ आईपंथी, (१०) रतढोंडा मारवाडची बैरागपंथी, (११) जयपूरची पावनाथी व (१२) धजनाथी. ह्या सर्व शाखांत पूर्वीचे अनेक पंथोपपंथ (उदा., कपिलाचा योगमार्ग, लकुलीश मत, कापालिक मत, वाममार्ग इ.) समाविष्ट झालेले आढळतात. यांखेरीज आणखीही पंथोपपंथ आहेत तथापि त्या सर्वांची नावे व गावे ज्ञात नाहीत.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
गोरखनाथांचे कार्य
गोरखनाथाचे कार्य व्यापक व विविध प्रकारचं आहे. कुल, जात, वर्ण, धर्म इत्यादींच्या पलीकडं ईश्वरतत्त्व आहे, असे त्याने प्रतिपादन केले. प्रखर वैराग्य, विशुद्ध चारित्र्य, सदाचार व ब्रह्मचर्य यांना त्याने स्वतःच्या आचरणाने महत्त्व देऊन तत्कालीन समाजातील अनैतिक, अविवेकी व अनाचारी वृत्तींना पायबंद घातला. तो महान संघटक होता. त्याने भारतीय आध्यात्मिक साधनेचे शुद्धीकरण केले आणि नंतरच्या अनेक महापुरुषांना कार्याची प्रेरणा दिली. त्याने योगमार्गाला सुसंघटित रूप देऊन योगसाधनांचे व्यवस्थापन केले. स्त्रिया व शुद्रांच्याही उद्धाराचा मार्ग त्याने मोकळा करून दिला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पायाही प्रथम त्यानेच घातला. रावल शाखेत आजही मुसलमानांचा भरणा विशेष आहे. शब्दप्रामाण्यापेक्षा आत्मानुभूतीच्या प्रत्यक्ष ज्ञानाला तो महत्त्व देतो. तो शिवोपासक व योगमार्गी होता. त्याचे मठ व अनुयायी भारतात सर्वत्र तसेच नेपाळ आणि श्रीलंकेतही आढळतात. त्याचा प्रभाव नंतरच्या सर्व निर्गुणपंथी अनुयायांवर पडला. कबीरावरही त्याचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरांनीही त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आद्य शंकराचार्यांनंतर अखिल भारतीय जनमताला प्रभावित करणारा एवढा मोठा आचार्य मध्ययुगात झाले नाही, असे हजारीप्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे.
त्यांच्या नावावर संस्कृत, अपभ्रंश, हिंदी व इतर भारतीय भाषांतील विपुल ग्रंथरचना आहे. देशी भाषांत ग्रंथरचना करून त्याने त्या भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याच्या संस्कृत आणि अपभ्रंश ग्रंथांतील अमनस्क, अमरौघशासनम्, गोरक्ष-पद्धति, गोरक्ष शतक, गोरक्ष संहिता, महार्थ-मंजरी (अपभ्रंश), सिद्धसिद्धांत पध्दति, योगमार्तंड इ. ग्रंथ महत्त्वाचे होत. हिंदीत लहानमोठे सु. ४० ग्रंथ त्याचे सांगतात परंतु त्यांपैकी निश्चित किती ग्रंथ गोरखनाथाचे आहेत, हे सांगणे कठीण आहे. त्याचे हे सर्व हिंदी ग्रंथ पीतांबरदत्त बडथ्वाल यांनी गोरखबानी (१९४२) नावाने संकलित केले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ! (CM Yogi Adityanath)
योगी आदित्यनाथ यांचे मूळ नाव अजयसिंह बिष्ट. त्यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडामधील यमकेश्वर तालुक्यातील पंचूर या गावात झाला. त्यांचे वडील आनंदसिंह फॉरेस्ट रेंजर होते. आदित्यनाथांना एकूण सात बहीण-भाऊ असून, भावंडांत त्यांचा क्रमांक पाचवा आहे. त्यांनी आणखी दोन छोटे भाऊ आहेत. टिहरी या गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले व त्यांनी श्रीनगरमधून गणित या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गणितात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास सुरवात केली होती, मात्र ते गुरू गोरखनाथ यांच्यावर संशोधन करण्यासाठी गोरखपूरमध्ये आले व महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य बनले. त्यानंतर १९९४च्या वसंत पंचमीला ते पूर्णवेळ संन्यासी बनले व त्यांचे नाव योगी आदित्यनाथ ठेवले गेले. महंत अवैद्यनाथ यांचे १२ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले व दोन दिवसांनी योगी आदित्यनाथ मंदिराचे पीठाधीश्वर बनले. या काळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला व गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ ते २०१७ या कालावधीत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या गळ्यात १९ मार्च २०१७ला अनपेक्षितपणे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडली व या प्रखर राष्ट्रवादी नेत्यानं उत्तर प्रदेशामध्ये आपल्या कामांचा धडाका सुरू केला. त्यांनी राज्यातील गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. लॅण्ड माफियांवर अंकुश मिळवण्यासाठी पोलिसी कारवाया सुरू केल्या व यात अनेक गुन्हेगार पकडले गेले, मारले गेले किंवा ते ‘अनट्रेसेबल’ झाले आहेत. योगींच्या काळात महिला सुरक्षित झाल्या व त्यामुळं २०२२च्या विधानसभा निवडणुकांत त्यांना मोठा फायदा झाला. गोरखपूर शहरात योगींचा बोलबाला असून, येथील नऊच्या नऊ विधानसभा जागा भाजपच्या पारड्यात पडल्या. २०१७च्या विधानसभेत भाजपला ८ व सपला १ जागा मिळाली होती.
भाजपला गेल्या तीन दशकांत प्रथमच सलग दोनदा सत्ता राखण्याचा विक्रम नोंदवण्यात योगींच्या करिष्म्याचा मोठा वाटा आहे, यात शंका नाही. योगींची प्रतिमा गेल्या पाच वर्षांत ‘बुलडोझर मॅन’ अशी झाली. यामागं त्यांनी गुडांच्या मालमत्तांवर आणलेली टाच व माफियांच्या केलेल्या समूळ उच्चाटनाचा संदर्भ आहे. यामुळं राज्य कायदा आणि सुवस्थेचा विचार करात अत्यंत सुरक्षित झाल्याची भावना जनमानसांत तयार झाली. नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर सहज फिरू लागले व महिलांनीही रात्रीच्या वेळी एकटे फिरण्याइतकी सुरक्षितता मिळाली. योगींचा बुलडोझर योग्य लोकांवर चालल्याचा हा परिणाम होता व त्याचे रूपांतर मतांत झाल्यानं योगींचा सत्तामार्ग सुकर झाला. अखिलेश यादव यांनी यादव-मुस्लिम मोट बांधत योगींपुढं आव्हान उभं केलं होतं, मात्र ते मतात परावर्तित होण्यात कमी पडलं. बसपच्या मायावती यांनी पूर्ण ताकदीनं निवडणूक न लढवल्याचा फायदा भाजपलाच झाला. मायावतींचा पारंपरिक दलित मतदार नक्की कोणाच्या मागं जायचं, या विवंचनेत होता. मात्र, यादव-मुस्लिमांच्या राजवटीत दलितांवर अन्याय होतात, हा इतिहास लक्षात घेऊन दलितांनी भाजपला मतदान केल्याचं स्पष्ट झालं व भाजपचा विजय सुकर झाला. कॉंग्रेसनं उत्तर प्रदेशात धडाक्यात प्रचार सुरू केला. महिलांना ४० टक्के जागा देत प्रियांका गांधी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला, मात्र त्यांना ४०३ पैकी केवळ २ जागा मिळवता आल्या.
राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यानंतही योगींपुढील आव्हानं मोठी असतील. गुंडगिरीवर अंकुश मिळवण्यासाठी त्यांना आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे, त्याचबरोबर विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे सुरू झाली आहेत व ती पूर्ण करण्याचे आव्हान सरकार पुढे असेल. बेरोजगारीच्या प्रश्नावरही सरकारला विशेष मेहनत घ्यावी लागेल. यात एक्स्प्रेस वे, विमानतळे, मेट्रो मार्ग, विविध कारखान्यांची मुहूर्तमेढ आदींचा समावेश आहे. रस्त्यांचे जाळे विकसित झाल्यानं व गुंडगिरी नियंत्रणात आल्यानं मोठे उद्योग उत्तर प्रदेशात कारखाने उभारणीस तयार होत आहेत. तसे झाल्यास पुढील पाच वर्षांत उत्तर प्रदेश देशाच्या विकासाचं मॉडेल बनेल व तेथील तरुणाईला रोजगारासाठी राज्य सोडून बाहेर जाण्याची वेळ येणार नाही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.