Ganesh Immerssion- पृथ्वीतत्त्वाचे जलतत्त्वात रुपांतर हेच आहे विसर्जनामागचे शास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या}
जाणून घ्या विसर्जनामागचे शास्त्र

पृथ्वीतत्त्वाचे जलतत्त्वात रुपांतर हेच आहे विसर्जनामागचे शास्त्र

पार्थिव गणेशाचे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करावेच लागते. ही केवळ एक प्रथा वा परंपरा नाही तर त्यामागे निसर्गचक्राशी संबंधित शास्त्रीय कारण आहे..जाणून घेऊ काय आहे हे कारण....

श्रीगणेश ही पृथ्वीतत्त्वाची देवता. हिचे अस्तित्व दोन प्रकारे समजून घेता येते. एक म्हणजे स्वयंभू लिंगस्वरूप देवता आणि दुसरी पार्थिवस्वरूप देवता. स्वयंभू म्हणजे निसर्गतः आणि देवता म्हणजे एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी असलेली शक्ती आणि अधिकार. अष्टविनायक हे स्वयंभू गणपती होत. (why ganesh immerssion is done in water)

अष्टविनायकांच्या (Ashtavinayak) मूर्ती मनुष्याने तयार केलेल्या नाहीत, तर तेथे स्वयंभू पाषाण आहेत, ज्यातून प्रसारित होणारे शक्तितरंग जाणवू शकतात, त्यांच्याशी संभाषण होऊ शकते आणि मनोवांछित कामना पूर्ण करण्यासाठी त्यांची मदत घेता येते. पार्थिव म्हणजे मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती (Ganesh Idol). साध्या दगडावर, सुपारीवर किंवा मातीपासून बनविलेल्या पार्थिव मूर्तीवर गणपतीचा प्रतिष्ठापना करता येते. भाद्रपदात येणारा १० दिवसांचा गणेशोत्सव हा पार्थिव गणेशाच्या उपासनेचा उत्सव.

ऋषिमुनींनी सांगितलेल्या, चराचरात उपस्थित असलेल्या परमशक्ती व परमेश्र्वरी संकल्पनेचे अस्तित्त्व व श्रद्धा हा जीवनाचा मुख्य आधार आहे, असे ज्यांनी समजून घेतलेले आहे, त्यांच्यासाठी हा उत्सव महत्त्वाचा ठरतो. या उत्सवाच्या निमित्ताने श्रीगणेशाशी एकरूप होऊन त्याला आपली सुख-दुःखे सांगता येतात. निसर्गाच्या माध्यमातून शक्तीला आपल्यापर्यंत परत आणावे व या शक्तीने आपले दुःखनिवारण करावे, समृद्धी द्यावी, ज्ञान द्यावे, स्मृती द्यावी व सर्व जीवन मंगलमय करावे या अपेक्षेने श्री गणपतीचे पूजन केले जाते. मात्र अशा पार्थिव गणेशाचे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करावेच लागते. ही केवळ एक प्रथा वा परंपरा नाही तर त्यामागे निसर्गचक्राशी संबंधित शास्त्रीय कारण आहे.

पृथ्वीतत्त्व हे एका जागी स्थिर असते, त्याऐवजी त्याचे जलतत्त्वात रूपांतर झाले की ते प्रवाही होते. म्हणजे ते काळाबरोबर पुढे जाऊ शकते. पृथ्वीतत्त्व मेरुदंडाच्या तळाला असलेल्या मूलाधार चक्रात स्थित असते व हेच श्रीगणेशांचे स्थान आहे. हे तत्त्व ज्यावेळी ब्रह्मस्वरूपाकडे जाऊ लागते तेव्हा ते प्रथम स्वाधिष्ठानातील जलतत्त्वात विसर्जित होते. जलात सर्व विचार येऊ शकतात, राहू शकतात. ज्यावेळी पंचीकरणातून सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून घडलेले सर्व काही जलाला माहीत असते. त्यामुळे जलाचा उपयोग सर्व प्रकारचे जीवन वाढविण्यासाठी केला जातो आणि म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते.

जल प्रवाहित असते तसे जीवनही प्रवाहित असते. सृष्टीत असलेल्या सर्वांचेच, मनुष्यमात्र, प्राणिमात्र, वृक्ष वगैरे सर्वांचेच विसर्जन शेवटी निसर्गामध्ये करावेच लागते. या सर्वांचा इतिहास जलात सोडून दिलेला असल्यामुळे ही माहिती आवश्यकतेनुसार प्रकट व्हायला मदत होते. पृथ्वीच्या ६७ टक्के पृष्ठभागावर जल आहे. हे सर्व जल एकमेकात मिसळलेले आहे. एखादा तलाव सुटा आहे असे वाटत असले तरी त्यातील जलाची वाफ होऊन ते आकाशात जाते, त्यातून पाऊस पडतो.

हेही वाचा: संतांच्या वाङ्मयात प्रकटलेला गणेश....

कुठल्या देशातील, कुठल्या तलावातील, कुठल्या पाण्याच्या वाफेपासून तयार झालेले पावसाचे पाणी कुठल्या देशातील कुठे पडेल व ते कोण प्राशन करेल याला काहीही नियम नाही. एका अर्थाने आपण सर्व एकाच पाण्याच्या संस्कारावर वाढलेले आहोत. पाऊस अन्नाला कारण ठरतो. पुढे याच अन्नातून शरीराची उत्पत्ती होते म्हणजेच अन्न-धान्य शेतीत वाढत असताना वापरल्या गेलेल्या जलाच्या संकल्पना माणसाच्या शरीरात येतात.

अशा प्रकारे आई-वडील, पितामह-मातामह वगैरेंचा इतिहास प्रकट होतो. पितृपक्षातील १५ दिवसांमध्ये या सर्वांची आठवण काढली जाते, प्रार्थना करताना विशेष धूपाद्वारा त्यांचे आवाहन करता येते, त्यांचे श्राद्ध केले जाते, त्यांच्या नावे काही तरी दान केले जाते. यामागे असते पितरांचे उतराई व्हावे ही कल्पना.

या सर्वांचा अनुभव घ्यायचा असला तर गणेशमूर्ती त्या ऋतूत अनायसे निसर्गात उपलब्ध असलेल्या ओल्या मातीची, फार तर शाडूची बनवायला हवी. फुलापानांपासून तयार केलेले रंग लावून किंवा नैसर्गिक खनिजांच्या रूपात उपलब्ध असणारा शेंदूर वापरून ती गणेशमूर्ती सजवायला हवी. दहा दिवस पूजा-अर्चना करण्यासाठी खरी फुले, पत्री, शुद्ध कापूर, शुद्ध द्रव्यांपासून बनविलेली उदबत्ती, गुग्गुळ, धूप वगैरेंपासून बनविलेला धूप यांचा वापर करायला हवा. घरात प्रतिष्ठित झालेले श्रीगणेश हे उत्सवमूर्ती तर असतातच पण उपासनेचे, प्रार्थनेचेही माध्यम असतात याचे भान ठेवायला हवे. हे झाले तर सगळे संस्कार मूर्तीच्या बरोबरीने पाण्यापर्यंत पोचतील, पाण्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचतील, आणि श्रीगणेशाचे आशीर्वाद सर्वांना मिळतील.

हेही वाचा: दुष्ट विचारांचा व्हायरस किल करणारा श्रीगणेश

गणेशोत्सव आणि नवरात्र हे दोन्ही सण अनुक्रमे वर्षाऋतूत व नंतरच्या शरदऋतूत येतात. या संपूर्ण काळात वृक्षराजी बहरलेली असते, सगळीकडे हिरवेगार झालेले असते. म्हणून श्रीगणेश आणि दुर्गा, लक्ष्मी, गौरी या देवतांना २१ पत्री, १०८ फुले वगैरे वाहण्याची पद्धत असते. याचे कारण असे की या दोन्ही देवता पंचमहाभूतांच्याही आधी असलेल्या अस्तित्वाच्या सूक्ष्म स्वरूपाच्या अशा देवता आहेत. आणि या दोन्ही देवतांवाचून संसार नीट चालत नाही.

विघ्नहर्ता किंवा दुर्गा, गौरी, लक्ष्मी या देवता नसतील तर संसारात आवश्यक असलेले मांगल्य, समृद्धी, शक्ती मिळणार नाही. आणि नेमके याच देवतांची पूजा करण्याच्या वेळी मनुष्याला निसर्गाच्या जवळ आणण्याच्या उद्देशाने म्हणून पत्री वा वेगवेगळ्या प्रकारची फुले वाहण्याची पद्धत असल्याचे दिसते. पत्री, फुले वाहत असताना वेगवेगळ्या वृक्षांची माहिती करून घेणे, वृक्ष ओळखणे हे आपसूक होते. फुले-पाने तोडताना त्यांचा बोटांच्या अग्राला रस लागतो व त्याचाही आरोग्यासाठी उपयोग होऊ शकतो.

पृथ्वीच्या सूक्ष्म कणांपासून सुरू झालेला, संपूर्ण विश्र्वाला समाविष्ट करणाऱ्या जलापर्यंत पोचणारा आणि या योगे संपूर्ण जनता-जनार्दनाला फायदा करून देणारा असा हा श्रीगणेशांचा सण!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”