Ganesh Festival- गणपती, आई आणि मी... वाचा भूषणची Exclusive मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता भूषण प्रधान आणि गणपतीचे नाते}
सेलिब्रिटींचा गणेशोत्सव

गणपती, आई आणि मी... वाचा भूषणची Exclusive मुलाखत

मी देवाकडे कधीच काही मागत नाही. कारण माझं स्वतःचं मत आहे की देवापुढे फक्त डोळे बंद करुन त्याचीच प्रतिमा डोळ्यात घट्ट सामावून घ्या आणि बस्स त्याचं स्मरण करा....त्याच्याकडे काही मागण्याची गरजच उरत नाही....असं सांगतोय अभिनेता भूषण प्रधान...वाचा Exclusive मुलाखत......

मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा भाड्याच्या घरात सुरुवातीला राहत होतो. घरी देव्हारा नव्हता पण लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो होतो,तेव्हा तासन तास रांगेत उभा असताना त्या फोटोफ्रेम वर नजर पडली अन् घेऊन आलो बाप्पाला घरी. दर्शन तर डोळेभरुन झालंच पण तेव्हा आस्थेनं घरी नेलेल्या त्या फ्रेमनं मात्र प्रत्येक वळणावर साथ दिली अन् माझ्या पदरात नेहमी आनंद घातला. नंतर घरी देव्हारा बसवला,सगळे देवही त्यात आले पण बाप्पाची फ्रेम मात्र अनेक घरं बदलली तरी कायम माझ्यासोबत राहिली आणि अजूनही आहे. (Marathi Actor Bhushan Pradhan Telling about Dagdusheth Halwai Ganpati)

अखेर आईची अट गणेश चतुर्थीलाच पू्र्ण केली अन्...

लहानपणापासून खूप वाटाचयं आपल्या घरी देखील बाप्पांची स्थापना करावी. कारण बाबांच्या चुलत भावंडांच्या घरी गणपती यायचे, ते पहायचो आणि मग घरी येऊन आई-बाबांकडे हट्ट करायचो, 'आपल्याकडे पण आणा बाप्पांना'. पण आईनं एकदाच ठणकावून सांगितलं,'जेव्हा स्वतःचं घर घेशील तेव्हाच तू बाप्पांना घरी आण,तोपर्यंत विषय काढायचा नाही'. मग काय मनात इच्छा होतीच. मोठा झाल्यावर जेव्हा मुंबईत कामानिमित्तानं आलो तेव्हा पहिलं स्वतःचं घर घ्यायचं हा ध्यासच जणू जडला. कारण मनात बाप्पांना माझ्या स्वतःच्या घरात आणण्याची तीव्र इच्छा कुठेतरी घर करुन होती.

शेवटी बाप्पापर्यंत माझी ती इच्छा प्रार्थनेच्या रुपात नकळत पोहोचली अन् गणेश चतुर्थीच्या दिवशीच आठ वर्षापूर्वी मी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. त्याच दिवशी मला घराचं पझेशन मिळालं. त्यावर्षी लगेच बाप्पा आणणं शक्य नव्हतं, पण पुढल्या वर्षी बाप्पा माझ्या घरी आले,आणि यंदा त्याला सात वर्ष झाली. अखेर माझा हट्ट आणि आईची अट दोन्ही माझ्याही नकळत बाप्पाच्या कृपेनेचं पूर्ण झाले.

पुण्यातील चिंचवडचं घर आणि घरची गणेशाची मूर्ती...खास कनेक्शन

माझ्या घरचा बाप्पा हा घरीच तयार होतो. अर्थात माझी आई ती मूर्ती बनवते. आणि ही आता प्रथाच पडलीय. त्याचं झालं असं की जेव्हा मुंबईतील माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात गणेशाची स्थापना करायचं ठरलं तेव्हा आईनं मूर्ती घडवायची जबाबदारी स्वतः उचलली. दरवर्षा पुण्यातील आमच्या चिंचवडच्या घरात आमचा बाप्पा आई घडवते अन् तिथनं आम्ही सगळे त्याच्यासोबत मुंबईत येतो, त्याची स्थापना करायला. माझ्या बाप्पाचं मुंबई-पुणे कनेक्शन असं बेस्ट आहे. आई शाळेत शिक्षिका, मुलांना चित्रकला हा विषयही ती शिकवायची. पण अशी मूर्ती घडवायला ती कुठे शिकली नव्हती. पहिल्या वर्षी तिनं मूर्ती छानच बनवली पण त्यानंतर सातत्य राखल्यामुळे तिचा हात इतका छान बसला की गेल्यावर्षी तर तिनं दहा-बारा मुर्त्यांच्या ऑर्डर्स घेतल्या.

यावर्षी तिनं अभिनेते तुषार दळवी यांच्या घरातील बाप्पाची मूर्तीही घडवली. त्यांच्या घरी यंदा पहिल्यांदाच बाप्पा विराजमान होणार होते. आई मुर्ती बनवते ती साच्याच्या मदतीशिवाय. तिचं डिटेलिंगवर खूप भर असतो. म्हणून हाताने मूर्ती बनवणं ती पसंत करते. त्यावेळचा तिचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अर्थात मूर्ती बनवताना आई मला काही गोष्टी नक्कीच विचारते. देवाची बैठक कशी असावी, उंची किती ठेवावी, सोवळं-पिंताबर यापैकी काय, अशा बऱ्याच गोष्टींवर विचारविनिमय होतो.

यावेळी तर शूटिंग निमित्तानं पुण्यात गेलो होतो तेव्हा बाप्पाचा उंदीर मामा मी स्वतः बनवला आणि गणेशाच्या मूर्तींचं थोडं रंगकामही केलं. पण यापेक्षा जास्त मी आईच्या मूर्ती बनवण्याच्या कामात जास्त लुडबुड करत नाही. यंदा सातवं वर्ष असल्यानं बाप्पांची उंची थोडी मोठी ठेवली होती. दरवर्षा परंपरेप्रमाणे विसर्जनही घरातच होतं. अगदी तसंच केलं फक्त घरातीलच एका पिंपाला विहिरीचा लूक बाहेरून दिला अन साग्रसंगीत विसर्जनाचा कार्यक्रमही पार पाडला.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत हमखास हरवायचो...

पुण्यात बालपण गेलं तर कामानिमित्तानं मुबंईकर झालो...त्यामुळे गणपतीच्या मिरवणुका दोन्हीकडच्या पाहिल्यात. पुण्यात परपंरेला धरुन मिरवणुका रंगतात तर मुंबईत आधुनिकतेकडे अधिक झुकाव मिरवणुकांमधून दिसतो. आता कामानिमित्तानं दोन्हीकडच्या मिरवणुका मिस करत असलो तरी पुण्यात लहानपणी गणपती विसर्जनाच्या अनुभवलेल्या मिरवणुका लख्ख लक्षात आहेत माझ्या.

लहानपणी बाबांच्या गाडीवरनं आम्ही चौघं,म्हणजे आई,बाबा,मी आणि माझा भाऊ संध्याकाळी जे मिरवणुका पहायला बाहेर पडायचो ते रात्रभर सगळीकडच्या मिरवणुका पाहत फिरायचो. त्यावेळी रात्री जागून मिरवणुका अनुभवण्यात वेगळीच गम्मत होती. एक चांगला व्ह्यू देणारा स्पॉट निवडण्यापासून ते चमचमीत खाण्याच्या जागा निवडणं हे सारे अनुभव म्हणजे नुसती धम्माल.

बरं हे कमी म्हणून की काय त्या गर्दीत हरवणं हा प्रकार हमखास माझ्याकडूनच व्हायचा. मग बाबांनी जी खूणगाठ सांगितली असायची ती हरवल्यानंतर शोधत फिरायचं अन् सांगितलेल्या ठिकाणी पोहोचायचं. ते हरवणं काही काळ भीतीचा अनुभव द्यायचं तरी गर्दीत आई-बाबांना शोधून काढणं यात मला मोठी गम्मत वाटायची.

हेही वाचा: लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

गणेशोत्सवानंच कलाकार म्हणून घडवलं...

लहानपणी आमच्या सोसायटीत, आजुबाजूच्या सोसायटीत बरेच कार्यक्रम आयोजित केले जायचे. मग काय डान्समध्ये भाग घेणं, एखाद्या छोट्या नाटकात भूमिका करणं असा माझा सहभाग असायचाच. त्यानिमित्तानं कलेचं दैवत असणाऱ्या गणपती बाप्पापुढे आपल्यातील कलेचं प्रदर्शन करण्याची संधी मिळायची. यातूनच आत्मविश्वास निर्माण झाला आणि आवडही. पुढे जिवंत देखाव्याची गणेशोत्सवात सुरुवात झाली,मग काय तिथे काहीतरी सादर करण्याची संधी मिळाली तर कोण सोडणार. त्यावेळी मला माझं अभिनयासाठीचं पहिलं पेमेंट मिळालं असं मी म्हणेन. ते १०००-१२०० रुपये होते. पण काय आनंद झाला होता म्हणून सांगू. एवढ्या पैशांचे काय करु असं झालं होतं मला.

मी देवाकडे कधीच काही मागत नाही...

मी देवाकडे कधीच काही मागत नाही...

मी देवाकडे कधीच काही मागत नाही...

मी अनेक ठिकाणी तासनतास रांगेत उभा राहून गणपतीचं दर्शन घेतलं आहे. घरी बाप्पाची स्थापना करतो, देवपुजा करतो; पण मी इथे खरं-खरं एक गोष्ट सांगतो की एवढं सगळं करुनही मी देवाकडे कधीच काही मागत नाही. कारण माझं स्वतःचं मत आहे की देवापुढे फक्त डोळे बंद करुन त्याचीच प्रतिमा डोळ्यात घट्ट सामावून घ्या आणि बस्स त्याचं स्मरण करा....त्याच्याकडे काही मागण्याची गरजच उरत नाही. तो न मागता सगळं देतो.

तो सगळीकडे वसलेला आहे. त्यामुळे त्याला पहायला रोज मंदिरात जावं असा मानणारा देखील मी नाही. मला त्यानं न मागताच दिलं आहे. त्यामुळे संकटं आली तरी मी मानतो की त्याला मला या संकटातून काहीतरी धडा द्यायचा आहे. त्यामुळे लहानपणी अनेकदा मानाचे गणपती,नवसाचे गणपती असं सगळं भले मी केलं असेन,पण जसे श्रद्धेच्या बाबतीतील माझे विचार बदलले तसं मी आता मानाचे,नवसाचे गणपती यांचे तासनतास रांगेत उभं राहून दर्शन घेणं टाळतोच. प्रमोशनच्या निमित्तानं जावं लागलं तर, पण मुद्दामहून जाणं आता होतच नाही.

'जीएसबीचा गणपती, सिद्धिविनायक मंदीर अन् दगडूशेठ हलवाई'चं मला आकर्षण...

मला मुंबईतला जीएसबीचा गणपती, सिद्धिविनायक अन् पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं मात्र मला का कुणास ठाऊक एक विशेष आकर्षण आहे. मुंबईतील जीएसबीच्या गणपतीला मी माझ्या मित्रासोबत गेलो होतो,तेव्हा जीएसबीच्या गणपतीच्या मूर्तीसोबतच मला भावली तिथली शिस्तप्रियता, मंडळातील एकसंघता, व्यवस्थापन सगळंच ए-वन. अगदी तिथं गेल्यावर वाटलं हाच तर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांचा उद्देश होता.

दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन मी त्या पुण्यातील रस्त्यावरनं येता-जाता घेतोच. तिथे पोहोचल्यावर गाडीतून उजव्या बाजूला पाहणं होतंच. अर्थात ती मूर्तीच अशी विराजमान आहे की खास देवळात जावं लागत नाही बाप्पाच्या दर्शनाठी. अगदी घाई-घाईत रस्त्यावरुनं जातानाही बाप्पाला डोळे भरुन पाहता येतं. तसं मुंबईत सिद्धिविनायक माझ्या अधिक जवळचा. माझी पहिली गाडी घेतली तेव्हा आई मला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन गेली होती. तेव्हा तिनं सिद्धिविनायकाच्या मंदीरात दगडूशेठ हलवाई गणेशाची मूर्ती माझ्या गाडीत ठेवायला घेतली होती. आज माझ्या तीन गाड्या बदलून झाल्या पण आईनं घेतलेली ती गणेशाची मूर्ती आजतागायत माझ्या गाडीत विराजमान आहे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

'वक्रतुंड महाकाय..' म्हटलं की संघर्षाशी दोन हात सहज

आयुष्यात संघर्ष रोज सुरू आहे. तो कोणालाच चुकलेला नाही पण बाप्पा सोबतीला असल्यावर कसली आलीय भिती. मी रोज शूटिंगला जेव्हा मेकअप करायला बसतो, तेव्हा चेहऱ्याला रंग लागायच्या आत माझ्या ओठांवर वक्रतुंड महाकायचा जप सुरु होतो आणि सारं दडपण क्षणात नाहीसं होतं. आणि मला वाटतं आजपर्यंत जे काही माझ्या वाट्याला आलं ते गोड मानून घ्यायचे हे देवानेच मला नकळत शिकवले आहे.

मला एक माहितीये की मला जे मिळत आहे जे माझ्या वाट्याचे होते, जे नाही मिळाले ते माझे नव्हतेच, असं समजून मी तो विचार सोडून देतो. त्यामुळे कुठेही मला ऑडिशनंनंतर काम मिळालं नाही की मी नाराज न होता पुढच्या तयारीला लागतो. बाप्पानं माझ्यासाठी काहीतरी आणखी चांगलं योजलं आहे असं मी मानतो. त्यामुळे संकट आलं की देवाचा धावा करणं हे मी कधीच करत नाही. जे माझ्यासाठी आहे ते बाप्पा मला देणार हे मला ठाऊक आहे आणि यावर माझा ठाम विश्वास आहे.

गणेशोत्सवाचं बदललेलं स्वरुप स्वागतार्ह

गणेशोत्सवाला आता व्यावसायिक स्वरुप प्राप्त झालं आहे हे मी नाकारत नाही,ते मलाही खटकतं. पण गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा विनाश होऊ नये म्हणून ज्या योजना राबविल्या गेल्यात त्या खरंच स्वागतार्ह आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवर बंधन, इको फ्रेंडली गणेश, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव अशा अनेक उपाययोजना कौतुकास्पदच. पण तरीही या काळात होणारं आवाज प्रदूषण यावर मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”