

Arvind Kejriwal Court Hearing Absence
esakal
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहून ‘गांधीगिरी’चा मार्ग स्वीकारल्याचे जाहीर केले व त्यांच्या कृतीची चर्चा देशभरात रंगली. या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. भ्रष्टाचारविरोधी चळवळीमधून उदयास आलेला नेता आज न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहण्याची भूमिका घेतो, हीच त्यांच्या राजकारणातील सर्वांत मोठी विसंगती मानली जात आहे.
अरविंद केजरीवाल यांची सार्वजनिक ओळख घडली ती अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील जनलोकपाल आंदोलनातून. २०११मध्ये भ्रष्टाचाराविरोधात देशभर उभ्या राहिलेल्या लाटेत केजरीवाल हे प्रामाणिक, अभ्यासू आणि निर्भीड कार्यकर्ते म्हणून पुढे आले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत आम आदमी पक्षाची स्थापना केली. पारंपरिक पक्षांना पर्याय देण्याचा दावा करत त्यांनी स्वच्छ प्रशासन, पारदर्शकता आणि सामान्य माणसाचा आवाज हे मुद्दे पुढे केले.