

Retirement Planning
esakal
मुकुंद बी. अभ्यंकर - mbabhyankar@gmail.com
एकेकाळी सरकारी नोकरी, निवृत्तीनंतर पेन्शन आणि त्यावर निवांत जगणे हे मध्यमवर्गीय आयुष्याचे ठरलेले गणित होते. मात्र, बदलत्या आर्थिक वास्तवात खासगी नोकरी, अस्थिर उत्पन्न, वाढती महागाई आणि वाढते आयुर्मान यामुळे निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता हा प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे सुखी, स्वाभिमानी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम निवृत्तीसाठी कमावत्या वयातच शिस्तबद्ध बचत, योग्य गुंतवणूक आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन करणे ही काळाची अपरिहार्यता ठरत आहे.
काही काळापूर्वी मध्यमवर्गाच्या बाबतीत बहुतेकांची उपजीविका सरकारी नोकरीतून होत असे आणि ठराविक वयानंतर निवृत्ती; तसेच त्यानंतर ‘पेन्शनर लाइफ’ म्हणून पुढचे आयुष्य शांतपणे जात असे. पण बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक आता खासगी नोकरीत किंवा स्वतःच्या व्यवसायधंद्यात कार्यरत आहेत. त्यामुळे ठराविक वयानंतर निवृत्ती आणि महागाईच्या प्रमाणात वाढत जाणारी पेन्शनची रक्कम ही सुविधा आता अगदी थोड्या लोकांना उपलब्ध असलेली चैन ठरली आहे.
आरोग्य सुविधांमुळे आयुर्मान वाढले आहे आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असल्याचे सहज लक्षात येते. यापैकी काहींची काम करण्याची क्षमता ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतरही अंशतः टिकून असते. त्यामुळे फक्त वय झाले म्हणून निवृत्ती घ्यायलाच पाहिजे, अशी सक्ती नसते. अर्थात, उमेदीच्या वयात ज्या पद्धतीने काम होऊ शकते तसे काम या लोकांकडून होत नाही आणि आजच्या स्पर्धात्मक व बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्या कामातून मिळणारे उत्पन्न वयानुसार कमी होत जाते. त्यामुळे एकदा ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त झाले, की वाढत्या महागाईमध्ये स्वाभिमानाने जगता येईल एवढे उत्पन्न जिवंत असेपर्यंत कसे मिळत राहील आणि वृद्धापकाळात येणाऱ्या स्वतःच्या व आपल्या जोडीदाराच्या वैद्यकीय खर्चासाठी आवश्यक पुंजी कशी उपलब्ध राहील, याची चिंता अनेकांना लागून राहिलेली असते.