

Father of Indian Photojournalism
esakal
अर्को दत्ता - sakal.avtaran@gmail.com
क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि अभिनयात अमिताभ बच्चन यांची जशी ओळख आहे त्याचप्रमाणे भारतीय फोटो जर्नालिझमच्या क्षेत्रात प्रख्यात छायाचित्रकार रघू राय यांचे स्थान आहे. किंबहुना त्यापेक्षा जास्त... भारत समजून घ्यायचा असेल तर रघू राय यांच्या नजरेतूनच पाहावे लागेल... एवढे मोठे काम रघू राय यांनी करून ठेवले आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...
प्रत्येक क्षेत्रात एक महान व्यक्तिमत्त्व असते; परंतु प्रख्यात छायाचित्रकार रघू राय त्यापुढे होते. ‘भारतीय फोटो जर्नालिझमच्या क्षेत्राचे पितामह’ असे मी त्यांना म्हणेन; कारण त्यांच्यापूर्वी भारतात छायाचित्रण क्षेत्राला कुठलाच दर्जा नव्हता. हा व्यवसाय केवळ एक नोकरी होती. रघू राय यांच्यापूर्वी या क्षेत्रातील दुसरे उत्तुंग नाव जवळपास नव्हतेच. त्या वेळी छायाचित्रकारितेला फार आदर नव्हता; मात्र रघू राय यांनी त्यांच्या कामामुळे या क्षेत्राला व्यावसायिक स्वरूप दिले. १९६९ मध्ये एखादा मुलगा जर म्हणाला, की त्याला फोटो जर्नालिस्ट बनायचे आहे; तर तो विनोद मानला जायचा. मात्र १९८९ पर्यंत रघू रॉय, रघुवीर सिंग, किशोर पारेख इत्यादींसारख्या छायाचित्रकारांनी हे चित्र पूर्णपणे बदलवून टाकले. त्यामध्ये रघू राय यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.