पोर्तुगीजांची ४५० वर्षांची जाचक राजवटही थांबवू शकली नव्हती 'घुमट आरती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊर्जा वाढविणाऱ्या घुमट आरत्या}
गोव्याच्या घरा-घरात होते घुमट आरती

पोर्तुगीजांची ४५० वर्षांची जाचक राजवटही थांबवू शकली नव्हती 'घुमट आरती'

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते समुद्र किनारे, चर्च, मंदिरे व तेथील मांसाहारी खाद्य संस्कृती. पोर्तुगीजांच्या सुमारे ४५० वर्षांची जुलमी राजवट सहन करूनही गोव्याने आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. त्यातली एक म्हणजे ‘घुमट आरती’!..चला जाणून घेऊयात या बद्दल....

ॲड. उदय भेंब्रे या कोकणीतील (Konkan) ज्येष्ठ साहित्यकाराने लिहिलेलं ‘चांन्याचे राती, माडाचे सावले, सारयल्या सोबीत मांडार...हातात घालून हात, नाचूया गावया, घुमटाच्या मधुर तालात’ हे कोकणी गीत गोव्यात प्रसिद्ध आहे. बहुसंख्य गोमंतकीयांच्या ओठावर हे गीत आहे. त्यातील घुमटाचा उल्लेख, गोव्यातील (Goa) लोककलेतील घुमटाला किती महत्त्व आहे हे सांगून जातो. अर्थात हे गीत गाताना घुमटाचा वापर केला जातो, हे वेगळे सांगायची गरज नाही. असं हे ‘घुमट’! (Ganeshtsav Special Ghumat Aarti Unique art of Goa)

आधी गोव्याचा इतिहास पाहू
महाभारतामध्ये (Mahabharata) गोव्याचा उल्लेख ‘गोपराष्ट्र’ किंवा ‘गोवराष्ट्र’ असा केलेला आढळतो. हरिवंश या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण यादव जनांसह या परिसरात आले असा उल्लेख आढळतो. ईश्वरसेन आभीर याने तिसऱ्या शतकात सातवाहनांचा पराभव करून महाराष्ट्र व गोव्यावर आधिपत्य प्रस्थापित केले हे आभीर म्हणजेच महाभारत कालीन यादव. ब्रज प्रदेशापासून दक्षिणेपर्यंत अनेक वसाहती स्थापन करून त्यांनी त्याला आभीर देश, गोपराष्ट्र असे नामकरण केलेले दिसते. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख ‘गोपकपुरी’ किंवा ‘गोपकपट्टणम’ असा केला आहे.

पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी (Portugise) व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. ३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गोवा प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वांत मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.

हेही वाचा: शाश्वत आनंदासाठी करा गणेशाचे नित्यपूजन

गोव्याला आपल्या सुंदर पर्यटन स्थळांमुळे (Goa Tourism) देश आणि जगात एक विशेष ओळख आहे, जिथे विविध देशांमधून पर्यटक शतकानुशतके येथे येतात, म्हणून पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव देखील येथे दिसतो. पोर्तुगीजांच्या काळात गोव्यावर काय काय अत्याचार झाले, या इतिहासात न डोकावता जाणून घेऊया गोव्याच्या एका वेगळ्या वैशिष्ट्याबद्दल. ज्याच्या बद्दल पर्यटक म्हणून, संगीत प्रेमी म्हणून किंवा कला-संस्कृतीचे अभ्यासक म्हणून तुम्हाला माहिती नसेल. ते म्हणजे गणेशोत्सवात घरोघरी वाजविण्यात येणाऱ्या घुमट आरत्या.

मुलांना सुट्या पडल्या की ‘चला गोवा....’ अस बऱ्याच लोकांचं होतं. अर्थात त्यात काही चूक नाही. नोव्हेंबरपासून नवीन वर्षाच्या काळात गोव्यात खूप गर्दी असते. ३१ डिसेंबरच्या रात्री गोव्यात हजेरी लावून नववर्षाचे स्वागत करणारेही बरेच असतात. आनंद घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. उन्हाळ्याच्या सुटीतही गोवा पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. पण मित्रांनो, गोव्यातील सांस्कृतिक वेगळेपण अनुभवायचे असेल तर गणेश चतुर्थीच्या काळात ग्रामीण गोव्यात नक्की जायला पाहिजे. स्वतःच्या अंगातील ऊर्जा वाढविणे म्हणजे काय हे गोव्यात तुम्ही जर गणेश चतुर्थीच्या काळात गेल्यास नक्की कळेल.

गोव्यातील संगीत हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे. गोवा हे भारतातील परदेशी पर्यटकांचे एक आवडते ठिकाण मानले जाते, जिथे वर्षभर वेगवेगळ्या देशांमधून लोक येतात. त्याचा प्रभाव इथल्या संगीतावरही दिसतो. पॉप संगीत, ड्रम, हिप हॉप, रॅप याबरोबरच पोर्तुगीज संगीताचाही प्रभाव दिसतो. त्यामुळे व्हायोलिन, गिटार, ट्रम्पेट, पियानो इत्यादी वाद्ये वापरली जातात. गोवा म्हटले की हीच वाद्ये आपल्या डोळ्यासमोर येतात. पण मित्रांनो, गोव्याची लोककला हा सुद्धा मोठा व आनंद देणारा असा विषय आहे. गोव्यातील घुमट आणि शांबळ (कोकणी भाषेत शिमेळ) या वाद्यांचा वापर आणि ती ऐकल्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच आहे. आणि त्याचा आनंद लुटायचा असेल तर शिमगोत्सवाच्या काळात किंवा गणेश चतुर्थीच्या काळात आपण गोव्यात नक्की जायला पाहिजे.

घुमट वाद्याबद्दल...
माती आणि घोरपडीच्या कातडीपासून बनविलेले हे गोव्यातील पारंपरिक वाद्य. प्रत्येक लोककलेमध्ये याचा वापर असतो. हिंदूंबरोबर ख्रिचन बांधवही या वाद्याचा वापर करतात. ते दोन्ही हातांनी वाजविले जाते. कळशीच्या आकाराचं मातीचं भांड ज्याला एका बाजूला घोरपडीचं कातडं बांधलेलं असतं व दुसऱ्या बाजूला उघड असतं व तो भाग गाणी किंवा आरत्यांच्या चालीनुसार हाताने बंद-उघडा, बंद-उघडा करत वाजवायचे असते.

अर्थात कातडी फाटू नये म्हणून या वाद्यावर थाप मारायची वेगळी पद्धत असते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोवेकरांच्या अनेक कला आपल्याला सांस्कृतिक देखाव्यातून, तसेच घुमट आरतीमधून बघायला मिळतात. घुमट आरती शिवाय गोव्यातील गणेश चतुर्थी पूर्णच होत नाही. गणेश चतुर्थीच्या काळात अगदी नेमाने रोज घुमट आरती गोव्यात ऐकू येते.

पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जाचक राजवटीतसुद्धा घुमट वादन, घुमट आरती हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम गोमंतकीयांनी सांभाळला हेच संस्कृती जतनाचे, धैर्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण म्हणावे लागेल. गोमंतकातील घुमट आरती हा सामाजिक समरसता जोपासणारा उपक्रम समाज बांधवांना शेकडो वर्षांपासून एकत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.

वेगवेगळ्या चाली
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन घुमट वाजवत (घुमट वादन) विशिष्ट चालीत आरती म्हणणे हा गोमंतकीय लोकांचा अभिमानास्पद विषय आहे. प्रत्येक तालुक्यातील घुमट आरती म्हणण्याच्या पद्धती व चाली वेगवेगळ्या आहेत. मात्र त्या म्हणताना घुमट आणि शांबळ ही वाद्ये सर्व तालुक्यात वापरली जातात. पूर्वी फक्त पुरुषच घुमट आरती करायचे, पण आता मुली व महिलाही पुढे येत आहे व मंडळ स्थापन करून उत्साहाने घुमट आरत्यांमध्ये सहभागी होत आहेत.

हेही वाचा: नातवांना सांगा खोडकर बाप्पाच्या गोष्टी! गणपतीचे वर्णन करणारे श्लोक

सुखकर्ता, लवथवती, दुर्गे दुर्घटभारी, युगे अठ्ठावीस, येई हो विठ्ठले, ओवाळू आरती मदन गोपाळा अशा एक ना एक आरत्यांपासून ते घालीन लोटांगणपर्यंत घुमटाचा आवाज ऐकायला मिळतोच. शिमगोस्तवात तर वेगवेगळ्या भावगीतांवर व चित्रपट गीतांवर घुमटाच्या तालावर नाचणारे गोमंतकीयही पाहायला मिळतात.

कित्येक शतकांपासून चालत आलेल्या तसेच गोमंतक स्वातंत्र्यपूर्व काळात पोर्तुगीजांच्या छळाला न जुमानता सातत्याने घुमट आरती वादन उपक्रमातून गावातील लोक एकमेकांच्या घरी जात. आताही याच माध्यमातून गोमंतकीय एकमेकांशी संवाद साधतात, सुखदुःखांचे आदानप्रदान होते तसेच सामुहिक आरती वादनामुळे अनाकलनीय ऊर्जेचा संचार पुढील वर्षभरासाठी अदृश्य शक्ती देऊन जातो.

गावात घुमट आरती म्हणणारे, घुमट वाजवणारे तरुणांचे गट दररोज वेगवेगळ्या वाड्यावर जाऊन, घरोघरी जाऊन आरती म्हणतात. ही परंपरा पुढील पिढीस देण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसतात. घुमट आरतींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे वाद्य वाजवायला कुणालाही शिकवलं जात नाही. मुलं लहानपणापासून ते वाजवायला लागतात व नंतर त्यांना आपोआप त्या वाद्याचे बारकावे समजत जातात. वाद्य शिकविण्याचे ना वर्ग आहेत ना शिकवणी. थोडक्यात गोमंतकीयांच्या रक्तातच घुमटावरचे संगीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गोमंतकाची घुमट आरती ऐकताना त्याची चाल, उच्चारण आणि नाद व्यक्तीला तल्लीनतेची अनुभूती देऊन जातो. या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे जतन करण्यासाठी आजही तितक्याच उत्साहाने प्रयत्न होताना दिसतात. या उपक्रमात उच्च-नीच, ज्येष्ठ-कनिष्ठ, लहान-थोर असा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही तसेच कोणत्याही अतिरेकी अवगुणांचा स्पर्श घुमट आरती या कलेला आजपर्यंत झालेला नाही हे विशेषत्वाने जाणवते. पूर्वीच्या काळी एखादी कला जोपासली जावी म्हणून राजाश्रय मिळत असे त्याचप्रमाणे घुमट आरतीचे जतन व संवर्धन शासकीय संमतीने होते हे उल्लेखनीय. गोव्यात गोवा कला अकादमीतर्फे दर वर्षी पुरुष आणि महिलांसाठी राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धा आयोजित केल्या जातात.

वाड्यावरील लोक एकत्र येऊन घुमट आरती केली जाते. हा कार्यक्रम तास दोन तास चालतो. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सोडून देणाऱ्यांपैकी गोमंतकीय नव्हेत. दुसरे काय म्हणतात याच्याशी गोमंतकीयांना देणेघेणे नसते. कारण संस्कृती रक्षण व संवर्धन हाच मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या सादरीकरणातून प्रकट होतो हे गोमंतकाचे वैशिष्ट्य आहे. २०१९ मध्ये गोवा सरकारने घुमटाला लोकवाद्याचा दर्जा बहाल केला आहे.

चला तर मग, गणेशोत्सवाच्या काळात एकदा गोव्याला जाऊ अन् घुमट आरत्या ऐकून वेगळी ऊर्जा घेऊन येऊ. गोव्याचा वेगळा अनुभव घ्यायला काय हरकत आहे? शेवटी ऊर्जा मिळणं महत्त्वाचं नाही का?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”