लग्न ठरवत असताना रक्तगट सारखा असावा, की नसावा? डॉक्टर सांगतात..

‘शुभमंगल’ होण्यापूर्वी जुळू द्या आरोग्य कुंडली!
couples
couples esakal

डॉ. अविनाश भोंडवे

विवाहोत्सुक युवकयुवतींच्या विवाहपूर्व शारीरिक आणि मानसिक चाचण्यांत वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे असे आठ गुण जुळायला हवेत.

‘शुभमंगल’ होण्यापूर्वी ग्रह-नक्षत्रांची कुंडली जुळवणे हा पारंपरिक प्रकार झाला. आजच्या बऱ्याच युवक-युवतींना हा पारंपरिक मार्ग पसंत असतोच असं नाही, पण भविष्यातल्या सुखी आणि निरामय आयुष्यासाठी त्यांनी आरोग्याचे गुण जुळवणे मात्र नितांत आवश्यक ठरते.

या विवाहपूर्व चाचण्या आणि समुपदेशन अनेक मान्यवर इस्पितळांत आणि वैद्यकीय प्रयोगशाळांत होऊ शकतात.

गरज का आहे?

विवाह झाल्यावर वधूवर एका नव्या कौटुंबिक आयुष्याची सुरुवात करतात. त्यांच्यापैकी कोणालाही विवाहपूर्व अवस्थेत असलेल्या आजारांचा त्यांच्या जोडीदाराला त्रास होऊ नये; त्यांच्या संततीमध्येदेखील काही दोष निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही आपल्या शारीरिक तपासण्या कराव्यात.

आपल्या शिक्षणपद्धतीत लैंगिक शिक्षण दिले जात नाही. अनेक तरुणतरुणींना शरीरसंबंधांबद्दल शास्त्रीय माहिती फारशी नसते. सिनेमा, इंटरनेट, पॉर्नफिल्ममधून दिशाभूल करणारी माहिती मिळालेली असते. त्यामुळे लैंगिक समुपदेशन गरजेचे असते.

विवाहोत्तर जीवनात उभयतांनी आयुष्यभर एकत्रित राहून संसार करणे अपेक्षित असते. त्यासाठी मानसिकता निकोप असावी लागते. आपापल्या वागण्यातील दोष समजून घ्यावे लागतात. त्यासाठीसुद्धा समुपदेशनाची आवश्यकता असते.

विवाहपूर्व चाचण्या

लग्नाला इच्छुक युवकयुवतींच्या विवाहपूर्व चाचण्यांत खालील आठ गुण जुळायला हवेत.

१. सर्वसाधारण तपासण्या :

हिमोग्राम : हिमोग्लोबिन आणि रक्तातील लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि त्यांचे पाच उपप्रकार, प्लेटलेट यासंबंधीत काही गुणोत्तरांची (रेशो) तपासणी. या चाचण्यांमध्ये व्यक्तीला अॅनिमिया असल्याचे तर समजतेच, पण रक्तातून पसरणाऱ्या काही आजारांचे प्राथमिक अनुमानही मिळते.

मूत्रतपासणी : यात मूत्रमार्गाच्या तसेच मूत्रपिंडांच्या संदर्भात काही दोष लक्षात येऊ शकतात.

रक्तगट : याबाबत अगदी सुशिक्षित कुटुंबांमध्येही गैरसमज आहेत. मुलामुलीचा रक्तगट एक नसावा असा मोठा चुकीचा प्रवाद विनाकारण अस्तित्वात आहे.

वैद्यकीयदृष्ट्या, विवाह करणाऱ्या मुलामुलींचा रक्तगट ए, बी, ओ आणि त्यांच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह प्रकारांपैकी कोणताही असला तरी काहीही अडचण नसते.

मात्र मुलीचा ‘आरएच’ रक्तगट निगेटिव्ह असेल आणि मुलाचा पॉझिटिव्ह असेल, तर त्याला ‘आरएच इनकम्पॅबिलिटी’ म्हणतात.

या स्थितीमध्येही दोघांनी लग्न करायला काहीच हरकत नसते; मात्र अशा जोडप्याला जेव्हा मूल होते, तेव्हा त्या अर्भकाचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल, तर त्याला जन्मजात काविळीचा त्रास होऊ शकतो.

परंतु अशा वेळेस या स्त्रियांना गरोदरपणाच्या सातव्या किंवा आठव्या महिन्यात आणि प्रसूती झाल्यावर ७२ तासांच्या आत असे दोन वेळा, आरएच इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनद्वारे दिल्यास, हा संभाव्य त्रास टळू शकतो.

साहजिकच रक्तगटाची तपासणी ही लग्न टाळण्यासाठी नसून पुढे सतर्क राहण्यासाठी असते.

रक्तघटक : काही विशिष्ट समाजगटांमधील स्त्रियांमध्ये कॅल्शिअम, जीवनसत्त्व ड, ब यांची तूटही मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही तूट भरून काढणे औषधांनी सहज शक्य असते. मात्र बाळंतपणानंतर हाडे दुखणे, अस्थिव्यंगाच्या तक्रारी वाढतात.

२. जनुकीय दोषांबाबत चाचणी : लग्न करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या शरीरातील काही जनुकांचा त्यांना होणाऱ्या संततीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामध्ये-

थॅलसेमिया : या विकारात जनुकीय रक्तदोषांमुळे अर्भकाच्या शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होत राहते आणि त्यामुळे त्याला सतत रक्त भरावे लागते. याचे मेजर आणि मायनर असे दोन प्रकार असतात.

जर वर किंवा वधू यापैकी एकाला थॅलसेमियामेजर असेल; किंवा दोघांनाही थॅलसेमियामायनर असेल, तर त्यांना होणाऱ्या संततीला थॅलसेमियामेजर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारात लग्न टाळावे.

दोन–तीन पिढ्यांत जवळच्या रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह झालेले असतील, तर थॅलॅसेमियामेजर होण्याची शक्यता बळावते. अशावेळी - कुटुंबाच्या प्रत्येक पिढीमधील व्यक्तींची वैद्यकीय माहिती घेऊन त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या जातात.

बहुतेक वैद्यकीय प्रयोगशाळेत थॅलसेमियाचे निदान होते. ही व्याधी जन्माला येणाऱ्या मुलामध्येही संक्रमित होते. मात्र अनेकदा जोडप्यांमध्ये हा दोष असल्याचे मुलाच्या जन्माच्यावेळीच लक्षात येते. या तपासण्या जर विवाहापूर्वीच केल्या गेल्या तर वेळीच उपचार करणे शक्य होते. थॅलसेमियामेजरची दहा हजार मुले दरवर्षी भारतात जन्मतात.

मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूर यासारख्या महानगरांमध्ये हे प्रमाण वेगाने वाढते आहे. यापैकी ९० टक्के मुले उपचार होण्यापूर्वीच दगावतात.

केवळ आठ ते दहा टक्के मुलांना योग्य उपचार मिळतात. काही देशांमध्ये थॅलसेमियाची रक्तचाचणी लग्नापूर्वीच सक्तीची केल्यामुळे, त्या देशात या आजाराचे प्रमाण वेगाने कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.

सिकल सेल : यात लाल रक्तपेशींचा आकार गोल नसतो, तर चंद्रकोरीप्रमाणे असतो. त्यामुळे अॅनिमिया संभवतो. यासाठी वरचेवर रक्तदान लागू शकते. जोडीदारांपैकी दोघांमध्ये याची जनुके असल्यास त्यांच्या बाळाला हा गंभीर आजार होतो,

डाउन्स सिन्ड्रोम : दोघांपैकी एकात जरी हा जनुकीय दोष असेल, तर जन्माला येणारे बालक दिव्यांग निपजू शकते.

जन्मजात मधुमेह : या सर्व जनुकीय चाचण्या रक्ताच्या नमुन्याद्वारे केल्या जातात.

couples
सॅम अल्टमन यांनी मित्रासोबत केलं लग्न! फोटो समोर

३. लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची चाचणी : लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांच्या चाचण्यांमध्ये लग्नापूर्वी असलेले संसर्गजन्य लैंगिक आजार रक्तचाचणीत कळतात. त्यापैकी काही आजार औषधोपचाराने बरेही होतात.

मात्र एचआयव्ही-एड्‌ससारख्या काही आजारांचा संसर्ग लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनातल्या शरीरसंबंधात जोडीदाराला होऊन संपूर्ण आयुष्य रोगग्रस्त होऊ शकते. साहजिकच दोघांची एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी.

दोघांपैकी एखाद्याची चाचणी जरी पॉझिटिव्ह आली तरी लग्न टाळणे श्रेयस्कर ठरेल. शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या आणि बऱ्या न होणाऱ्या आजारांमध्ये हिपॅटायटिस बी आणि सी हे आजारही येतात.

हे आजार भविष्यकाळात गंभीर स्वरूप धारण करतात. साहजिकच या चाचण्यांमधून रोगाचे निदान झाल्यास लग्नाचा विचार करू नये.

याशिवाय हर्पिसजनॅटॅलिस, क्लॅमिडीया, गनोरिया, शँकरॉइड आणि सिफिलीस हे आजार व्हीडीआरएल या रक्त तपासणीने जाणता येतात.

औषधोपचाराने हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे विवाहापूर्वी सुरक्षित शरीरसंबंध झाले असले तरी या आजारांची चाचणी करावी.

४. लैंगिकदौर्बल्य : सुखी वैवाहिक जीवन हे त्या दांपत्याच्या लैंगिक संबंधांवर अवलंबून असते. लग्नानंतर जोडीदार सामान्य लैंगिक संबंधांसाठी आणि संतती होण्यासाठी सक्षम आहे का हे जोखण्यासाठी काही तपासण्या करणे आवश्यक असते.

ज्या मुलींना मासिक पाळी नियमितपणे येत नाही, त्यांच्या रक्तातील हार्मोनची तपासणी करावी लागते. एफएसएच, एलएच, टीएसएच, प्रोलॅक्टिन आणि अँटिम्युलेरीयन हार्मोनच्या (एएमएच) रक्तातील पातळीची चाचणी करणे योग्य ठरते.

एएमएच हार्मोनमुळे स्त्रियांमधील बीजकोषांची क्षमता कळते. त्याचप्रमाणे काही इस्पितळात युवतींच्या बीजधारणेची (ओव्ह्युलेशन) तपासणी करून प्रजनन क्षमता तपासली जाते. उशिरा लग्न करणाऱ्या मुलींना याचा नक्की उपयोग होऊ शकतो.

सोनोग्राफीच्या चाचणीत पॉलिसिस्टीक ओव्हरी असल्यास, तसेच अंतर्गत लैंगिक अवयवांमध्ये असलेल्या आजारांचे निदान होते.

मुलांमध्ये जननेंद्रिये तसेच वीर्योत्पादकग्रंथीची तपासणी, वीर्य तपासणी केल्यास शुक्राणूंची संख्या योग्य आहेत का? हे कळू शकते.

couples
शेवटी लग्न म्हणजे फक्त व्यवहार नसतो, मुलाबाळांसाठीची व्यवस्था नसते, तर...

५. दीर्घकालीन आनुवंशिक आजार : मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल जास्त असणे, मूत्रपिंडाचे तसेच यकृताचे विकार रक्ततपासणीतून समजतात.

हे दीर्घकालीन आनुवंशिक आजार उपचारांनी नियंत्रणात राखता येतात. मात्र उपचाराअभावी यात गुंतागुंत होऊन, त्याचे परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतात.

६. मानसिक आरोग्य तपासणी : प्रेमविवाहात जीवन साथीदाराची किमान माहिती असते, मात्र बघून ठरवलेल्या लग्नात केवळ काही भेटीत समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, गुण-दोषांची पारख होणे शक्य नसते.

कोणत्याही प्रकारच्या विवाहात जोडीदाराच्या मानसिक स्वास्थ्याचा नात्यावर चांगला वाईट परिणाम जाणते-अजाणतेपणी होतच असतो.

नैराश्य, चिंता, मूड डिसऑर्डर, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, अनियंत्रित राग अशा मानसिक आजारांमध्ये एकमेकांशी जुळवून घेण्यात बरीच शक्ती खर्च होऊ शकते. अशा विवाहांचे भविष्य दोलायमान राहू शकते.

मात्र असा दोष जोडीदारांपैकी एखाद्यात आढळून आला, तर लग्न मोडण्याऐवजी, लग्नाआधी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

विवाहापूर्वी मानसिक चाचण्या नक्कीच कराव्यात, मात्र प्रत्येक जोडप्याने लग्नापूर्वी विवाह विषयक समुपदेशकाची भेट आणि सल्ला आवर्जून घ्यावा. या समुपदेशनात कुटुंबातील व्यक्तींशी कसे जुळवून घ्यावे हे नक्कीच सांगितले जाते.

सायकोमेट्रीक तपासणीद्वारे मानसोपचार तज्ज्ञ जोडप्याचे परीक्षण करतात. काही विशिष्ट चित्रांचे विश्लेषण, मल्टिपल चॉईस किंवा बहुपर्यायी प्रश्नावली असे याचे स्वरूप असते. या दरम्यान या व्यक्तींची ओळखही गुप्त ठेवली जाते.

couples
दृष्टीकोन - लग्न : जीवनातील अविभाज्य घटक

७. वैवाहिक समुपदेशन : ‘लग्न’ म्हणजे फक्त नवरा-बायकोचे आयुष्य नसते. विवाहानंतर दोन कुटुंबांमध्ये नव्याने काही नातेसंबंध निर्माण होऊन ती जवळ येत असतात.

साहजिकच चमचमीत मेनू, भरजरी साड्या, सोन्या-हिऱ्यांचे दागिने, मानपानाच्या वस्तू आणि देण्याघेण्याची बोलणी हे सारे विधी होण्याआधी भावी दांपत्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची अनुरूपता तपासून पाहणे नक्कीच निकडीचे असते.

लग्न यशस्वी होण्यासाठी मुला-मुलींना त्यांची कौशल्ये विकसित करणे गरजेचे ठरते. यामध्ये

विवाहेच्छू मुला-मुलींमधील विरोधी स्वभावधर्म लग्नापूर्वीच ओळखण्यास मदत करणे. त्या विरोधाभासांबरोबर कसे जुळवून घेता येईल किंवा हे विरोधाभास का निर्माण होतात हे ओळखून ते संपविणे. छोट्या छोट्या कारणांमुळे पुढील आयुष्यात तीव्र मतभेद निर्माण होऊ शकतात.

अनेक युवक-युवतींना त्यांना काय आवडते हे स्पष्टपणे कळत नाही. अनेकांची मानसिकता चुकीची असते, ती बदलणे आवश्यक असते.

पालक आणि वधू/वर यांच्यात योग्य संवाद नसतो, तो प्रस्थापित करावा लागतो. कुटुंबामध्ये संवादाची उणीव असते. पालकांसमोर एक पर्याय असतो, तर मुलांसमोर दुसरा. याची निष्पत्ती म्हणून गोंधळ निर्माण होतो आणि योग्य व्यक्तीची निवड होऊ शकत नाही.

काही विवाहेच्छू तरुण-तरुणी त्यांच्या अपरिपक्व मित्रमैत्रिणींकडून सल्ले घेतात. त्यातून आणखी गोंधळ निर्माण होतो.

लग्न म्हणजे नक्की काय? हे या युवावर्गाला समजून सांगण्याची गरज असते. आज चाकोरीबद्ध पद्धतीने लग्न लगेच ठरावे असे पालकांना वाटत असले, तरी तसे घडत नाही.

वधूवरांना एकमेकांची अपुरी माहिती असते, कुटुंब आणि त्यातील वातावरणाची अनुरूपता, परस्परांशी जुळवून घेण्याच्या, तडजोड करण्याच्या वृत्तीचा अभाव असतो. पती-पत्नीच्या नात्याकडे दोन माणसांमधील नात्याऐवजी पुरुष-स्त्री असे बघण्याची पारंपरिक दृष्टी बदलावी लागते.

स्वतःच्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या दुसऱ्याला लावल्या जातात, इतरांच्या अपेक्षा मात्र ठोकरल्या जातात.

पूर्वकल्पना न दिलेल्या अपेक्षांच्या पूर्तेतेचा आग्रह एकमेकांकडे धरला जातो. पुरेसा परिचय होण्यासाठी असलेला वेळ अपुरा ठरतो. सांकेतिक, साचेबंद गोष्टींना जादा महत्त्व आल्यामुळे वैवाहिक जीवनाच्या अंतरंगाकडे दुर्लक्ष होत आहे.

वधुवरांचे संगोपन, त्यांचे ग्रूमिंग, कौटुंबिक परिस्थिती आणि विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्या समजून घ्याव्या लागतात.

आजच्या युगातील मुलींना आत्मसन्मानाची जाणीव झालेली असल्याने बदलत्या कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांवर परिणाम होतो आहे. त्यामुळे पारंपरिक दृष्टी आणि विचार बदलायची गरज दोघांनाही समजावून सांगावी लागते.

शिक्षण, नोकरी, परदेशातील नोकरी यात मुलींनी-मुलांच्या बरोबरीने केलेली घोडदौड, आर्थिक स्वावलंबनामुळे आलेले बळ याचा विचार पुरुषांनी करावा लागतो.

जागतिकीकरणामुळे जीवनाला आलेली गती, ताणतणाव, असुरक्षितता, एकाकीपणा, अस्वस्थता या सर्वांना सामोरे जाताना आपले वैवाहिक जीवन कसे स्थिर ठेवावे याचा विचार होणे आवश्यक असते.

couples
Sridevi Prasanna Trailer: "टक्कल पडायच्या आधी लग्न करावं!", सई - सिद्धार्थच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धम्नाल ट्रेलर रिलीज

८. लैंगिक समुपदेशन : विवाहाच्या आधी प्रत्येक युवक-युवती लैंगिक जीवनाबद्दल थोडेफार उत्सुक असतात पण शंकितदेखील असतात. त्यात समाजात असलेले लैंगिक संबंधाबद्दलचे गैरसमज भर घालतात आणि शंकांचे पर्यवसान चिंतेत होते. साहजिकच ते लग्नाला बिचकतात.

मुलींमध्ये आई, मोठी बहीण किंवा वडीलधारी स्त्री मनातील भीती किंवा गैरसमज बऱ्याच प्रमाणात दूर करतात. परंतु मुलांना घरातील वडीलधारी पुरुषमंडळी यापैकी काहीच मार्गदर्शन करत नाही.

अनेक अविवाहित तरुणांचे हस्तमैथुन, स्वप्नदोष याबाबतीत बरेच गैरसमज असतात. लग्नानंतर आपण शारीरिक संबंधात कमजोर तर पडणार नाही ना? अशी भीतीपण वाटत असते.

मग आपले पौरुषत्व जोखून पाहण्यासाठी यातील काही तरुण मुले विवाहपूर्व अनैतिक संबंध ठेवतात, वेश्यागमन करतात किंवा तसे प्रयत्न करतात.

विवाहपूर्व काळात या तरुण-तरुणींना लैंगिक संबंधांची, तसेच कुटुंब नियोजनाच्या साधनांची पूर्ण माहिती समुपदेशनाच्या योगे देणे आजच्या युगात आवश्यक ठरते.

कारण हे संबंध कौटुंबिक सुखाशी, संततीशी आणि दोहोंच्या आरोग्याशी निगडित असतात.

तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या आजच्या अद्ययावत जगात आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचे पूर्वनियोजन केले जाते. आज समाजमूल्ये बदलली, तरी मानवी परंपरांमध्ये विवाहाला महत्त्वाचा समारंभ मानले जाते.

दोन जिवांची नवी वाटचाल सुरू होताना, त्यांच्या भावी आयुष्याचे सुखाच्या दिशेने नियोजन करायचे असेल तर, विवाहपूर्व शारीरिक चाचण्या, मानसिक आणि लैंगिक समुपदेशनाला पर्याय नाही.

----------------------

couples
Marriage : मुलाकडे शेती हवी, पण शेतकरी नवरा नको गं बाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com