sambhaji patil writes about work from home
sambhaji patil writes about work from home

वर्क फ्रॉम होम : 'लंबी रेस का घोडा' 

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारी प्रिया सध्या घरी जापनीज भाषा शिकतेय. 'कोरोना'मुळे सर्व काही उत्तम सुरू असणाऱ्या अनेक कंपन्यांचा डोलारा कोसळला. अनेक कंपन्यांनी कामगार संख्येमध्ये तडकाफडकी कपात केली. अनेक जण रात्रीतून बेरोजगार झाले. प्रिया त्यापैकीच एक. संगणक अभियंता असणाऱ्या प्रियाला आपल्यावर अशीही वेळ येईल याची पुसटशीही कल्पना नव्हती, पण हे घडले. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असणाऱ्या प्रियाने या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध असणाऱ्या अनेक पर्यायांचा विचार करून, फॉरिन लॅंग्वेज शिकण्याचा निर्णय घेऊन, शक्यबतो 'वर्क फ्रॉम होम'द्वारे उत्पन्नाचे साधन शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 'फॉरेन लॅंग्वेज'च्या शिक्षणामुळे आता उत्पन्नाचे अनेक पर्याय तिच्यासमोर निर्माण झाले आहेत.

प्रियासारखी असंख्य उदाहरणे आपल्यासमोर आहेत. काहींचे जॉब गेलेत तर काहींना कोरोनामुळे बाहेर न जाता घरातूनच काहीतरी करायचे आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या बहुसंख्य कंपन्यांना, व्यावसायिक सध्याच्या परिस्थितीतून काय मार्ग काढता येईल याच्या विचारात आहेत. त्यात खर्चात बचत यालाच बहुतेकांनी प्राधान्य दिले आहे. बचत हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याचे यशस्वी उद्योजक सांगतात. त्यामुळे कोरोनामुळे अंगवळणी पडू पाहत असणाऱ्या 'वर्क फ्रॉम होम'ला वाढती पसंती मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीपेक्षाही आता कंपनीची गरज म्हणून अनेक उद्योजक या पर्यायाकडे पाहू लागले आहेत. यामुळे कोरोना असो वा नसो 'वर्क फ्रॉम होम' पुढच्या काळात 'लंबी रेस का घोडा ठरणार' हे मात्र नक्की. प्रश्न आहे तो, त्यासाठी सध्या कितीजण तयार आहेत? आधी केवळ आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सवयीचा असणारा हा प्रकार लॉकडाउनच्या काळात अनेकांना स्वीकारावा लागला आणि 'हे बरं आहे की...' असं म्हणत वर्क फ्रॉम होम या पर्यायाच्या सर्वच पैलूंवर चर्चा झाली. करोनानंतर बदलणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक बाबींचा विचार केला तर, हातात काम असणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे 'वर्क फ्रॉम होम'चा हा तात्पुरता बदल कामाचे स्वरूप कायमस्वरूपी बदलणारा ठरू शकतो. याची तयारी मात्र आतापासून आपल्याला लागावे लागेल.

कोणाला आणि कोणत्या संधी
एआयसी कॅपिटल'चे व्हाइस प्रेसिडेंट मंदार जोशी 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, ''कोरोनामुळे सर्वच ठिकाणचे वर्किंग कल्चर बदलले आहे. लॉकडाउन कधी उठेल याचा कोणाला अंदाज नाही. अशा वेळी नोकरी, व्यवसाय यासाठी संपूर्ण जगाची द्वारे खुली झाली आहेत. ऑनलाइन आणि नेटवर्किंगमुळे जग जवळ आले आहे. या संधीचा फायदा आपल्याला घेता यायला हवा. संगणकाचे बेसिक ज्ञान असणाऱ्यांपासून त्या-त्या विषयांतील तज्ज्ञांपर्यंत सर्वांना या संधीचा लाभ घेता येईल. त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील, पण पुढचा काळ हा वर्क फ्रॉम होमचा निश्चिेत असेल.''

महिलांना मोठी संधी
कार्यालयाची वेळ, कामांचे तास यासोबत कुटुंबाची, मुलांची जबाबदारी यांमुळे क्षमता असतानाही महिलांना अनेकदा व्यवसाय-नोकरी-व्यवसाय सोडावी लागते. एका सर्वेक्षणानुसार, एकट्या भारतात २० ते २५ टक्के महिलांना कामाची वेळ सोयीची नसल्याने नोकरी सोडावी लागते. वर्क फ्रॉम होममुळे ही महिला शक्ती पुन्हा एकदा उपयोगात आणता येणार आहे. ज्यांनी नोकरी-व्यवसाय सोडला आहे, त्यांच्यासाठी ही संधी आहेच, पण ज्यांनी शिक्षण घेतल्यानंतरही वेळेच्या कारणास्तव नोकरी केली नाही त्यांनाही
अनेक संधी यापुढच्या काळात निर्माण होणार आहेत.

शिक्षण क्षेत्रात नवे बदल
लॉकडाउनच्या काळात भारतासह जगभरातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनी ऑनलाइन क्ला सेस, ऑनलाइन परीक्षा, लेक्च्र यावर भर दिला. त्यासाठी झूमसह, गुगल मीट विविध गॅजेट्सचा वापर करण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांना तंत्रज्ञानाशी जोडून घेताना अनेक अडचणी आल्या. शिक्षक तज्ज्ञांनाही हे करताना गोंधळ उडाला. मात्र, अनेक शिक्षण संस्थांनी, शिक्षण मंडळांनी यापुढे ऑनलाइन शिक्षणावरच भर दिल्याचे जाहीर केल्याने शिक्षकांना हे तंत्रज्ञान समजावून घ्यावे लागणार आहे. शिक्षकांनी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःला तयार करावे लागणार आहे. जे हे बदल स्वीकारतील, यातील तांत्रिक बाबी शिकण्यासाठी ऑनलाइन अनेक कोर्सेस उपलब्ध झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिससह अनेक संस्था यावर काम करीत आहेत. लवकरच त्यांचे या संदर्भातील ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध होतील. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्यविकास विभागानेही या कोर्सेसची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भातील माहिती त्या-त्या संस्थांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. भारतातील ५४ टक्के आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे व्यवस्थापन क्षेत्रातील संस्था 'गार्टनर'च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सुविधा पुरवण्याचा व्यवसायही यापुढील काळात होऊ शकतो.

शिका एक तरी परदेशी भाषा
संपूर्ण जग हे कोरोनानंतर समान पातळीवर आले आहे. प्रत्येक देशात नोकरी, व्यवसायाच्या संधी आहेत. या संधींचा फायदा करून घ्यायचा असेल, तर सध्याच्या लॉकडाउनच्या काळात एखादी तरी परदेशी भाषा शिकण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जापनीज, चीनी, जर्मनी, फ्रेंच असे अनेक पर्याय आपल्याला ऑनलाइन उपलब्ध आहेत. गुगलवर नुसते सर्च केले तरी अनेक पर्याय आपल्यासमोर येतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा विभाग, सिंबायोसिससह अनेक परकीय विद्यापीठे, संस्था यांच्याकडे शॉर्टटर्म तसेच लॉंगटर्म कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थी, महिलांसह कोणीही हे कोर्सेस करू शकतात. याला यापुढे सर्वाधिक मागणी येणार आहे.

घरबसल्या करता येणारी कामे 
डेटा एंट्री : डेटा एंट्रीच्या कामांची आज कंपन्या, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर गरज असते. संगणकाचे बेसिक ज्ञान असणारे हे काम करू शकतात. फॉर्म भरण्याच्या कामाचाही यात समावेश होतो. आपल्या वेळेनुसार तुम्ही हे काम करू शकता. दीड लाखापासून चार लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज यात मिळू शकते. यात कामानुसार वाढ होऊ शकते.

भाषांतरकार (ट्रान्सलेटर) : तुमचे इंग्रजी भाषेसोबत इतर कोणत्याही एखाद्या भारतीय भाषेवर अथवा परदेशी भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्हाला टायपिंग जमत असेल, तर हे काम आपण सहजपणे तुमची इतर कामे सांभाळून करू शकतात. त्यासाठीच्या विविध संधी ऑनलाइन उपलब्ध आहेत. यात चांगले पैसे मिळतात याशिवाय अनेक कंपन्या या त्यांच्या प्रकल्पावर आधारित पैसे देतात.

'ईमेल प्रोसेस सपोर्ट एक्झी्केटिव्ह' : हे काम कंपनीच्या ग्राहकांशी ई-मेल द्वारे संवाद साधण्याशी संबंधित आहे. ग्राहकांच्या प्रश्नांना, त्यांच्या अडचणींना ईमेल द्वारे उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. ई- कॉमर्स कंपन्यांमध्ये हे काम मोठ्याप्रमाणावर चालते. पुण्यात खराडी, मगरपट्टा, हिंजवडी आदी आयटी कंपन्यांमध्ये तसेच घरबसल्याही हे काम सुरु असते. कोरोनानंतर अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी हे काम घरून करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी संगणकातील बेसिक ज्ञानासोबत तुम्हाला संबंधित कंपनीचे प्रोफाइल नीट समजून घ्यावे लागते.

कंटेंट रायटर : आपल्याला लिहिण्याची कला अवगत असेल तर आपल्याला कामाची कमतरता नाही. अनेक कंपन्या, जाहिरात संस्था, व्यावसायिक कंपन्या, बॅंका, राजकीय पक्ष, नेते यांना उत्तम दर्जाचा मजकूर लिहून हवा असतो. हे काम तुम्ही सहजपणे घरून करू शकता. तुम्हाला एखाद्या क्षेत्राचे ज्ञान असेल तर क्षेत्रनिहाय तुम्ही हे काम करू शकता. यात कंटेंट काय आहे, त्यानुसार तुम्हाला पैसे मिळू शकतात.

रिक्रूटर्स : अनेक कंपन्या या स्वतः:च्या एचआर विभागापेक्षाही आपल्याला आवश्यरक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती ही एखाद्या खासगी संस्थेमार्फत करतात. या कामात तुम्हाला गरजेप्रमाणे व्यक्तींची निवड करणे, त्यांना मुलाखतीसाठी तयार करणे आदी कामे करू शकता. हे कामही ऑनलाइन घरबसल्या केले जाते.

मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट : कोरोनानंतर सर्व जग चिंतेत आहे. त्यामुळे आरोग्य हीच प्रत्येकाचे प्राधान्य आहे. आरोग्याचा आता ऑनलाइन सल्ला सहज उपलब्ध होतो. मात्र, दिलेला सल्ला, उपचार यांची माहिती देण्यासाठी 'मेडिकल ट्रांसक्रिप्शननिस्ट'ची मोठी मागणी आहे. याचे अधिकृत कोर्सेस उपलब्ध आहेत.

सल्लागार/समुपदेशक : ज्या विषयात तुमचा अनुभव, ज्ञान आणि प्रभूत्व आहे, त्याविषयावर तुम्ही ऑनलाइन मार्गदर्शन करू शकता. आज व्यवसाय, उद्योग, भाषा, शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सांस्कृतिक, मानसोपचार, नोकरी, कुटुंब, शेती, परसबाग, पाककृती अशा असंख्य प्रकारात लोकांना मार्गदर्शन हवे आहे. त्यासाठीचा योग्य प्लॅटफॉर्म निवडा आणि घरच्या घरी सल्लागार किंवा समुपदेशक म्हणून तुमच्या ज्ञानाचा छंदाचा वापर करू शकता.

सोशल मीडिया मॅनेजर : सध्याचा सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, बहुतेक मोठ्या कंपन्या, उद्योजक, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, राजकीय नेते यांना त्यांचे सोशल मीडिया सांभाळणारे विश्वा सार्ह लोक हवे आहेत. सध्या पुणे-मुंबईतील काही संस्था, माध्यमांमध्ये पूर्वी काम करणाऱ्या व्यक्ती हे काम करताना दिसतात. मात्र, ज्यांना संगणकाचे, अल्गोरिदम‌चे ज्ञान आहे, विषयाचे ज्ञान आहे, एखाद्या विषयावर अचूक भाष्य करण्याची कला आहे, अशांसाठी घरबसल्या सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी आहे. यापुढील काळात यात मोठी संधी उपलब्ध होणार आहे. careerBuilder.com , simplyHired.com , Upwork.com अशा साईटवर यासंदर्भातील डाटा उपलब्ध होऊ शकतो.

याशिवाय ब्लॉगर, कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह, फ्रीलान्स रायटर, ट्रॅव्हल एजंट, वेब डेव्हलपर, व्हर्च्युअल असिस्टंट अशा अनेक संधी वर्क फ्रॉम होमसाठी उपलब्ध आहेत. यासाठीची सर्व माहिती सध्या पारंपरिक विद्यापीठे, शिक्षण संस्था, विविध वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी monster.com, indeed.com, guru.com, ifreelanced.com आदी वेबसाइटचा आधार घेऊ शकता. घरबसल्या काम करण्यासाठी Upwork ,Freelancer आदी बेवसाईटला भेट द्या. तेथे तुम्हाला काय संधी आहेत हे लक्षात येतील. ऑनलाइन कोर्सेससाठी Coursera, Udemy, Blockchain council , Simplilearn या वेबसाइटवर विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील आपल्या आवडीचा पर्याय तुम्ही निवडू शकता.

स्टार्टअपला संधी
पुण्यातील चितळेंची बाकरवडी घरपोच मिळणार ही पुणेकरांसाठी मोठी बातमीच होती. हे सांगण्याचे कारण म्हणजे कोरोनानंतर होणाऱ्या अनेक बदलांपैकी सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे घरपोच सेवा. त्यासाठी विश्वातसार्ह यंत्रणा उभ्या कराव्या लागतील. यात विविध स्टार्टअप आकाराला येत आहेत. नेटवर्किंग, आरोग्य, आर्थिक सल्ला,ज्येष्ठांसाठी आवश्यधक मदत देणे यासारख्या स्टार्टअपला संधी आहे. यापैकी अनेक 'वर्क फ्रॉम होम'ला पाठिंबा देत आहेत. त्याबाबत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत.

कर्मचाऱ्यांना हवीत आणखी कौशल्य
सायकी माइंडमॅचच्या (Scikey Mindmatch)अहवालानुसार आयटी क्षेत्रात वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करणाऱ्या ९९.२ टक्के कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता सुधारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यातील ९५ टक्के कर्मचाऱ्यांच्या कौशल्यविकासावर लक्ष देणे गरजेचे.

  • ६५ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक संवाद कौशल्याचा अभाव
  • ७१ टक्के कर्मचारी नियोजन आणि कार्यवाहीत कमी पडले.
  • १७ टक्केच कर्मचाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार काम करता आले.
  • १६.९७ टक्के कर्मचारीच फक्त नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम
  • ४०.४२ टक्के कर्मचाऱ्यांची स्वतःच्या तर्कशास्त्राचा वापर करतात.
  • १२.७ टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करताना आपला सोशल कनेक्ट , रोज सहकाऱ्यांशी होणारा संवाद याची उणीव जाणवते.

घ्या गॅजेट्‌सची मदत

  • उत्तम दर्जाचे वायफाय राऊटर : राऊटर घेताना तुमचे घर ज्या भागात आहे, रेंज आणि कॉम्पॅटिबिलीटी तपासून पाहा.
  • पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट : पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉटचा तुम्हाला बॅकअप म्हणून उपयोग होऊ शकतो.
  • ब्लू टूथ माऊस आणि किबोर्ड : याच्या साहाय्याने लॅपटॉपला योग्य अंतरावर ठेवून तुम्ही काम करू शकता.
  • ब्लू टूथ स्पीकर : कामाचा ताण कमी करण्यासाठी संगीताचा आनंद घेऊ शकता. यासाठी चांगले स्पीकर हवेत.
  • डेस्क लॅंप : चांगला प्रकाश असल्याने डोळ्यांवरील ताण कमी होतो. त्यामुळे उत्तम दर्जाचा डेस्क लॅंप बाळगावा.
  • पटॉप पॉवर बॅंक : आता पावसाचे दिवस येतील. वीज जाण्याची शक्य ता असते. लॅपटॉपची बॅटरी कमी झाल्यास किंवा तुम्हाला प्रवासात असताना काम करताना पॉवर बॅक आवश्य्क आहे.
  • एक्स्टें शन बोर्ड : तुम्ही लॅपटॉप बरोबरच मोबाईल आणि इतर काही डिव्हाईस चार्ज करू शकता.
  • लॅपटॉप स्टॅंड : सतत बसून काम केल्यास मानेवर ताण येऊ शकतो. लॅपटॉप स्टॅंडमुळे हा ताण कमी करता येतो.
  • प्रिंटर : सध्या प्रिंटरचा वापर फारसा होत नसला तरी काही महत्त्वाची कागदपत्रे प्रिंट करण्यासाठी चांगला प्रिंटर जवळ हवा.
  • हार्ड ड्राईव्ह : डाटा बॅकअपसाठी आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी हार्ड ड्राईव्ह आवश्ययक आहे.
  • हेडफोन : घरून काम करताना आजूबाजूला आवाजाचा त्रास टाळण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यरक आहे.
  • कॉन्फरन्स स्पीकर : यामुळे तुम्ही काही जण एकत्र एकाच वेळी एकमेकांशी बोलू शकता.

यापुढील काळात वर्क फ्रॉम होम हा कामाचा अविभाज्य भाग बनणार आहे. कोरोनाने वर्क फ्रॉम होम करून आपण विविध व्यवसाय, सेवा क्षेत्रांत काम करू शकतो, याचा विश्वास दिला. शिक्षण क्षेत्रात यामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी यासाठी स्वतंत्र कोर्सेस तयार करीत आहे. तंत्रज्ञानाचा वापर असणारे अभ्यासक्रम पुढील काळात येतील. एमबीएपासून अनेक अभ्यासक्रम बदलावे लागणार असून, त्यात वर्क फ्रॉम होम या घटकाचा प्रामुख्याने विचार असेल.
- स्वाती मुजुमदार, प्रो. चान्सलर, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी

कनेक्टिअव्हिटीशी संबंधित असणाऱ्या उद्योगांना कोरोनानंतर मोठी संधी आहे. टीसीएससारख्या कंपनीने २०२५पर्यंत ७५ टक्के काम 'वर्क फ्रॉम होम' असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे बेसिक स्किल्स घ्या, एखादी भाषा शिका तुम्हाला चांगले पैसे निश्चियत मिळतील. को-वर्किंग, ऑफीस कल्चर बदलेल, डिस्टंसिंग राहणारच आहे. त्यादृष्टीने घरी बसून तुमच्या एखाद्या आवडीच्या छंदापासून अनेक गोष्टी तुम्हाला रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ शकतात.
- मंदार जोशी, व्हाइस प्रेसिडेंट, एआयसी कॅपिटल

वर्क फ्रॉम होमला सध्या काही मर्यादा आहेत, पण नवीन स्टार्टअप, घरी बसून करता येतील अशी परदेशी कंपन्यांची अधिकाधिक कामे कशी मिळतील यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न करावे लागतील.
- विवेक वेलणकर, करिअर मार्गदर्शक

वर्क फ्रॉम ही एक संधी आहे. यात तुमचा नोकरीच्या ठिकाणी जाण्यायेण्यातील वाचलेल्या वेळाचा उपयोग अपस्किलिंगसाठी करता येईल. घरबसल्या करता येतील अशा नवनव्या गोष्टी सध्या येत आहेत. ब्लॉकचेन मार्केट वाढत आहे. रोबोटिक ऑटोमेशन, आर्टिफिशअल इंटेलिजन्स (एआय) यामध्ये अनेक संधी आहेत. जॉब गेला तरी तुम्हाला वेगळे काही करण्याची ही संधी समजावी. सध्या बाहेरच्या देशातील अनेक प्रकल्प भारतात येत आहेत. बिझनेस मॉडेल चेंज होत आहेत. त्याकडे लक्ष ठेवायला हवेत. स्वत: काही प्रोजेक्ट करून पाहा. अनेक साईट प्रोजेक्टी तयार होत आहेत. ट्रेनर, अनेक संस्थांमध्ये तुम्ही व्हॉलेंटिअर म्हणून काम करा, ते भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. स्वत:च्या वेबसाईट डेव्हलप करा, हेल्थकेअर मध्ये नवीन संधी येत आहेत. प्रॉब्लेम लक्षात घेऊन तो सोडविण्यासाठीचे बिझनेस मॉडेल डेव्हलप करा. सध्या कमीत कमी फीमध्ये जगातील नामवंत विद्यापीठांचे अनेक ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. ते करून ठेवा. ही मोठी संधी आहे. तिचा निश्चिातच लाभ घ्यायला हवा.
- सोनाली पटवे, सोशल इंत्रेप्रेन्युअर आणि रिसर्चर

कोरोनामुळे उद्या काय होईल याची भीती, असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात आहे. मनाचा खंबीरपणा दाखवणे हेच आपल्या हातात आहे. आज वर्क फ्रॉम होमचे पर्याय असले तरी, कामाचा प्रचंड ताण आहे. यातून बीपी, शुगर असे मनोशारीरिक आजार वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी जे काम करायचे आहे, ते मनापासून करा. कामाचा आनंद घ्या. नकारात्मक विचारांना मनामध्ये अजिबात थारा न देता नवनवे पर्याय शोधत रहा. मनावरचा ताण हलका करण्यासाठी योगा आणि ध्यानधारणेची सवय लावा. घरात कुटुंबातील सदस्यांशी भांडत न बसता त्यांच्याशी शेअरिंग वाढवा. 
- डॉ. विद्याधर वाटवे, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमचे कल्चर अधिक रूढ झाले आहे. नेटवर्किंग, पर्यटन, आयटी आदी कंपन्यांमध्ये घरून काम केल्यामुळे कामावर फारसा फरक झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे भविष्यात उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अशा पद्धतींचा अवलंब कंपन्या करतील. त्यामुळे या क्षेत्रात संधी राहतीलच.
- डॉ. भूषण केळकर, अर्थतज्ज्ञ, उद्योग व आयटी सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com